
मराठीला धुमाळ मास्तर होते. पोरांना जाम कुटून काढायचे. कवितेची कुठलीही ओळ म्हणायचे आणि पुढची ओळ वाच म्हणून बोटात पेन्सिल घालून बोटं पिरगाळायचे.
समास शिकवताना चिमटीत कान पिळण्याची 'संधी' ते सोडत नसत, त्यांच्या मारझोडीच्या 'क्रियां'ना कुठलेही 'पद' चाले!
पोरांना शेलकी 'विशेषणे' लावून हाक मारण्यात त्यांचा हातखंडा होता, लिहिताना 'कानेमात्रे' एक झाले तर आईबहीण एक करत!
मागच्या बाकांवर बसलेल्या अवगुणी 'विशेषनामां'ना ते नेम धरून डस्टर फेकून मारत!
कोणत्या पोराने मागच्या चाचणीत किती माती खाल्ली होती या विषयीचं त्यांचं 'भूतकाळ' स्मरण चांगलं होतं.