शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

प्रेमाच्या लाडूंची गोष्ट!



स्त्री अविवाहित असो की विवाहित तिला मित्र असला की, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजूनही लोक भुवया उंचावून पाहतात. 'खुलूस'मधला संपूर्ण प्रवास एका मुलीच्या शोधातला आहे. तीन दशकांचा तो काळ आहे. त्यावर सविस्तर लिहिले तर ती एक कादंबरीच होऊ शकेल, इतका त्यात ऐवज आहे. असो. त्या मुलीचे नाव होते लक्ष्मी! कोविडच्या दुसऱ्या लाटेत जुन्या हैद्राबाद शहरात विपन्नावस्थेत तिचे देहावसान झाले. आज ती हयात असती तर तिच्या काही इच्छा नक्कीच पुऱ्या करता आल्या असत्या. मधल्या काळात तिची माझी एक जरी भेट झाली असती तरी तिला हायसे वाटले असते, तिचे जगणे सुसह्य झाले असते. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत आणि साऱ्याच गोष्टी उलगडून सांगता येत नाहीत! आज तिचा उल्लेख करायचा कारण म्हणजे आजचा दिवस राष्ट्रीय गर्लफ्रेंड्स डे! तसे तर तिला विसरता येणार नाही मात्र हा दिवस खास तिच्यासाठी! ही पोस्ट तिच्यासह एका परिचित व्यक्तीच्या न पाहिलेल्या मैत्रिणीसाठी, प्रेमिकेसाठी!

किशोरवयात असताना घरासमोरून दुपारच्या वेळेस जे दारोदार विक्री करत फिरणारे लोक असत त्यांच्यापैकी एक मडके विकणारे प्रौढ इसम होते. ते खांद्यावर मडकी घेऊन फिरत, लांबलांब ढांगा टाकत. त्यांच्या मुखी काही स्लोगन्स असत. "प्रेमाचा लाडू मडक्यात खावा, आधी मैत्रिणीबरोबर खावा नंतर बायको बरोबर खावा! रामभाऊची मडकी शेवटपर्यंत सोबत करतील धोका देणार नाहीत!". काळ निघून गेला. आता दारोदारी असे विक्रेते पहिल्यासारखे फिरत नाहीत. काही वर्षांनी पावसाळयाच्या एका कुंद दिवशी रामभाऊ सहज आठवले. कुंभार गल्लीपाशी त्यांचे घर होते इतकेच ठाऊक होते. घर शोधत गेल्यावर कळले की त्यांनी ते घर सोडलेय आणि शाहीर वस्तीत राहायला गेलेत. काही दिवसांनी तिथे कामानिमित्त गेलो होतो, योगायोगाने त्याही दिवशी आभाळ भरून आलं होतं! रामभाऊंची आठवण आली म्हणून सहज तिथे विचारणा केली. एकाने थेट त्यांच्या घरासमोर नेऊन उभं केलं.

दारातून डोकावून पाहिलं तर ओळखीचे कुणीच दिसेना. आतून एक तरतरीत पोरगा आला आणि त्याने त्याच्या आईला हाक मारली. स्वयंपाक अर्ध्यात टाकून पदर सावरत एक मध्यमवयीन स्त्री पुढे आली. कोण पाहिजेल? रामभाऊना भेटायचेय म्हटल्याबरोबर तिच्या डोळ्यांना धार लागली. पदराने डोळे पुसत हमसून हमसून रडू लागली. आतून आणखी एक जर्जर वृद्धा बाहेर आल्या. त्यांनी अगदी मायेने माझ्याकडे पाहिले. 'आत या, घरात बसून बोला!, दारात कामून उभं राहतासा!" म्हणत आत घेऊन गेल्या. अगदी साधे घर होते, रंगाचे पोपडे उडाले होते. बसायला पत्र्याच्या फोल्डिंगच्या खुर्च्या होत्या. आतल्या खोलीत गंजलेला पलंग दिसत होता. पहिल्या खोलीत भिंतीवर देवांच्या तसबिरी होत्या. एका प्रौढ पुरुषाच्या फोटोला घातलेला हार पुरता जीर्ण मळकट होऊन गेला होता. कडेला भिंतीत असलेल्या छोटेखानी कप्प्यात काही वह्या पुस्तके दिसत होती. खुंटीला दोन दप्तरे टांगलेली होती. ती मध्यमवयीन स्त्री कपबशीत चहा घेऊन आली. तिचा हात अजूनही थरथरतच होता. निघताना त्या वृद्ध स्त्रीने पाठीवरून हात फिरवला तेव्हा तिच्या मनातले मळभ निवळत गेलेले स्पष्ट जाणवलेलं!

दोन मिनिटे भेटावे म्हणून तिथे गेलो आणि तब्बल तासाभराने त्यांच्या घराबाहेर पडलो तेव्हा आकाश निरभ्र झाले होते. उंच गगनात काही पक्षी त्रिकोणी आकाराच्या थव्यात उडत होते. वाऱ्याचे मंद झोत वाहत होते, वातावरणात एक अनोखी प्रसन्नता एकाएकी आली होती. त्या घरातील वृद्धा म्हणजे रामभाऊंची थोरली वहिनी होती. ती मध्यमवयीन स्त्री म्हणजे त्या वृद्धेची सून. रामभाऊंच्या थोरल्या भावाचे अपघाती निधन झाले, त्यांनी भावाचे कुटुंब सांभाळले. त्याला तीन मुली आणि एक मुलगा होता. पैकी मोठ्या तिन्ही मुलींची जमेल तशी लग्ने करून दिली, पोरी सासरी नांदायला गेल्या. त्याच्या एकुलत्या मुलाला पायावर उभं केलं. त्याचंही लग्न लावून दिलं. त्यालाही एक मुलगा आणि एक मुलगी झाली. लग्नानंतर व्यसनाधिन होऊन तो अकाली मरण पावला. रामभाऊंनी जिथपर्यंत शक्य होतं तिथंपर्यंत गाडा ओढला आणि एके दिवशी झोपेतच त्यांचे निधन झाले. ते कुटुंब आता कुठे सावरत होते मात्र पुन्हा एकदा ते कोलमडले. रामभाऊंची त्यांच्या तारुण्यसुलभ वयात एका मुलीशी घनदाट मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, घरजावई व्हायची ऑफर टाळून ते कुटुंबासाठी झिजत राहिले. काही दिवसांनी तिचे लग्न झाले. रामभाऊ आजीवन ब्रम्हचारी राहिले. त्यांच्या त्या मैत्रिणीने नंतर एक ओझं हलकं केलं, तिच्या पतीच्या निधनानंतर तिने काही रक्कम या कुटुंबाला मदत म्हणून दिली आणि आपल्या प्रेमातून वेगळ्या पद्धतीने थोडी उतराई झाली!

त्या दिवशी बोलताना त्या वृद्ध स्त्रीचा कंठ दाटून आला होता. गेले काही वर्षे त्या आसूसल्या होत्या, हे सर्व सांगायला! त्यामुळे मी रामभाऊंविषयी विचारताच त्यांना भरून आलं होतं! रामभाऊंनी लग्नाला नकार दिला तेव्हा तरुण दीर आणि विधवा भावजयीत संबंध आहेत अशी कुणीतरी मुद्दाम हूल उठवली त्यादिवशी रामभाऊ खचले आणि त्यांनी राहतं घर बदललं. त्या दिवसानंतर त्यांनी जगाशी संबंध तोडला आणि आपण भले नि आपले काम, आपले कुटुंब भले अशी लक्ष्मणरेखा त्यांनी ओढून घेतली. हयात नसलेल्या तरीही आपल्या हृदयात रहिवास करत असलेल्या जिवश्च व्यक्तीची विचारपुस करण्यास कुणी आलं तर ओठांवर शब्द येण्याआधी डोळ्यात पाणी येतं!

आता या घटनेला दोन दशके उलटून गेलीत. आजही रामभाऊंचा आवाज माझ्या स्मरणात आहे. त्यात कशीश होती, दर्द होता आणि प्रेमही होतं! हे ज्यांच्या वाट्याला येत नाही त्यांच्या जगण्यात परिपूर्णता नसते! माणूस समृद्ध होतो, मग भलेही त्याचे जगणे समृद्ध नसले तरीही तो अफाट उत्तुंग जगतो!

हॅपी गर्लफ्रेंड्स डे!

-समीर गायकवाड

अवांतर - एखाद्याला गर्लफ्रेंड आहे म्हणजे त्या दोघांचे लफडे असले पाहिजे असा विचार म्हणजे अगदी झापडबंद टिपिकल गुजरे जमाने के पकाऊ खयाल प्रोटोटाईप होय! आताची जेनझेड या गोष्टींना पूसत नाही. जिच्यावर प्रेम असते ती प्रेमिका, प्रेम होण्याआधी जर ती मैत्रीण असेल तर ती गर्लफ्रेंड! कधीकधी याच टप्प्यात व्यवहारिक दुनियेची चाळणी लागते आणि माणूस प्रेमाची पाटी कोरी ठेवून बोहोल्यावर चढतो. लग्नानंतर सासरची एखादी कजाग सखूबाई नाहीतर पारूबाई बायकोला सांगून ठेवते, "हे बघ पोरी दादल्याला नीट मिठीत घेऊन त्याचं काही झेंगट होतं का नव्हतं याची खात्री कर गं बये!" गावाकडचे गर्लफ्रेंडचे नामकरण झेंगट! तसे हे मोठे गोड प्रकरण!

तसे तर इथे फेसबुकवर देखील काही मैत्रिणी आहेत. इथे बऱ्याचदा इतरांना काय वाटेल म्हणून अनेकदा अनेकजण ताई, दीदी, वहिनी म्हणताना दिसतात. वास्तवात अनोळखी स्त्रीसोबत मैत्री होऊ शकत नाही, प्रेम होऊ शकते हा महत्वाचा फरक आहे. त्यामुळे एखाद्या स्त्री विषयी अन्य नात्यांमधले ममत्व न जाणवता मैत्रीचा धागा जाणवू लागला की मग ती खोटी खोटी संबोधने बोजड होऊन जातात! लोक काय म्हणतील या भावनेने अनेकदा एखाद्या सुंदर स्त्रीला तुम्ही किती सुंदर छान दिसता असेही कौतुकाने म्हणता येत नाही असे दिवस आहेत! कारण,'लागला लगेच लाळ गाळायला नाहीतर आला गूळ पाडायला लोचट कुठला!' अशी शेरेबाजी होऊ शकते आणि याला कारणही लाळघोट्या पुरुषांचे अति पुढे पुढे करणे हे असू शकते! असो. एखाद्या स्त्रीला निखळ कौतुकाचे चार शब्द सांगावे वाटत असतील तर तितकी सलगी अथवा तशी मैत्री असणे आताशा क्रमप्राप्त झालेय. तर इथे काही चांगल्या विचारांच्या, चांगल्या मनाच्या, चांगल्या आवडनिवडीच्या आणि अभिरुचीच्या बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या मैत्रिणी आहेत. अर्थात त्या गर्लफ्रेंडच असल्या पाहिजेत असे काही नसते! कारण, ती वर्गवारी वेगळीच असते! असो. गर्लफ्रेंड्स डे'च्या निमित्ताने हे शेयरिंग!

मैत्री, प्रेम म्हटलं की साहित्यिक जग लगेच अमृता प्रीतम, साहिर, इमरोज यांचे दाखले देऊ लागते. बाकी बरीच मोठी दुनिया राधा कृष्ण मीरा यांच्यापाशी येऊन अडखळते. मात्र रुक्ष अशा व्यावहारिक जगात स्त्री पुरुष यांच्यातली निखळ मैत्री किती प्रमाणात शक्य आहे हा सवाल गतपिढी पर्यंत गुंतागुंतीचा होता मात्र आताच्या जेनझेड पिढीचा याबाबतीत हेवा करावासा वाटतो कारण हे नाते त्यांच्या परिघात आता सुलभशक्य आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा