रविवार, ५ एप्रिल, २०१५

आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?


आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
अरे यार, आयपीएल मध्ये कसला ड्रामा आहे त्यावरच मस्त बोलायचं का ?
फोर-जीच्या फुकट स्ट्रीमींगमध्येच रुतत जायचं का ?
पूर्वी तुला नोकरी नव्हती, महागाई वाटायची तेंव्हा तर तू रस्त्यावर यायचास ना ?
आता तुला स्वतःतून बाहेर पाहायला वेळ मिळणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. तू आंदोलनेही आता ऑनलाईनच करतोस का ?
तुला खऱ्या खोट्यातला म्हणे फरक कळत नाही कारण ते जे काही दाखवतील तेच तर तू वाचतो आहेस, पाहतो आहेस. हे खरं आहे का ?
आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
तू खूप बोलतोस यार, 'त्यांच्या लफड्यात काय को पडने का यार ?'
खूप झमेला होतो, पोलिस लगेच दारी येतात, नोटीस चिटकवून जातात.
'तुमच्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होते आहे' असा आरोप लावतात.
फोडल्या काही मूर्त्या अन स्मारके, झाली जरी विटंबना तरी आपण मुकाट राहिलेलंच बरं ! हेच खरे का ?
तुला आरक्षण हवंय, संरक्षण हवंय. त्यांना तू नकोयस पण तुझं मत हवंय.
तू धमन्यातलं रक्त तापवत बोलायचास, 'यांना भिडायचं का ?'
तू आणि ते दोघं भिडावेत हेच तर त्यांचे इप्सित असते, आपण आता हेच विसरायचं का ?
म्हणून म्हणतो, आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

शेवंता.....


शेवंता म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर केळीच्या खोडासारख्या तिच्या तराट गोर्‍यापान पिंडर्‍याकडे जादू झाल्यागत नजर जायचीच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. काजळ घातलेल्या तिच्या पाणीदार मोसुळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर आडवी रेष अन त्यावर बारीक गोलाकार गंध असायचा. जो तिच्या उभट चेहऱ्याला फारच खुलून दिसायचा. कानातले लंबुळके झुबे सतत डुलत रहायचे. ओठाच्या पाकळ्या उघडल्या की पांढर्‍याशुभ्र मोगर्‍याच्या कळ्यासारख्या दंतपंक्ती बेचैन करत. क्वचित कधी ती मोकळया केसानिशी उभी असली की अजूनच जालीम दिसायची. बहुतकरून सैलसर अंबाडा बांधून त्यावर तिने एखादा गजरा माळलेला असायचा. गळ्यात मोहनमाळ आणि काळ्या मण्यांची सैलसर बारीक सोनेरी तारेतली सर असायची. पाठीवर लाल रेशमी गोंडा असणारी ही काळी सर तिच्या गळ्यावर अशी काही रूळायची की समोरचा सतत तिच्या भरदार छातीकडे चोरून बघायचाच. आवळ पोलके नेसल्यानं गच्च दंडावर करकचून बांधलेल्या काळ्या दोर्‍यातली बारीक काळपट पितळी पेटी अधिकच चेमटलेली वाटायची. तिच्या गुटगुटीत मनगटालाही काही दोरे गुंडाळलेले असायचे. लुसलुशीत पोटाला बांधलेली चांदीची साखळी अन दुहेरी गुंफलेला कटदोरा इतका घट्ट असायचा की कधीकधी तिच्या पोटाच्या कोपऱ्यावर लालसर वळ दिसायचे. तिचं सारं अंगांग गाभूळल्या चिंचेसारखं होतं, बघणार्‍याच्या तोंडालाच लाळ सुटायची.

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५

रुबाई - उमर खय्याम ते माधव ज्युलियन ..

'मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवाला,
‘किस पथ से जाऊँ?’ असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
‘राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला ।

हरिवंशराय बच्चन यांनी अनुवादित केलेली उमर खय्यामची ही एक प्रसिद्ध रुबाई आहे. उमर खय्याम फावल्या वेळात रुबाया (रुबाइयाँ) लिहीत असे. ह्या रुबायांमुळेच त्याची कीर्ती अजरामर झाली. त्याच्या रुबायांमुळे अनेक देशांत उमर खय्याम क्लब स्थापन झाले. तेथे त्याच्या रुबायांचे मोठ्या आवडीने अध्ययन अध्यापन केले जाते. जगातील अनेक भाषांत त्यांचे अनुवाद झाले. अर्थात त्यांतील उमर खय्यामच्या रुबाया किती व प्रक्षिप्त रुबाया किती हे सांगणे खरोखरीच कठीण आहे.

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

‘गायी पाण्यावर काय म्हणून आल्या’ - कवी बी ....



गाय आणि तिचे वासरू, तिची माया, तिचं दयाळू वर्तन, तिची करुण प्रतिमा यांचा यथार्थ वापर साहित्यिकांनी गद्यपद्य या दोन्ही साहित्यप्रकारात केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पानोपानी आढळतील. आईची माया दर्शविण्यासाठी कवितांत तर गायीची उपमा अत्यंत खुबीने वापरली गेलीय. काही कवितांनी गायीच्या ममतेवर असे काही अप्रतिम भाष्य केलं आहे की रसिक वाचकांच्या मनाचा त्यांनी अचूक ठाव घेतला आहे. ही अशीच एक कविता ..