गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

अशोक कामटे, आम्हाला माफ करा!


28 नोव्हेंबर 2008. रक्षकनगर, पुणे. दुपारचे एक - सव्वाएक वाजलेले होते. रणरणते ऊन डोक्यावर होते तरीही रस्त्याच्या दुतर्फा विमनस्क अवस्थेतील पडलेल्या चेहऱ्याच्या लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे खिळल्या होत्या. दुरून वाहनाचा आवाज येताच लोकांमध्ये एकच कुजबुज वाढली. सर्वांची अस्वस्थता वाढली. सायरनचा आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसे लोकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कर्णकर्कश्श आवाज करत अँब्यूलन्स आणि पोलिसांच्या गाड्यांच्या ताफा, रोरावणाऱ्या आवाजासह तिथे दाखल झाला. कुटुंबीयांच्या अश्रुंचे बांध तर गेल्या कित्येक तासापासून वाहत होते, सर्वत्र शोकाकुल वातावरण होते. अखेर ती वेळ आली आणि अँब्युलन्सचे दार उघडून तिरंग्यात लपेटलेले, भारतमातेच्या वीरपुत्राचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. अदबीने अन सरकारी इतमामात पार्थिव आता घरात आणले गेले. सर्वच जण गलबलून गेले होते, काय बोलावे काहीच सुचत नव्हते, लोक आपल्या अश्रूंना वाट करून देत होते, बाहेरून 'अमर रहे'चा घोष आवाज कानावर पडत होता. तो राजबिंडा देखणा योद्धा मात्र तिरंग्यात शांतपणे पडून होता, त्या सर्व घनगंभीर वातावरणाला छेद दिला त्या लहानग्याच्या शोकाकुल हाकेने! 'डॅडी, तुम्ही बुलेटप्रुफ जॅकेट का घातलं नव्हतं, यु कम बॅक डॅडी 'अशा शब्दांत तो छोटा मुलगा आपल्या जन्मदात्या पित्याला हाका मारत होता. त्याच्या शोकाकुल हाकांनी उपस्थितांचा जीव हेलावला. त्या लहानग्या मुलाचे नाव राहुल अशोक कामटे! त्याच्या शेजारी चिरनिद्रेत पडून होते ते भारतमातेचे थोर सुपुत्र शहीद अशोक कामटे!

26 नोव्हेबरच्या मुंबईतील दहशतवाद्यांचा धैर्याने सामना करताना कामटे शहीद झाले आहेत, याची कल्पना त्यांचा मोठा मुलगा अर्जुन, वडील मारूतराव, पत्नी विनिता यांना होती, पण लहानग्या राहुलला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हती. वडिलांचे पार्थिव पाहिल्यावरचा त्याचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. कामटेंचे पाथिर्व गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमाराला मुंबईहून रक्षकनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथे अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

अशोक कामटे यांच्या भगिनी शर्मिला सराफ या दुबईहून पुण्यात पोहचल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला त्यांचे पार्थिव भव्य मिरवणुकीद्वारे वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यावेळी विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी 'शहीद अशोक कामटे अमर रहे'च्या घोषणा दिल्या. पुणे शहराच्या वतीने तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी, सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी आणि विविध संघटनांनी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर सरकारी इतमामात बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारवाड्यावर सभेचे आयोजन केले गेले. दरम्यान काळ मात्र अतिरेक्यांचे पाकपिशाच्च आपल्या अंगाखांद्यावर खेळवत पुढे सरकत गेला!

आज 26 नोव्हेबर 2026… दिनदर्शिकेत दरवर्षी हा महिना येतो, ही तारीख येते, आपण अजूनही श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या फोटोंचे डिजिटल फ्लेक्स लावतो आणि आपली बेगडी देशभक्ती बाजारू स्वरूपात मांडतो. देशाचे राज्यकर्ते एक्स ट्विटरवरून श्रद्धसुमने अर्पित करतात. लोक फेसबुक, एक्स, व्हॉटसएपच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात. काही ठिकाणी रक्तदान शिबिर होतात, तर कुठे सामाजिक उपक्रम होतात. काही ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, तर कुठे अजूनही लोकं मेणबत्त्याच लावतात! असं करून हा दिवस मावळतो, 27 नोव्हेंबर येतो आणि आपण पुन्हा आपापल्या दैनंदिन भोकसेगिरीत रुजू होतो. पुन्हा पुढच्या वर्षीच आपल्याला कामटे आठवतात, मुंबईवरचा अतिरेकी हल्ला आठवतो; 26/11 च्या दिवशी आपल्याच शहिदांच्या स्मृती आम्ही हाडे चघळल्यागत चावून चावून खातो आणि दरवर्षी पुरवून पुरवून वापरतो. आपण 26/11 हा एक पोकळ देशभक्तीचा इव्हेंट केलाय. ज्याप्रमाणे 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे तसंच आपण 26 नोव्हेंबरचे करून टाकले आहे !

26/11 चे एक ठोकळेबाज साचेबंद सेलिब्रेशन आपल्या डोक्यात पक्के झालेय. आपल्या पुळचट देशभक्तीचे अचाट प्रदर्शन करण्यासाठी आम्ही या दिवसाचा जमेल तितका वापर करत आहोत. कारण त्यापलीकडे आपली मजल जातच नाही, उगाच का इंग्रज आपल्या बोडख्यावर दिडशे वर्षे बसून होते! आपण करणार तरी काय, कारण आपल्या धमन्यातून वाहणारे लालभडक रक्त कधीच गोठून काळपट होऊन गेलेय. आपल्याला संताप येत नाही, आलाच तर तो कायम राहत नाही. आपल्या मुठी वळत नाहीत, गळ्यावरच्या शिरा ताणल्या जात नाहीत. आपली मनगटे ढिली पडलीत. आमच्या मस्तकातल्या मेंदूत सूडाचा वणवा पेटत नाही. आपण बथ्थड डोक्याचे आहोत. सगळे कसे दरवर्षी सालाबादच्या चालीवर आपण मागून पुढे नेतो आहोत.

आम्हाला कामटेंच्या हत्येचा बदला घ्यावा वाटत नाही, आपण कसाबला फासावर लटकावून समाधानी झालो आहोत! किती भिकारडे अल्पसंतुष्ट आहोत आपण! लाज वाटते मला कधी कधी, आपल्यासारख्या बाजारबुणग्या लोकांनी भरलेल्या देशासाठी ह्या महान लोकांनी आपले बलिदान दिलेय! बदल्यात आपण काय दिलेय? 26/11 ची एक झापडबंद प्रोटोटाईपची श्रद्धांजली ! आपल्या राज्यकर्त्यांची थोरवी तर काय वर्णावी? शब्द अपुरे पडतात कृतघ्न समाजासाठी आणि असहाय कारभाऱ्यांसाठी! आपला संताप हा तात्कालिक पाण्यावरच्या बुडबुडया सारखा नि आमच्या सारख्या करंट्या लोकांसाठी ह्या वीरांनी बलिदान दिलेय! आम्ही 26/11 वर एक मस्त सिनेमा बनविला आणि पॉपकॉर्न खात बघितला हे काय कमी आहे का?

कामटे साहेब, आम्हाल माफ करा! आम्हा सगळ्यांचे माहित नाही, पण मी तर तुमच्या मुलाला अजूनही भेटू शकलो नाही! पण जरी कधी भेटलोच तर किमान मी तरी तुमच्या मुलाच्या नजरेस नजर देऊ शकणार नाही कारण मी देखील या 140 कोटी बाजारबुणग्यापैकीच एक आहे आणि वर तोंड करून मी कोडग्याप्रमाणे 26/11 ला तुम्हाला श्रद्धांजली वाहतो! त्याशिवाय आम्हाला येते तरी काय ? म्हणून म्हणतो कामटे साहेब आम्हाला माफ करा !! तुम्ही गेल्यानंतर चांबळी या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील लहानशा गावात कित्येक दिवस चुली पेटल्या नव्हत्या, लोकांचे चित्त स्थिर नव्हते. आजही तिथले लोक तुमच्या साठी अश्रू ढाळतात पण आम्ही? आमचे काय ? आमचे उत्तरदायित्व कोण ठरवणार आहे की नाही? आमच्या राज्यकर्त्यांना कोण जाब विचारणार आहे की नाही? हे सर्व कधी होणार? तोपर्यंत किती 26/11 ची नुसती पोकळ पारायणे आम्ही करणार? आम्हाला कशाचीही चाड नाही हेच खरे आहे, तुम्हीच चुकलात सर! तुम्ही आमच्यासाठी बलिदान द्यायला नको होते, तुमचेही कुटुंब होतेच की! तुम्हालाही मुलेबाळे अन् आईवडील होते, सहचारिणी होती. तरीही तुम्ही गेलात, आम्ही बघा कसे मजेत राहतो आहोत आणि शहाजोगपणे श्रद्धांजल्या वाहत आहोत !! आज 18 वर्षे झाली तुम्हाला जाऊन, जरी शंभर वर्षे झाली तरी आम्ही तसेच राहू! पोलीस दलातील काही चेहरे पाहा, त्यांनी कसं मस्त छापून घेतलं आहे, तुम्हीच आपलं देशप्रेम की काय त्याच्या भरात गेलात !

काही वर्षांनी 26/11 चे विशेषत्व काय होते असा प्रश्न पुढच्या फेस्बुकी पिढीने विचारला नाही म्हणजे मिळवले. इतके सर्व असूनही 26/11 ची आणि कामटे साहेबांची माहिती द्यावीशी वाटतेच. कारण या दिवसाला गंध आहे तो शहिदांच्या घरच्या लोकांच्या अश्रूंचा अन शहिदांचे रक्त मिसळलेल्या पवित्र मातीचा! मुंबईवरील हल्ल्याला आज 18 वर्षे पूर्ण होताहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती. यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक जखमी झाले. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. तर, या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.

शहीद अशोक कामटे यांचे आजोबा नारायण कामटे हे राज्याचे पहिले पोलिस महानिरीक्षक होते. त्यानंतर कामटे यांच्या वडिलांनी लष्करात उल्लेखनीय कामगिरी बजावली. ते कर्नल पदावरून निवृत्त झाले. अशोक कामटे ही कामटे कुटुंबातील देशासाठी लढणारी तिसरी पिढी. कामटे यांचा जन्म 23 फेब्रुवारी1965 रोजीचा. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास व इंग्रजी विषयात बीएची पदवी घेतली आणि त्यानंतर दिल्ली येथील सेंट स्टीफन कॉलेजमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.1989 मध्ये ते आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. मुळातच खेळाची आवड असणाऱ्या कामटे यांनी स्विमिंग, आर्मर कॉम्बॅटमध्ये पदके मिळवली. शूटआऊटमध्ये त्यांनी पोलिस रेकॉर्डही प्रस्थापित केले आहे. पोलिस उपाधीक्षक म्हणून त्यांनी भंडारा येथे उमेदवारी केली. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. 1996-97 च्या दरम्यान डिफेन्स सव्हिर्सेसमध्ये ते रूजू झाले. 1999-2000 मध्ये ते बोस्निया येथे प्रशिक्षणासाठी गेले. 2006-08 ही दोन वर्षे त्यांनी सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून आपली कारकीर्द अफाट गाजवली. त्यानंतर ते पोलीस सहआयुक्त म्हणून मुंबईत कार्यरत होते.

पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती पदक, युनायटेड नेशन्सचे पदक, स्पेशल सव्हिर्सेेस मेडल, विदेश सेवा मेडलने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं. दहशदवाद्यांशी दोन हात करण्याच्या अखेरच्या कामगिरीवर जाण्यापूर्वी काही मिनिटे आधी, ते पत्नी विनिता आणि वडील मारुतराव यांच्याशी फोनवर बोलले होते. दहशदवाद्यांनी हल्ला केला तेव्हा कामटे हे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी होते. राज्य गुप्तचर खात्याचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल अरहाना यांच्याबरोबर ते टिव्ही पहात होते. त्यावेळी आपणही या पोलिस कारवाईचा एक हिस्सा असायला पाहिजे, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांचा मोबाइलवर कामटे यांना कारवाईमध्ये सामील होण्याविषयी आदेश देणारा फोन आला. काहीतरी करून दाखवण्याची हीच संधी आहे, असे म्हणून ते बाहेर पडले.

अशोक कामटे यांची जिगरबाज IPS अधिकारी अशी ओळख राहिली असली तरी त्यांची पोलिस दलात मात्र आणखी ओळख होती एक 'मिस्टर बॉडीबिल्डर' म्हणून! एके काळी महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वात ताकदीचे दल म्हणून परिचित होते. त्याचमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हेगारी कमी होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलिस चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत असत. गुन्ह्यांचा तपास लावण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हातखंडा मानला जाई. याचबरोबर इतर क्षेत्रातही महाराष्ट्र पोलिसांनी आपले नाव रोशन केले होते. अशोक कामटे हे एका शूर कर्नलचे पुत्र असल्याने लहानपणापासूनच त्यांना घरात व्यायामाचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे लहानपणापासून पिळदार शरीर बनविल्याने अशोक कामटेंनी महाविद्यालयीन काळात बॉडी बिल्डिंगचा छंद लागला. ते तालमीच्या आखाड्यासोबत जिममध्ये जाऊ लागले. मेहनत व व्यायामाचा छंद जडल्याने त्या काळात अशोक कामटे यांनी अनेक ठिकाणी बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या होत्या. त्याचदरम्यान अपार अभ्यास व शारीरिक कष्ट घेत ते IPS अधिकारी झाले. त्यानंतरही त्यांनी पोलिस दलातून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यश मिळवले. पुढे यूएनचे मेडल जिंकले. त्याचमुळे अशोक कामटेंची पोलिस दलात बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जाऊ लागले.

अशोक कामटे मूळचे पुण्याजवळील सासवडचे. मात्र त्यांच्या कटुंबियांचे वास्तव्य पुण्यातील पिंपळे निलख परिसरात आहे. 1989 च्या IPS बॅचचे अधिकारी राहिलेले कामटे सर्वात कर्तव्यसन्मुख यशस्वी अधिकाऱ्यापैकी गणले गेलेत. अपहरण केलेल्या व दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठीचे खडतर प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. त्यामुळेच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कामटे त्यांच्यावर तुटून पडले होते. हल्ल्यादरम्यान अशोक कामटे यांच्याकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांशी लढताना मुंबईतील कामा हॉस्पिटलजवळ कामटे शहीद झाले. मरणोत्तर अशोक चक्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अशोक कामटेंच्या पत्नी विनिता कामटे यांनी आपल्या धाडसी पराक्रमी पतीवर 'टू द लास्ट बुलेट' हे पुस्तक लिहिलेय. ते आवर्जून वाचले पाहिजे! या पुस्तकात विनितानी अशोक कामटे यांचा जीवनपटच मांडलाय. मुंबई हल्ल्याच्या रात्री अशोक कामटेंनी आपली पत्नी विनिता व मुलांशी केलेली बातचीत याची सविस्तर माहिती यात आहे. त्या लास्ट कॉलनंतर तासाभरात कामटे शहीद झाले होते. पुस्तक वाचताना अंगावर काटे उभे राहतात. त्यात उपस्थित केलेले प्रश्न पोखरून काढतात. यात काही कॉन्स्पिरसी होती का असा प्रश्न नकळत मनात येतो! 'राष्ट्रीय हितासाठी काही माहिती जाहीर करता येत नाही' असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्यात आली असली तरी विनिता कामटे यांच्या प्रश्नांची उत्तरे कुणीतरी कधीतरी दिलीच पाहिजेत, असे राहून राहून वाटते!

अनुत्तरीत प्रश्नांच्या गर्तेत अन वैयक्तिक उत्तरदायित्वाच्या शोधात आम्ही अजूनही ठेचकळत आहोत! तुमचे बलिदान आम्हाला दीपस्तंभासारखे दिशादायी ठरो ही अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा तुमची माफी मागण्याचा शहाजोगपणा करुन थांबतो.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा