बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - अकराव्या लेनमधली सावित्री ..



अकराव्या लेनमधली सावित्री मेली
तिच्या तिरडीचे सामान आले आणि
जगाने रांडा ठरवलेल्या तिच्या सगळ्या पोरीबाळींनी एकच गलका केला.
बांबूंचे तुकडे बांधून त्यावर कडब्याचे पाचट अंथरले गेले.
सावित्रीची अखेरची अंघोळ सुरु झाली,
पारोशा अंगाने विटाळल्या हाताने तिच्यावर पाणी ओतले जात होते.
पाण्यासोबत बायकांचे अश्रू मिसळत होते.

सगळ्या खिडक्या दारं, सगळे सज्जे, सगळ्या आडोशात
जिकडं पाहावं तिकडं पाणावल्या डोळयाच्या धुरकट बायका उभ्या होत्या.

सावित्रीचे डोळे स्वच्छ चोळले गेले, तिच्या स्वप्नांना धक्का न लावता.
सावित्रीच्या डोळ्यात मासे राहत असावेत असे वाटे,
इतके ते मासुळी पाणीदार होते.

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

अजून याद येते गावाची - एक आठवण नामदेव ढसाळांची .....



दिवस असे अधून-मधून मला शहरातून गावाकडे घेऊन जातात. आता तिथं सावलीचा विटाळ धरत नाहीत, आता महारवाडय़ाचं रुपांतर राजवाडय़ात झालं आहे. सुगीसराई-अलुत्याबलुत्याचे मोसम संपले आहेत. मर्तिकाच्या चिठ्ठय़ा पोहोचवणं, फाटय़ा फोडणं, महसुलाचा भरणा करणं, वीर नाचवणं, शिमग्याची सोंगं घेणं, महाराच्या होळीच्या विस्तवानं गावाची होळी पेटवणं.. आता सर्वच गेलं आहे बदलून. गाववस्ती, नदी-नाले पूर्वीचे राहिले नाहीत गावात गेलो की, महाराचं पोर आलं, असं आता म्हणत नाहीत. गाव किती बदलतं? पण बदलत नाहीत आठवणी….

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - रेड लाईट एरियातील नोटाबंदीची वर्षपूर्ती....


८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी झाली आणि देशभरात हल्लकल्लोळ झाला. अनेक क्षेत्रात याचे बरेवाईट परिणाम झाले. तीनेक दिवसापूर्वी या घटनेला वर्ष पूर्ण झाले आणि कोणकोणत्या क्षेत्रात कसे साधक बाधक फरक पडले याचे आढावे अनेकांनी आपआपल्या परीने मांडले. समान्य लोकांनीही आपली मते मांडली. त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनीही आपले ठोकताळे सादर केले. सरकारच्या वतीनेही विविध खात्याच्या मंत्र्यांनी सरकारची तळी उचलली जी एक साहजिक बाब होती. केंद्रातील उच्चपदस्थ लोकांनीही काही विधाने केली.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उत्तरप्रदेशातील निरंकुश सत्तेचे बेलगाम वारू...


उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन अत्यंत छोट्या घटनांचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीस करावासा वाटतो. पहिली घटना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच भ्रष्टाचार किती शिगेला पोहोचला असल्याचे दाखवून देणारी आहे. काही दिवसापूर्वीच गोरखपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलीय. खजनी भागातील धाधूपार येथे पाण्याच्या टाकीचे काम नव्याने करण्यात आले होते. या टाकीत पहिल्यांदाच पाणी भरायला सुरुवात केल्यानंतर टाकी फुटली अन् एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी टाकी फुटल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. सुमारे दीड कोटी रुपये या टाकीसाठी खर्च करण्यात आले होते. काही दिवसात धूम धडाक्यात ज्या टाकीचे उद्घाटन केलं जाणार होतं त्या टाकीचे हे सर्व पैसे अक्षरश: पाण्यात गेले. गोरखपूर हा मतदारसंघ योगींचाच असूनही प्रसारमाध्यमे चाटूगिरीत मग्न असल्याने याचा फारसा गवगवा झाला नाही.

अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...


लग्नाआधी नोकरी करणाऱ्या स्त्रिया लग्न झाले की थोड्याशा धास्तावतात. मातृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात आणखी घालमेल सुरु होते. तर प्रसूतीपश्चात येणाऱ्या कोंडमारयाच्या दिवसात तिला नोकरीविषयक निर्णय घेणं खूप कठीण वाटू लागतं. नोकरी करावी की नोकरी सोडून दयावी ह्या विचारांच्या चक्रात त्या पुरत्या गुरफटल्या जातात. काही स्त्रिया हल्ली सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गरोदरपणातील हक्काची रजा वापरून वेळ मारून नेतात पण पुढे काय करायचे याचे नेमके उत्तर त्यांच्याकडेही नसते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते तिथे कर्त्या पुरुषासोबत घरातील स्त्रीला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नसते. तिथे स्त्रियांकडे कुठलाच पर्याय उरत नाही. तर कधी विपरीत परिस्थिती असते. काही स्त्रियांना विश्रांती हवी असते, सध्याची नोकरी सोडून संसाराकडे लक्ष दयावे असा त्यांच्या अंतरात्म्याचा सूर असतो. पण त्या हुंकाराला त्या आतच दाबतात. तर काही स्त्रिया अशाही असतात की ज्यांना लग्नाआधीही नोकरी करण्याची इच्छा असते मात्र माहेरच्या प्रतिगामी लोकांनी काहीशी आडकाठी केलेली असते त्यामुळे त्या माहेरी असताना नोकरी करू शकत नाहीत.

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

ऋणानुबंधाच्या गाठी - बाळ कोल्हटकर


एक भारलेला काळ होता, जेव्हा देशभरातल्या बहुतांश घरात सर्व सदस्यांचं एकमेव करमणुकीचं साधन रेडीओ होता. त्या काळातली सकाळ भारलेल्या वातावरणाची असायची. तेंव्हा भल्या पहाटे उठून घरातल्या माऊलीने घराचे अंगण झाडून घेतलेले असायचे, हे अंगण कधीकधी थेट रस्त्यापर्यंत खेटलेले असायचे. त्यामुळे अख्खा रस्ता भल्या पहाटेच लख्ख स्वच्छ झालेला असायचा. अंगण झाडून झाले की त्यावर बादलीभर पाण्याचा मस्त सडा टाकून झालेला असायचा. सडासंमार्जन होताच पांढऱ्या शुभ्र रांगोळीचे स्वस्तिक घराच्या उंबरठ्यावर अवतीर्ण होई, अंगणात एखादी सुबक ठिपक्यांची रांगोळी चितारली जाई. मग घरातली लहानगी चिमुरडी जागी केली जात असत, या सर्वांचं आवरून होईपर्यंत देवघरातील समईच्या मंद वाती तेवलेल्या असत, गाभाऱ्यातील निरंजनाचा पिवळसर प्रकाश देवदेवतांच्या तसबिरीवरून तरळत जात असे. अंगणातल्या तुळशीला पितळी तांब्यातून पाणी वाहिले जाई, पूर्वेच्या देवाला डोळे झाकून, हात जोडून नमन होई. मग माजघरात स्टोव्हचा बर्नर भडकून पेटलेला असला की त्याचा फर्रफर्रचा आवाज लक्ष वेधून घेत असे. त्यावर चढवलेल्या पातेल्याचा चर्रचर्र आवाज आणि चहाचा दरवळणारा गंध एकच तलफ जागवत असे.

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

'अमृततुल्य'....



चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच ! नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय ! चहा म्हणजे भारतीय जनतेचा हळवा कोपराच जणू ! हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत.. त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच ! त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते. शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डरप्रमाणे एका ओगराळयाने त्या पातेल्यात ओतत असतो.झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातील चहा - साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेतो अन फक्कन पातेल्यात टाकतो.बऱ्याचवेळा चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जीलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं.

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

रेड लाईट डायरीज - सेक्सवर्कर्सचे रॅकेट...


वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरूपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आजघडीला देशातील महानगरांना जोडणाऱ्या हायवेंवर याचा मोठा प्रसार आढळतो. ढाबे, हॉटेल्स, लॉजेस, पत्र्याची शेड्स यात हे लोक आसरा घेतात. सर्व मोठ्या शहरांत एखाद्या गल्लीत, तालुक्यांच्या ठिकाणी एखाद्या इमारतीत, पंचक्रोशीतल्या एखाद्या तालेवार गावात एखाद्या खोपटात हा व्यवसाय चालतो. ट्रकचालकासारख्या वाहत्या ग्राहकांसोबत फिरता व्यवसाय करण्याचा प्रवाहही आजकाल आढळून येतोय. पूर्वी एखाद्या वस्तीत मर्यादित असणाऱ्या या लोकांकडून छोट्यामोठ्या शहरात एखाद्या अपार्टमेंटमध्ये एक दोन सदनिका भाड्याने घेऊन त्यात कुंटणखाना चालवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. गर्दीची सार्वजनिक ठिकाणे एसटी स्थानक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सिनेमा थियेटर्स, बागा, अद्ययावत हॉटेल्सचे पार्कींग स्लॉटस अशा ठिकाणी हे मुक्त वा छुप्या पद्धतीने वावरत असतात. स्पा, मसाज सेंटर्सच्या नावाखालीही हा व्यवसाय करण्याचे प्रमाण जाणवण्याइतके वाढलेले आहे. तसेच ग्रामीण भागातही छुप्या पद्धतीने याला उधाण आलेले आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात उघड पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सेक्सवर्कर्सची संख्या पन्नास लाखाइतकी आहे, आणि छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या याहून अधिक आहे. या व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, बायका कोण आणि कुठून पुरवतं याची माहिती वेधक वाटू शकते पण ती खऱ्या अर्थाने धक्कादायक असूनही त्याची तीळमात्र दखल घेतली जात नाही.

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

'ट्रोलभैरवां'चे समर्थक...


सध्याच्या काळात सोशल मिडीया हे अनेकार्थाने एक प्रभावी अस्त्र झाले आहे. सहज सोप्या पद्धतीने हवे तसे व्यक्त होण्याची संधी विनासायास मिळत असल्याने दिवसेंदिवस सोशल मिडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढतेच आहे. राजकीय हेतूने यात सामील झालेल्यांनी आपापल्या पक्षांची, लाडक्या नेत्यांची भलावण करताना आपल्याच विचारांचा उदोउदो करत विरोधी विचारधारांची निंदानालस्तीही सुरु केली. नावडत्या नेत्यांचेचरित्रहनन करत त्यांची मॉर्फ केलेली, प्रतिमोध्वस्त चित्रे वापरणे, मनगढंत कहाण्यातून खोटा मजकूर लिहिणे, बोगस डाटा देणे, अश्लील भाषा वापरून महिलांची मानहानी करणे, इतरांच्या नावाने पोस्ट लिहून व्हायरल करणे अशी नितीभ्रष्ट प्रकटने अहोरात्र होत आहेत. यासाठी ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटसऍप यांचा वापर प्रामुख्याने होतोय.
आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावणे, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवणे, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करणे, कॉमेंट करणारया लोकांशी अकारण वाद घालणे यांना ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मिडीयात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. परिणामी याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप आलेय. यामुळे दंगली घडल्यात, जातधर्मीय सलोखा धोक्यात येऊ लागलाय. हे सर्व घडत असताना काही ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल झाल्यात तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही ट्रोल फेक अकाउंटद्वारे कार्यरत असतात. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम राजकारणी करताना दिसत नाहीत, यात नाव घ्यावे असा अपवादही नाही ही शरमेची बाब आहे.

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

रेड लाईट एरिया आणि मुंबईतल्या एनजीओ...

रेड लाईट एरियावरील पोस्टस वाचून अनेकजण भारावून जातात. 'यासाठी आम्ही काय करू शकतो ?' अशी विचारणा करतात. सर्वांनीच प्रत्यक्ष ठोस कृती करावी म्हणून मी हे लेखन करत नाही. या उपेक्षित आणि शोषित घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यावर मुख्य फोकस आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदत करावी वाटते त्यांनी शक्यतो एनजीओजच्या कार्यालयांना थेट भेट दिल्याशिवाय आर्थिक मदत देऊ नये असे माझे मत आहे. पेक्षा आपल्या भागातील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास सोबत घेऊन अशा वस्त्यांत आपली मदत वस्तूस्वरूपात देणं योग्य.