बुधवार, २६ एप्रिल, २०१७

कल्पवृक्ष ....



बघता बघता पावसाच्या बातम्या हळूहळू कमी झाल्यात, कवींच्या कविता करून झाल्यात... आणि बघता बघता पाऊस थबकलाय देखील... इकडे काळ्या मातीने सगळे पाणी अधाशासारखे गटागटा पिल्येय... काही ठिकाणी कोवळे हिरवे कोंब आलेत तर मातीच्या सांदीत दडून बसलेल्या चुकार बीजाला कुठे तरी अंकुर देखील आलेत.. वाळून काडी कामटी झालेल्या खोडाला पालवी देखील फुटलीय... पण हे सारं कुठं होतंय ? .. हे सारं लगोलग फक्त काळ्या मातीतच होतंय... मात्र बरड रानात, मुरमाड जमिनीत हे इतकं सहजासहजी होत नाहीय....

'सिंहासन' - त्रिकालाबाधित राजकारणाचा मानबिंदू..

सिंहासन .. 

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेलं दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मुटकुळे करून बसलाय.
काही वेळापूर्वी त्याला दस्तुरखुद्द 'सीएम'चा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्याच फोनच्या विचारात आहे.
इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडिओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण मोलकरीण छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी!
तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो.

ती आत येते. रेडिओवर मंद स्वरात गाणे सुरु असतं - 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं, हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं, अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… '
दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो.
बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते.
दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे.
त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची रिंग वाजते.
पलीकडून संवाद सुरु होतो -
"श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं? काय म्हणत होते श्रीमंत?"
दिगू उत्तरतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचं विचारत होते…"
पलीकडून प्रतिप्रश्न येतो "पण असं झालं काय अचानक. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?"
बोलत बोलत आलखनपालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोऱ्या असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मीपणे हसत उत्तरतो,
"काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

सौतन - पडद्यामागची करुण कथा ...



१९८२ चा सुमार असावा. फिल्मसिटीत 'सौतन'चे शुटींग चालू होते. आपली लाडकी पत्नी रुकू (टीना मुनीम) हिच्यापासून दुरावला गेलेला श्याम (राजेश खन्ना) सैरभैर होऊन जातो. आपल्या मनातले वादळ शांत करण्यासाठी ऑफिसमध्ये स्टेनो असणाऱ्या गोपालकाकांच्या (श्रीराम लागू) घरी त्यांच्या मुलीला राधाला (पद्मिनी कोल्हापुरे) भेटायला येतो असा सीन शूट होत होता. काही केल्या राजेशला तो सीन देता येत नव्हता. सलग तीन दिवस त्याने त्या सीनसाठी घालवले. दिग्दर्शक सावनकुमार टाक नाराज झाले. चौथ्या दिवशी ते राजेशच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तर त्याने तिथेच हलका 'डोस' लावायला सुरुवात केली होती. सावनकुमारनी त्याला स्वतःला सावरायला सांगितलं. काही वेळ निशब्द शांततेत गेले. त्याचे डोळे गच्च भरून आले होते, चेहरा विमनस्क झाला होता, केस अस्ताव्यस्त झाले होते. तो हलकेच उठला आणि सावनकुमारना काही कळण्याआधी त्यांना घट्ट मिठी मारली. तो लहान मुलांसारखा ढसाढसा रडला. त्याला शांत व्हायला बराच वेळ लागला. त्या नंतर काही मिनिटांत तो बाहेर आला आणि एका फटक्यात त्याने शॉट ओके केला. कुणाशीही न बोलता सेटवरून तडकाफडकी निघून गेला....

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

वियोगकविता ...



लढाईवर गेलेल्या एका तरण्याबांड वीराचा मृतदेह घरी आणलाय आणि त्याच्या पाठी आता त्या घरात त्याची तरूण विधवा पत्नी व तान्हुले मूल मागे राहिले आहेत. आपल्या पतीच्या कलेवराकडे शोकमग्न अवस्थेत दग्ध झालेली ती स्त्री स्तब्ध झाली आहे. तिने आपले दुःखावेग मोकळे करावेत मनातले अश्रुंचे बांध फुटू द्यावेत यासाठी तिचे स्वकीय प्रयत्न करताहेत. काहीही केले तरी अतीव दुःखामुळे समाधिस्त स्तब्धतेत गेलेली ती स्त्री काही बोलत नाही. हे पाहून तिथे असणारी एक वृद्धा उठते अन त्या वीरपत्नीच्या मांडीवर तिचे तान्हुले ठेवते. तिच्या मांडीवर ते तान्हुले येताच तिला वास्तवाचे भान येते आणि तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो. कवी लॉर्ड टेनिसन यांच्या 'Home they Brought her Warrior Dead' या वियोगकवितेतली ही काव्यकथा आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या करते...

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ....अत्रेंच्या कविता


सिनेमागृहातल्या पडद्यावर दृश्य दिसतेय - 'देव्हारयासमोर बसलेली तिशीतली ती प्रसन्न मुद्रेतली तेजस्वी स्त्री निरंजनासाठी, समईसाठी कापूस वळून त्याच्या नाजूक वाती तयार करत्येय. कानातली कुंडले, गळ्यात काळ्या मण्यांची सर, सैल अंबाडयात खोवलेले फुल तिच्या सध्या सोज्वळ व्यक्तिमत्वास खुलून दिसते आहे. तिच्या समोरच्या लाकडी देव्हारयातील देवांच्या मूर्तींवर पिवळसर आभा पसरलेली आहे. समईची मंद ज्योत तेवते आहे, तिचा उजेड सारया खोलीत पसरलेला आहे. तिच्या मागे असणारया भिंतीवर देखील देवांच्या तसबिरी डकवलेल्या आहेत. तिच्या शेजारी एक विधवा वृद्धा एका मुलाचे डोके मांडीवर घेऊन बसलेली आहे. काही वेळापूर्वीच तिथे भावंडांत पाय दाबण्यावरून भांडण झालेलं आहे, 'घरातली सगळी लहान सहान कामे एकानेच का करायची ? एकानेच का ऐकायचे ?" असा सवाल एका गोजिरवाण्या मुलाने केला आहे. इतक्यात आपला अभ्यास संपवलेला दुसरा एक साजिरा मुलगा त्या वृद्धेस लाडाने म्हणतो की, "ए आजी एखादं गाणं म्हण की गं !". त्यावर ती वृद्धा हसून म्हणते की, 'मी जर गाणं गायलं तर सगळी आळी गोळा होईल हो ! मग त्या सुहास्यवदनेकडे बघत ती म्हणते, "यशोदे तूच म्हण की गं गाणं !" आणि ती विचारते, "ते चिंधीचं गाणं म्हणू का ?"तो गोजिरवाणा सोडून सारे जण तिला होकार देतात आणि ती गाऊ लागते- 'द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी गं पितांबर दिला फाडून..." आता खोलीत बसलेले सगळेच जण एका तालात हळुवार टाळी वाजवून तिला साथ देतायत...' सिनेमागृहात हे दृश्य पाहणारया सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात. साल होते १९५३. चित्रपट होता 'शामची आई'. हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

मैत्र जीवांचे .....



शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारती नसतात,
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.

सोमवार, १० एप्रिल, २०१७

गोडी होळी-धुळवडीची !


नागरी भागातील बेचव होळी आणि धुळवडीच्या तुलनेत हे सण गावाकडं अधिक उजवे वाटतात. उपदेशाचे डोस पाजणाऱ्या लोकांचे या दोन दिवसात तिकडं काहीच खरं नसतं. त्यातही प्रत्येक गावात या सणांची रंगत न्यारीच असते. माझ्या गावाशेजारी लमाण तांडा आहे. तिथल्या होळीची लज्जत जगात सर्वात न्यारी असावी. आजच्या दिवशी विवाहित लमाण स्त्रिया आपल्या नवऱ्यांना वेताच्या फोकाने किंवा पोकळ बांबूने फटके देतात. नवरोबाने उत्तरादखल हात उचलायचा नसतो. त्याला फार तर एखादा वार चुकवता येतो. खास वेशभूषा केलेल्या देखण्या केशभूषेतल्या बायका विशिष्ठ हेल काढत आगळ्या सुरात गाणं गात हा उद्योग पार पाडत असतात. नवरोबांना ठोकून झाल्यावर उन्हं काहीशी डोक्यावर आल्यानंतर आपआपल्या दारापुढं पाच गोवऱ्यांची होळी पेटवून झाली की मग जेवणाचे वेध लागतात. चुलीवर शिजवलेलं तिखटजाळ मटण आणि पुरणपोळी दोन्हीचा बेत असतो. नवसागरापासून बनवलेली गावठी दारू अफाट झिंगवते. दिवस नुस्ता झिंगाटून जातो. दुपार कलताना माणसं दमून जातात. बसल्या जागी लुडकतात. होळीच्या या आगळ्या वेगळ्या रिवाजात मनमोकळं जगताना सगळी दुःखे वेदना विसरून सहजीवनाचा खरा आनंद घेताना कुणीही जुनं चंदन उगाळत बसत नाही. की कुठला कृत्रिमतेचा लवलेश त्यांच्या वागण्यात राहत नाही. जुनी भांडणं मिटवून आपसातला सलोखा टिकवण्यावर भर राहतो.

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

एक उनाड दिवस .....


"उंडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय..... "
माझी आई, आजी तिच्या संभाषणात ही म्हण अधून मधून वापरायची. तेंव्हा तिचा अर्थ कळत नसे. आता तिचा अनुभव येतो. बेफिकीर उनाड माणसाला कशाचीही काळजी नसते, तो आपलं खुशाल फिरत राहतो. हे वेड त्याच्या डोक्यात इतकं भिनलेलं असतं की गोठ्यात गाय जर व्यालेली असली तर तो पठ्ठ्या तिचं तान्हं वासरू खांद्यावर टाकून जत्रेला जातो. मीही यातलाच एक...

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

चिंचपुराण....



प्रत्येकाच्या आठवणींना अनेक मुलामे असतात, अनेक कंगोरे असतात. नानाविध घटना आणि घटकांशी त्या निगडीत असतात. आठवणी जशा सुखाच्या दुःखाच्या असतात तशा विविध चवीच्याही असतात. म्हणूनच संभाषणात म्हटले जाते की. आठवणी या कधी कडूगोड असतात तर कधी आंबटगोड असतात. आंबट आठवणींचा विषय निघावा अन त्यात चिंचेचा उल्लेख होत नसावा असे कुठे घडत नाही. या आंबट आठवणी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते प्रेमाच्या आंबटगोड शेवटापर्यंत मनात झिलमिलत असतात. पूर्वी रेडीओवर ‘मधुचंद्र’ चित्रपटातील एक गाणं नेहमी लागायचे त्यात चिंचेच्या झाडाचा वेगळाच उल्लेख होता. “हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मिरी बघ निळसर पाणी..” अशा काहीशा त्या पंक्ती होत्या. त्यातला नायक सांगतो की हे चिंचेचे झाड त्याला चक्क चिनार वृक्षासारखे दिसते आणि त्यामुळे त्या झाडाखाली उभी असलेली त्याची प्रियतमा ही एखाद्या काश्मिरी नवतरुणीसारखी दिसते आहे.. चिंचेच्या झाडाचे चिनार वृक्षाशी असणारे साधर्म्य याहून देखण्या शब्दात व्यक्त झालेले नाही. असो..

गुरुवार, ३० मार्च, २०१७

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...



खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.