गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

अशोक कामटे, आम्हाला माफ करा!


28 नोव्हेंबर 2008. रक्षकनगर, पुणे. दुपारचे एक - सव्वाएक वाजलेले होते. रणरणते ऊन डोक्यावर होते तरीही रस्त्याच्या दुतर्फा विमनस्क अवस्थेतील पडलेल्या चेहऱ्याच्या लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे खिळल्या होत्या. दुरून वाहनाचा आवाज येताच लोकांमध्ये एकच कुजबुज वाढली. सर्वांची अस्वस्थता वाढली. सायरनचा आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसे लोकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कर्णकर्कश्श आवाज करत अँब्यूलन्स आणि पोलिसांच्या गाड्यांच्या ताफा, रोरावणाऱ्या आवाजासह तिथे दाखल झाला. कुटुंबीयांच्या अश्रुंचे बांध तर गेल्या कित्येक तासापासून वाहत होते, सर्वत्र शोकाकुल वातावरण होते. अखेर ती वेळ आली आणि अँब्युलन्सचे दार उघडून तिरंग्यात लपेटलेले, भारतमातेच्या वीरपुत्राचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. अदबीने अन सरकारी इतमामात पार्थिव आता घरात आणले गेले. सर्वच जण गलबलून गेले होते, काय बोलावे काहीच सुचत नव्हते, लोक आपल्या अश्रूंना वाट करून देत होते, बाहेरून 'अमर रहे'चा घोष आवाज कानावर पडत होता. तो राजबिंडा देखणा योद्धा मात्र तिरंग्यात शांतपणे पडून होता, त्या सर्व घनगंभीर वातावरणाला छेद दिला त्या लहानग्याच्या शोकाकुल हाकेने! 'डॅडी, तुम्ही बुलेटप्रुफ जॅकेट का घातलं नव्हतं, यु कम बॅक डॅडी 'अशा शब्दांत तो छोटा मुलगा आपल्या जन्मदात्या पित्याला हाका मारत होता. त्याच्या शोकाकुल हाकांनी उपस्थितांचा जीव हेलावला. त्या लहानग्या मुलाचे नाव राहुल अशोक कामटे! त्याच्या शेजारी चिरनिद्रेत पडून होते ते भारतमातेचे थोर सुपुत्र शहीद अशोक कामटे!

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६

विवाहितेसोबतचं लग्न - कन्नड साहित्यातलं भाष्य!



1988 च्या दरम्यान गिरीश कर्नाड यांच्या ‘नागमंडल’ या प्रसिद्ध नाटकात राणी नावाच्या विवाहित स्त्रीची आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या रमणा ह्या अविवाहित तरुणाची कथा अत्यंत प्रतीकात्मक आणि गूढ पद्धतीने चितारलीय. हे नाटक लोककथांच्या आधारे स्त्री-पुरुष संबंध, विवाहसंस्था आणि स्त्रीच्या भावनिक गरजांवर भाष्य करते. मध्ययुगीन ग्रामीण लोककथेचा कालखंड नाटकाच्या पार्श्वभूमीत आहे.

'मलेगळल्ली मदुमगळू' म्हणजे 'डोंगरदऱ्यांतील नवरी'!. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुवेंपू यांच्या 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अत्यंत गाजलेल्या कादंबरीचे हे शीर्षक. या कादंबरीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मलेनाडूच्या निसर्गरम्य डोंगरदऱ्यांतील ग्रामीण जीवनाचे, निसर्गाचे, सामाजिक व्यवस्थेचे, रूढी परंपरेने ग्रासलेल्या समाजाचे वर्णन आहे..