गुरुवार, ९ जून, २०१६

गावाकडचा पाऊस ....



गावाकडे आता पाऊस सुरु झालाय...माहेरवाशिनी सारखे त्याचे डोळ्यात पाणी आणून स्वागत झालेय...
मी इकडे सोलापूरात. इथला पाऊस अगदीच अरसिक.
त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखलं पडून जातो, त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. तो येतो आणि पडून जातो. खेरीज इकडे शहरी भागात त्याचे रुक्ष वर्णन मॉन्सूनने होते...
गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते. पावसाच्या स्वागतासाठी पेज होते. त्यासाठी माजघरातल्या चुलीवर पातेले चढले की बाहरेच्या पावसाचा आवाज, चुलीवरल्या पातेल्यातला रटरटणारा आवाज आणि चुलीतल्या जळणाच्या वासात मिसळलेला मृद्गंधाचा वास सारं कसं मस्तकात भिनत जातं....

मंगळवार, ७ जून, २०१६

मायेचं कष्टाळू गणगोत - बैल


मऊसुत रेशमी अंगाचं पांढरं शिफट खोंडं होतो तेंव्हा धन्याने घोडेगावच्या बाजाराहून आणलं होतं तो दिवस अजून आठवतो. तेंव्हा गावात कैकांच्या शेतांनी मोट होत्या. पाऊसपाणी वेळेवर होत होतं. सगळ्यांच्या रानात औत ओढण्यापासून, नांगरट, कुळवण, मळणी आणि उसाची गाळणी अशी खंडीभर कामं असायची. त्या कामांसाठी बैल कमी पडायचे, मग एकमेकाचे बैल घेतले दिले जायचे. दावणीत तेंव्हा कधी टाचकं पडलेलं नसं. कडबा असायचा. पाऊसपाणी झालं की बाटूक असायचं, हिरवा गवत-घास असायचा. पाऊस आटला की भरडा- कडवळ. जेंव्हा औतं जोरात होते तेंव्हा धन्याने कधीकधी गुळपोळी सुद्धा खाऊ घातली होती.

सोमवार, ३० मे, २०१६

'आमच्या काळी असं नव्हतं (?)......'



आताच्या तरुण पिढीचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्वतःचे असे स्वतंत्र आणि स्वागतार्ह आहेत. यासाठी कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो. पण काही चाळीशी गाठलेली वा चाळीशी पार केलेली मंडळी याच मुद्द्यावर बोलताना थोडा कद्रूपणा करतात.
'ही पिढी फार नशीबवान बघा नाहीतर आमच्या पिढीला असली सुखं नव्हती' असा सूर जनरली ते आळवत असतात.
मित्रांनो हे तद्दन खोटं असतं, ही धूळफेक असते.

'औदुंबर' - बालकवी



औदुंबर...
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

औदुंबर ही बालकवींची ओळख म्हणून ख्याती पावलेली कविता. ही एक अनुभवदायी प्रचीती देणारी कविता आहे, तिला समजावून घेण्यासाठी दुसऱ्याच्या संदर्भांची, स्पष्टीकरणांची गरज भासत नाही. अत्यंत प्रवाही, कमालीची सोपी, साधी नादमधुर अशी ही कविता आहे. तिच्यात गेयता आहे, तिला ताल आहे. लय आहे. ती यमकांची वा प्रतिमांची चतुरस्त्र जुळवाजुळवी नाहीये. विशाल कॅनव्हासवर चितारलेल्या एखाद्या टुमदार गावकुसाबाहेरच्या मनोहारी निसर्गरम्य दृश्यांच्या पोट्रेटची परिणामकारकता या कवितेतून बालकवींनी साधली आहे. निसर्गाचे इतके देखणे वर्णन एक अभिजात प्रतिभावंत कवीच करू शकतो, बालकवी हे तर प्रतिभेचे अलौकिक देणे लाभलेले सौंदर्यदृष्टीची जादुई पारख असणारे कवी होते.

गुरुवार, २६ मे, २०१६

आठवणीतले विलासराव...



विलासरावांच्या ६०व्या वाढदिवशी ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांचे 'राजहंस' हे पुस्तक मुद्रा प्रकाशनने प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन त्यावेळचे राज्यपाल रा.सु. गवई यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची कल्पना भावेंनी विलासरावांना दिली. त्यावर विलासराव त्यांना फोनवर म्हणाले की, " तुम्हाला त्यात ज्या कोणत्या मान्यवरांचे फोटो द्यायचे असतील ते द्या; पण दोन फोटो द्यायला विसरू नका, एक वसंतदादा पाटील यांचा आणि दुसरा माधवराव शिंदे यांचा. पुढे राजहंसचे थाटात प्रकाशन झाले. त्या पुस्तकाची प्रत भावेंनी विलासरावांना दिली. वसंतदादा आणि माधवरावांचे फोटो पाहून ते काहीसे हळवे झाले. कारण तेंव्हा हे दोन्ही नेते जगात नव्हते आणि विलासराव म्हणाले, "तुम्हाला हे दोन फोटो टाकायला सांगितले त्याचे कारण म्हणजे मला वसंतदादांनी राज्यमंत्री करून गृहखाते दिले आणि कॅबिनेट मंत्र्याला देतात त्याप्रमाणे मी राज्यमंत्री असताना मला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री केले."

मंगळवार, १७ मे, २०१६

आदय क्रांतिकारक उमाजी नाईक - क्रांतीचा गौरवशाली इतिहास...



३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. या थोर आद्य क्रांतीकारकाचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते...
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून ते आद्यक्रांतिवीर ठरतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत ब्रिटिशांशी झुंज दिली...

~~~~~~~~

ब्रिटिशांनी १८१७ मध्ये भारतात मद्रास लिटररी सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेकडून मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर अँड सायन्स नावाचे 

नियतकालिक चालवले जात होते. त्याचे पाच शृंखलात ३८ अंक काढले गेले. १८३३ ते १८९४ या काळात ते प्रकाशित केले गेले. १७५० पासून ते १८९४ पर्यंतच्या विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बहुपेडी माहितीचं हे संकलन स्वरूप होतं. यात पानाफुलांपासून ते किटकापर्यंत आणि तापमान - पर्जन्यमानापासून ते क्रांतीकारकापर्यंत व जात - वंश भेद इथपर्यंतचे मुद्दे, घटना, व्यक्ती विशेष चर्चिले गेलेत. हे सगळं तटस्थ वृत्तीने केल्याचे जाणवतं. याच उपक्रमा अंतर्गत 'ऍन अकाऊंट ऑफ द ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन ऑफ द ट्राईब ऑफ रामोसीज इनक्लुडिंग लाईफ ऑफ द चीफ उमैया(उमाजी) नाईक' या कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश लिखित पुस्तकात उमाजी नाईक आणि रामोशी समाज यांचा सविस्तर इतिहास मांडला आहे. अलेक्झांडर मॅकिंटॉश हे मद्रास आर्मीच्या २७ व्या रेजिमेंटमधील लष्करी सेवेत होते यामुळे या ऐतिहासिक दाव्यांना, तथ्यांना महत्व आहे. यात एके ठिकाणी उमाजी नाईक याने बंड केले असा उल्लेख आहे, विशेष म्हणजे बंड हा मराठी शब्द BUND असा लिहिलाय. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान मराठा राज्याचे नायक शिवाजी होते असा महत्वाचा उल्लेख यात आढळतो.

शुक्रवार, १३ मे, २०१६

वढू तुळापूरची गाथा .....



राजे, इथल्या पाण्यात अजूनही तुमचे प्रतिबिंब दिसते,
हताश झालेला औरंग्या दिसतो, त्या दिवशी अबोल झालेली इथली सृष्टी अजूनही तशीच थबकून आहे !
राजे इथे तुमच्या किंकाळ्या कुठेच ऐकायला येत नाहीत वा ना हुंदके ऐकायला येतात !
कवीराज कलश यांचे थोडेसे उमाळे मात्र इथल्या हवेत अजूनही ऐकता येतात ! ज्यांनी तुमचा छळ केला ते रात्र रात्र झोपू शकत नसत त्यांच्या कन्हण्याचा आवाज मात्र इथल्या मातीला कान लावला की ऐकायला येतो !
राजे तुमची जिव्हा जेंव्हा कापली त्या दिवशीपासून इंद्रायणी जी अबोल झाली ती आजतागायत मूक बनून राहिलीय !

मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ....एक वेध इतिहासाचा... -



मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुंण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला - सिंध, मुलतान (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ), आताच्या ब्रम्हदेश - बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आताच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता तरी सर्व राज्ये - राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.

गुरुवार, १२ मे, २०१६

अल्लाउद्दिन खिलजी ते शिवछत्रपती .....

 

एक काळ होता जेंव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् शेकडो वर्षांपूर्वी मोठा घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली, काही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते..

अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण राजा रामदेवराव यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो कमीतकमी शंभर कोस (म्हणजे सव्वाशे किलोमीटर) घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही? मग आमचे सैन्य होते कुठे? आमचा राजा बेसावध होता. पण सेनापती काय करत होता? सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच. त्याचे नाव शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या सैन्यासह दूर कोठेतरी गेला होता. यात्रेला गेला होता म्हणे. अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती. रामदेवरावाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले.

शिंदेशाहीचा देदिप्यमान इतिहास .....


शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजी, सर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजी, वयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजी, काळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवराव, स्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणाऱ्या  विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवराव, अन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....