मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्ट्स ?' असं विचारणाऱ्या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ...आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरणऱ्या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा.
खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणाऱ्या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा.
दूरध्वनीवरचे संभाषण अकारण हिंदी इंग्रजीतून झाडणाऱ्या, आपला रुबाब वाढवण्यासाठी मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्रिवार शुभेच्छा..
फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी, जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणाऱ्या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा...
तसेच शब्दांचे मूळ रूप विद्रूप करून तै, बै, वेग्रे, लोक्स, कळतै, पैले असं पिळून काढलेलं स्वरूप देणाऱ्या प्रतिभावंतांनाही शुभेच्छा..
सोशल मीडियावर लेखन करताना दर वाक्यात इंग्रजी शब्द घुसडून लेखनाचे पुण्यकर्म करणाऱ्या महालेखकांनाही सकळ शुभेच्छा.