सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

विटंबना ..




देवदासींचे एक बरे असते
त्या विधवा कधी होत नाहीत
कारण देवाला त्याचे दलाल मरू देत नाहीत.
एव्हढे सोडल्यास देवदासींचे काही खरे नसते,
जगणे फक्त नावाला असते
त्यांची मयत केंव्हाच झालेली असते.
देवाला कशाला हव्यात दासी
हा सवाल विचारायचा नसतो,
प्रश्नकर्त्यास पाखंडी ठरवले की 'काम' सोपे होते.
लाखोंच्या अधाशी नजरा झेलणाऱ्या
सहस्त्रावधींच्या बदफैल स्पर्शाना झिडकारणाऱ्या
शेकडोंना शय्येसाठी निव्वळ अंगवस्त्र वाटणाऱ्या
रक्तहळदीच्या घामात चिंब थबथबलेल्या
गात्रांची चिपाडे झालेल्या
अभागिनी, म्हणजे देवांच्याच की भोगदासी ?

सोसूनी धुळकट चिंबटल्या जटांच्या गुंत्याचा भार
वासनेच्या पायऱ्यांवरची चढण ज्यांची संपत नाही
दुःखाला उतरण त्यांच्या कधी लागत नाही
भाळीच्या कुंकवाचा नि डोईचा पदराचा होतो शाप
त्यांच्या बेअब्रूच्या खऱ्या अनौरस संतती असतात
गाभाऱ्यात डोळे मिटून बसलेल्या देवदेवता ...

पायाची हाडे झिजेस्तोवर नाचणाऱ्या
या वंगणगाड्यांना सरकार देते मासिक अनुदान
आणि स्वतःला कृतकृत्य करवते,
अब्रूचा हा सरकारमान्य लाल फितीतला मासिक परतावाच जणू !

गळपटून जाऊन न्हाण गेलेल्या,
केसांची चांदी होऊन,
भाळावरच्या मेणा कुंकवाचा गजकर्ण झालेल्या
म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या लुगड्यांस जेंव्हा लोक हुंगतात,
तेंव्हा विटका चुडा ल्यालेल्या हातांनी त्या भुई थोपटत राहतात...

समाज मनसोक्त लयलूट करत राहतो,
अब्रूची जीर्ण लक्तरे त्यांच्याच घरादारावर टांगून
पूजेअर्चेचा पाट लावत राहतो.
गाभाऱ्यायातल्या 'भरल्या पोटाच्या' देवदेवता नैवेद्याच्या ताटावर
हिरव्या माशांसारख्या घोंघावत राहतात,
दक्षिणापेटीवर हात फिरवत राहतात
स्वतःला देव म्हणवून घेत
जित्याजागत्या स्त्रीदेहाच्या विटंबनेचे बधीरबघे होतात...

लिंबाच्या पानात गुंडाळलेल्या तिच्या देहाला लपेटून राहतात
'उदं गं आई उदं’चा गजर करत
फुलांच्या वर्षावात भंडाऱ्याच्या उधळणीत तिला गुदमरवतात.
सुती घुमकं चौंडकं अन हलगीचा कडकडाट घुमवत
कडबू आंबीलाच्या उग्र दर्पातही जिभल्या चाटत राहतात
'जोगतीण देवाची, मालकी गावाची'
म्हणत बेभान होऊन तिला कुस्करत राहतात...

त्या सर्व दगड धोंड्यांना, शेंदूर फासलेल्यांना
अन भक्त म्हणवून घेणाऱ्याना एकच सवाल,
"ज्या देवळाबाहेर देवदासी बसतात
त्याच्या गाभाऱ्यात असे कोणते देव वसतात ?
सदाचार, संस्कृती, श्रद्धा अन प्रथेच्या मंत्रचौकटीत
तिला नासवताना आदिशक्ती नाही का आठवत ?

तिला मादीपणाची शिक्षा देणाऱ्या नराधमांना
अष्टौप्रहर चौकाचौकावर धंद्यावर बसवताच त्यांना कळेल
देवदासी होणं म्हणजे देहाची अघोर विटंबनाच !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा