गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

सरस्वती चंद्र - एक हळवी व्यथा!


प्रेम जरी अपूर्ण राहिले, तरी ते आत्म्याला पूर्णत्व देऊन जाते हा अभूतपूर्व संदेश ‘सरस्वतीचंद्र‘ कादंबरीमध्ये होता; यातली नायिका शेवटी म्हणते की, 'विरहच खरेतर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ असतो.'एखाद्या व्यक्तीने कुणावर प्रेम केले असेल मात्र तिच्यासोबत विवाह झाला नसेल तर त्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती तगमग होते?
जिच्याबरोबर प्रेम केले तिच्यासोबत विवाह होऊ न शकलेल्या व्यक्तीला त्या विवाहित प्रेयसीच्या घरात व्यवसायात रोज आपलं तोंड दाखवावं लागेल अशी परिस्थिती उद्भवली तर कशी मनोवस्था होईल?

प्रेम केले म्हणजे सर्वस्व अर्पण केले पाहिजे असे काही नाही, मात्र आपण एकमेकांवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करत होतो ही गोष्ट तरी त्या दोन प्रेमी जीवांनी जाणून घेतली पाहिजे!

नूतनची मुख्य भूमिका असणारा ‘सरस्वतीचंद्र‘ हा याच नावाच्या गुजराती कादंबरीवर आधारित होता. गोवर्धन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथा दोन गुजराती ब्राह्मण कुटुंबांवर केंद्रित आहे. लक्ष्मीनंदनचे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे, त्यांचा व्यवसाय भरभराटीस आलेला आणि ते खूप श्रीमंत! सरस्वतीचंद्र हा लक्ष्मीनंदन आणि चंद्रलक्ष्मी यांचा पुत्र. तो एक उच्च बुद्धिमत्ता असणारा विद्वान, हुशार वकील आणि संस्कृत, इंग्रजी साहित्याचा स्कॉलर अभ्यासक. वडिलांच्या व्यवसायातही तो यशस्वीरित्या योगदानही देतो. त्याचे भविष्य उज्ज्वल असते.

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

इदी अमीन - स्वप्नाळू राष्ट्रवादाचा दमनकारी सत्ताधीश!


विदेशात राहणाऱ्या काही अगोचर आणि मूर्ख भारतीयांच्या आततायी वर्तनामुळे जगभरात भारतीय लोकांविरोधात आवाज उठवला जातोय हे आता लपून राहिलेले नाही, अलीकडील दोनेक वर्षात तर या गोष्टी वेगळ्याच स्तरावर पोहोचल्यात. नेमक्या याच काळात जागतिक कीर्तीच्या द इकॉनॉमिस्ट या नियतकालिकात युगांडाचा हुकूमशहा, इदी अमीन या क्रूरकर्म्याविषयीचा लेख ठळक पब्लिश झालाय. युगांडामधील परकीय नागरिकांना खास करून भारतीय नागरिकांना, त्याने अत्यंत क्रूरपणे देशातून पलायन करण्यास भाग पाडलं होतं.

1976 साली लंडनमधील मॅडम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाने आपल्या भेट देणाऱ्यांना विचारलं की, “संग्रहालयातील सर्वात नावडती व्यक्ती कोण?” त्या मतदानात युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन दुसऱ्या क्रमांकावर आला होता, अर्थातच पहिला क्रमांक होता अडॉल्फ हिटलरचा! (आपल्याकडील काहींना याची मोठी भुरळ पडलेली असते! असो) त्या काळात ब्रिटनमधील वृत्तपत्रांत अमीनच्या क्रूर कृत्यांच्या कथांचे रकाने गच्च भरलेले असत. त्यातील काही गोष्टी खर्‍या होत्या, जसे की तो खरंच हजारो लोकांचा खुनी होता. पण काही वदंता होत्या जसे की, त्याने आपल्या फ्रीजमध्ये शत्रूंची मानवी डोकी ठेवली होती, काहींच्या मते ही गोष्ट खरी होती. तो नरभक्षक होता. कोवळी मुले आणि शत्रू त्याचे भक्ष असत. तो भोगी होता आणि अय्याश होता!

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

शिऊलीची फुलं - अलंकृताची लोभस नोंद!

काही माणसं अगदी लोभस वर्णन करतात, केवळ एका ओळीतच ते अफाट काही सांगून जातात. कोलकत्यात फिरताना अलंकृता दासच्या घरी गेलो होतो. सोबत अबीर होता, निहायत बडबड्या स्वभावाचा हुशार तरुण! माझ्या येण्याचे प्रयोजन सांगताच अलंकृताच्या जास्वंदी चेहऱ्यावर तृप्ततेची फुले उमल्ली! माझ्या नि अबीरच्या प्रश्नांवर ती भरभरून बोलत होती.

आमच्याशी बोलत असताना पांढऱ्या शुभ्र साडीच्या पदराच्या टोकाशी तिच्या हातांचा चाळा सुरू होता तो एकाएकी थांबला आणि थांबा, तुम्हाला काहीतरी तजेलदार प्यायला देते असं म्हणत ती आत गेली.

दोनच खोल्यांचे तिचे घर अगदी नीटस होतं, अतिशय देखणं होतं! घरात श्रीमंती कुठेच डोकावत नव्हती मात्र एका कलावंत रसिक व्यक्तीचे ते घर आहे हे पाहता क्षणी लक्षात येत होतं.

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

स्वामी दयानंद सरस्वती - एक नोंद ..


ते 1867 चे साल होते. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात स्वामी दयानंद सरस्वती धर्मप्रचाराच्या उद्देशाने आले होते. या मेळ्यात लाखो हिंदू स्त्री-पुरुष आणि साधू एकत्र येतात, त्यांच्याशी संवाद साधता येईल असा त्यांचा हेतू होता. कुंभमेळ्याच्या वेळी गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जाते आणि मनुष्याला दुःखांपासून तसेच जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्ती मिळते ही श्रद्धा तेव्हाही जनमानसात रूढ होती, त्याविषयी दयानंदांना बोलायचे होते.
हरिद्वारमध्ये आल्यावर स्वामीजींनी पाहिले की, साधू आणि पंडे धर्माचा खरा उपदेश न करता लोकांना पाखंड शिकवून फसवत होते. समाज सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याऐवजी अज्ञानाच्या खोल खाईत पडत चालला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कुंभ मेळ्यातील दृश्यांनी त्यांना अंतर्मनातून खोल वेदना झाल्या. त्यांनी जाणले की, लोक दुःखातून मुक्त होण्याऐवजी अशा कृत्यांमुळे दुःखाच्या भवसागरात बुडून जाताहेत.

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

बशीर बद्र - खामोशी एका शायराची..

बशीर बद्र सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच दिसत असेल..


विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात ते गंभीर आजारी आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसल्या, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसल्या, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासलेय.

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत चाललेत, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झालीय. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळात विसरतील. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल.

ते ब्लँक होतील. उरेल केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

इतिहास बदनाम वस्तीचा - मीरतच्या कबाडी बाजारचा!



उत्तर प्रदेशच्या मीरतमधील कबाडीबाजार भागातील एका पियक्कड थोराड बाईने एका भेटीत 'ओल्ड मंक' पिणाऱ्या तरूण, प्रौढ आणि वयस्कर पुरूषांची गुणलक्षणे आणि सवयी सांगितल्या होत्या!विशेष म्हणजे तिन्ही वर्गवारीतील पुरुषांच्या त्या गोष्टी आणि त्यांची प्यायची पद्धत यांच्यात एक परस्पर सूत्र होतं, जे अफाट होतं! तेव्हापासून ओल्ड मंक पिणाऱ्या ओळखीच्या इसमांना ते वर्णन फिट बसतंय का हे चेक केल्यानंतर अक्षरश: अवाक होण्याची वेळ आली!

रेड लाइट डायरीज सिरिजमधील माझ्या आगामी पुस्तकातील मदिराक्षीच्या प्रकरणात विविध रंजक संदर्भ आणि नोंदी आहेत, त्यातच ही नोंद समाविष्ट आहे.

कबाडी बाजारची ही बदनाम वस्ती मुघल काळापासूनची आहे. 2019 मध्ये इथला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने जंग जंग पछाडले. धंदा पूर्ण बंद झाल्याचे जाहीरही केले पण याचवर्षी सप्टेंबरमध्ये एका रेडद्वारे वीस जणींची सुटका करण्यात आलीय, यावरून काय ते कळावे.

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

प्रेमाच्या लाडूंची गोष्ट!



स्त्री अविवाहित असो की विवाहित तिला मित्र असला की, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजूनही लोक भुवया उंचावून पाहतात. 'खुलूस'मधला संपूर्ण प्रवास एका मुलीच्या शोधातला आहे. तीन दशकांचा तो काळ आहे. त्यावर सविस्तर लिहिले तर ती एक कादंबरीच होऊ शकेल, इतका त्यात ऐवज आहे. असो. त्या मुलीचे नाव होते लक्ष्मी! कोविडच्या दुसऱ्या लाटेत जुन्या हैद्राबाद शहरात विपन्नावस्थेत तिचे देहावसान झाले. आज ती हयात असती तर तिच्या काही इच्छा नक्कीच पुऱ्या करता आल्या असत्या. मधल्या काळात तिची माझी एक जरी भेट झाली असती तरी तिला हायसे वाटले असते, तिचे जगणे सुसह्य झाले असते. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत आणि साऱ्याच गोष्टी उलगडून सांगता येत नाहीत! आज तिचा उल्लेख करायचा कारण म्हणजे आजचा दिवस राष्ट्रीय गर्लफ्रेंड्स डे! तसे तर तिला विसरता येणार नाही मात्र हा दिवस खास तिच्यासाठी! ही पोस्ट तिच्यासह एका परिचित व्यक्तीच्या न पाहिलेल्या मैत्रिणीसाठी, प्रेमिकेसाठी!

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

थिरुनल्लूर करुणाकरण यांच्या कविता आणि अष्टमुडी तलाव!..


अष्टमुडी तलाव हा केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील एक नयनरम्य नि महत्त्वाचा तलाव, अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध. 'केरळचे प्रवेशद्वार' या नावाने ख्यातनाम! बालकवींच्या कवितेत जसा विशिष्ट भूप्रदेश सातत्याने डोकावतो तद्वत हा अष्टमुडी तलाव थिरुनल्लूर करुणाकरण या विख्यात मल्याळम कवीच्या कवितेत अनेकदा नजरेस पडतो.

बालकवींच्या औदुंबर कवितेत तलावाकाठचे नितळ औदासिन्य आहे, अगदी तसेच नसले तरीही त्याच्याशी आपली जातकुळी सांगणारी एक कविता थिरुनल्लू र करूणाकरण यांनी लिहिली आहे. 'निळासांवळा झरा
वाहतो बेटाबेटातुन, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे. ... पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर..' या पंक्ती बालकवींच्या कवितेतल्या.