Tuesday, March 29, 2016

गँगस्टर्सची दुनियादारी ...


नुकतीच सेनाभाजपाची नव्याने युती झाली आणि एक रिपोस्ट करावीशी वाटली..
लग्न आणि मयत याचा राजकारणी लोक खुबीने वापर करतात. आमच्याकडे तर काही महाभाग नगरसेवक तर असे आहेत की ते ३६५ दिवस लग्न, बारसे वाढदिवस, मुंजी, एकसष्टी, पासष्टी, पंच्याहत्तरी की अमृतमहोत्सव किंवा तत्सम जे काही असतो तो महोत्सव, सहस्त्रचंद्र दर्शन, लग्नाचा वाढदिवस आणि मयत यात हजेरी लावून निवडून येतात. लोकही यावर खुश असतात, आपला माणूस आहे आपल्याला सुखदुःखात भेटायला येतो, याहून आणखी काय हवे असा त्यांचा उलट सवाल असतो. हेच राजकारणी लोक एकमेकासाठी बंद झालेले दरवाजे अशा घटनांतून नेमकी फट शोधून उघडत असतात, जुनी दुष्मनी मिटवण्यासाठीही अशा कार्यक्रमात जातात अन कालांतराने सांगतात की आमच्यातली बेदिली आता संपुष्टात आलीय. आपसातले ट्युनिंग जुळवण्यासाठी फक्त राजकारणी याचा वापर करतात असे नव्हे तर मोठाले गँगस्टर देखील या संधीची चातकासारखी वाट बघत असतात. या सुखदुःखाच्या क्षणात एकमेकाला भेटून ते आपले बस्तान घट्ट करतात. असाच एक किस्सा आठवतो...
कुख्यात गुंड राजन निकाळजे ऊर्फ छोटा राजन याची आई लक्ष्मीबाई हिच्या निधनानिमित्त सांत्वन करण्यासाठी एकेकाळचा कट्टर गुंड आणि मध्यंतरी सर्व गुन्ह्य़ांतून निर्दोष सुटलेला अश्विन नाईक थेट छोटा राजनच्या चेंबूरच्या बालेकिल्ल्यात गेला होता. अंत्ययात्रेला येणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवणाऱ्या पोलिसांच्या नजरेनेच सांत्वनासाठी खास करून आलेल्या अश्विनला हेरले आणि एकेकाळी या दोन टोळ्यांमधील टोकाच्या संघर्षांची चर्चा होऊ लागली.

लक्ष्मीबाई निकाळजे हिची अंत्ययात्रा छेडानगर येथून निघाली होती. या अंत्ययात्रेत काही फरारी गुंड सामील असतील, अशी शक्यता असल्याने गुन्हे अन्वेषण विभागातील काही अधिकारी साध्या वेशात पाळत ठेवून होते. याच दरम्यान अश्विन नाईक सांत्वन करण्यासाठी तिथे आला होता. त्याने छोटा राजनची पत्नी सुजाता ऊर्फ नानी, तसेच त्याचा भाऊ दीपक याचीही भेट घेतली. एकेकाळी दाऊद टोळीत असलेल्या छोटा राजनच्या विरोधात अमर नाईक आणि पर्यायाने अश्विन नाईक टोळीमध्ये जोरदार धुमश्चक्री होत होती. आईच्या निधनानिमित्ताने सांत्वनासाठी आलेल्या अश्विनमुळे आता त्यांच्यामध्ये तडजोड झाली असावी, अशी चर्चाही पोलीस वर्तुळात सुरु झाली. अमर नाईक सक्रिय असताना त्याचे अनेक म्होरके दाऊदसाठी काम करणाऱ्या छोटा राजनने टिपले होते. त्यामध्ये प्रामुख्याने रम्या भोगले तसेच शिक्का नगर येथील दशरथ रहाणे या अमरच्या अत्यंत विश्वासू साथीदारांचा समावेश होता. दशरथ रहाणेची लालबाग येथे अंगावर शहारा येईल अशा रीतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र या दुःखाच्या क्षणी अश्विन नाईक छोटा राजनच्या घरी येऊन गेला आणि त्यांच्या दुष्मनीतली धग कमी होऊन गेली. यानंतर अश्विनने लाईन बदलून हात मारता येतो का हेही पाहिले.

स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करणारया अश्विनने लाईन अजून क्लीअर नाही हे ध्यानात येताच छोटा राजनचा आदर्श घेत 'आत राहणे' पसंद केले आणि तो आता सुखरूप व समाधानी आहे. तो 'आत' किती समाधानी आहे याचे उदाहरण म्हणजे दोनेक महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या आताच्या कट्टर दुश्मन असलेल्या दाऊदच्या टोळीतील मुस्तफा डोसा बरोबर आर्थर रोड कारागृहात झालेल्या म्युझिक थेरपीच्या कार्यक्रमात 'शांताबाई'च्या गाण्यावर ठेका धरला होता ! दाऊदसुद्धा सुखशांती शोधत आर्थर रोड कारागृहात आला तर नवल वाटणार नाही, कारण या लोकांना इथे बाहेरपेक्षा जास्त सेफ्टी 'भेटते' ! यांच्या दुनियादारीतली ही खासियत आहे. आत जाऊन कामे करतात आणि काहींना काम दाखवतात ! आपले मतभेद विसरण्यासाठी हे लोक कुठलीही संधी सोडत नाहीत हे महत्वाचे वाटते आणि वैऱ्याला 'खतम' करण्यासाठी कधीही ते कधीही एका पायावर तयार होऊन एकत्र येतात हेही महत्वाचे आहे ....

राजकारणी आणि गँगस्टर दोघेही आपल्या दुनियादारीचे स्वरूप लगेच पालटतात अन अशा संधीचे सोने करतात. सामान्य माणूस मात्र आपसात भांडणे झाल्यावर चडफडत समोरच्याला म्हणतो की, " तू मेलास तरी तुझे तोंड बघणार नाही !" ....अन तो खरंच असंच वागून दाखवतो. असं वागणारया सर्वसामान्यांची संख्या मोठी आहे. हे असे वागतात कारण यांना दुनिया अन लाईफ कळलेलीच नाही. राजकारणी लोकांच्या खोट्या शीतयुद्धाला बळी पडून आपसातील संबंध बिघडवून टाकणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यांनी या लोकांपासून काहीतरी शिकावे, त्यातून नाती शाबूत राहतील !!
फेसबुकवर एकमेकांची डोकीफोड करणाऱ्या लोकांनी राजकारणी अन गँगस्टर्सकडे बघावे कारण 'जीवन त्यांना कळलेय हो !" .....

'राजकारणी आणि गँगस्टर हे दोघे एका माळेचे मणी असतात' असा अन्वयार्थ या पोस्टमधून सामान्य माणसाने काढू नये हे सांगायचे राहिलेच की ....

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment