Wednesday, March 8, 2017

समिधा....

गर्भात तुझ्या मी होतो, तुझी ती पहिली ओळख होती.
तेंव्हा तू मला पाहिलंही नव्हतंस की स्पर्शही नव्हता केलास 
पण तू देहातलाच एक समजत गेलीस, अगदी नितळपणे जोपासत गेलीस. 
रक्तामांसावर पोसलंस, एके दिवशी मरणप्राय यातनांना हरवून मला जन्म दिलास.
तुझ्या नाळेतून माझ्या देहात चैतन्याचे अगणित हुंकार भरलेस, श्वास बहाल केलेस. 
तुझ्या दुधावर वाढणारा, तुझं बोट पकडून चालणारा मी 
एके दिवशी शरीराने तुझ्याहून उंच होत तुझ्यापासून विलग झालो !
खरं तर तुझी उंची गाठणे ईश्वरालाही शक्य नाही कारण त्याला नसतात प्रसववेदना !
किनाऱ्याला लागल्यावर नावेने साथ सोडून प्रवाहात थांबायचं असतं 
हे तुझ्याहून अधिक कुणालाच उमजत नसतं ;
तुझ्यापासून मी इतक्या सहजतेने दूर झालो पण
पुढे जाऊन मला तुझी साथसंगत कंटाळवाणी वाटू लागली
कारण जगासमोर तुझ्यासवे असताना मी एक लेकरूच तर वाटत होतो.        
शैशवासह मी तुला ही थांबवलं. 
तरीही हसऱ्या चेहऱ्याने तू मला सायोनारा करत राहिलीस.
     
पण तुझी साथ संपली नव्हती,  
तू परत आलीस, आता तू माझ्या पावलावर पाऊल टाकत माझ्यासवे चालत होतीस !
मेघांच्या गर्दीत आपण हरवून जात होतो, जलधारात चिंब भिजून जात होतो !
तुझं असणं मोरपिसासाहून तलम होतं.
तू स्वप्नं सांगायचीस आणि मी त्यात दंग व्हायचो,
लपून छपून धडधडत्या काळजाने भेटत राहायचो
जगभराच्या गप्पा तू करत राहायचीस आणि मी तुझ्यावर कविता करायचो. 
मी स्वतःला मदनबाण समजायचो आणि तुला रंभा, उर्वशी !         
आणि तसं घडायचं देखील... 
मग तू माप ओलांडून माझ्या घरात आलीस
खरं तर ते तुझं समर्पण होतं, माझ्यासाठी केलेलं. 
प्रेमासाठी, नात्यासाठी अन कर्तव्यासाठी तू स्वतःच्या समिधा केल्यास !
माझ्या चार भिंतींना तू शोभा आणलीस, त्याला घरपण दिलंस,
तुझ्यासोबत अनेक तरल रात्रीत मी हरखून गेलो
तुझ्या लज्जेची वस्त्रे हळुवार सरकवत गेलो, उफाणत राहिलो. 
तेंव्हा कधी तुझी मर्जी विचारल्याचे स्मरत नाही. 
तुझ्या देहाशी खेळून झाल्यावर मी अलगद बाजूला व्हायचो आणि
तू मात्र अनेक दिवास्वप्नं रंगवत पोटात पाय दुमडून झोपी जायचीस. 
या सर्व जीवनयात्रेत मी तुला काय दिलं याचा मी कधी विचार केला नाही. 

आणि एके दिवशी तुझी कूस उजवली
एका सुंदर तान्हुल्याला तू जन्म दिलास. 
त्या दिवशी मी खूप खुश होतो
आता नव्याने तू परतली होतीस माझ्या स्वार्थी जगात !
तान्हुल्याला उराशी कवटाळताना तू ही खूप आनंदी होतीस..
त्या नंतरच्या रात्री फिक्या होत गेल्या आणि दिवस अस्वस्थ होत गेले. 
मी यंत्रवत जगत राहिलो आणि तू तान्हुल्याकडं बघत जगत राहिलीस. 
आयुष्य थोडं निचरा झाल्यासारखं शांत होत होतं आणि 
एके दिवशी तू सांगितलंस की ओटीपोट पुन्हा भरल्यासारखं वाटतंय !
मरणयातनांशी तुझी आता मैत्री झाली होती. 
त्या पाऊसवेड्या रात्री डॉक्टरांनी सांगितलं
नवी गोडुली आता तुमच्या घरी आलीय ! 
मी थोडाफार खुश होतो
तू मात्र त्या तान्हुलीला उराशी कवटाळून रात्रभर रडत होतीस.
आपल्या इच्छा आकांक्षांचा गळा कसा घोटायचा हे तिला शिकवत होतीस,  
कानगोष्टीतून समिधेचा अर्थ समजावून सांगत होतीस !!!

आई, पत्नी आणि मुलीच्या चिरेबंद चौकटीत तुला चिणून मी मात्र मोकळा झालो होतो, 
गल्लोगल्ली स्त्रीत्वाला सलाम करत फिरत होतो.. 
     
- समीर गायकवाड.