जगात बैलांच्या इतके दुःख अन वेदना कोणाच्या वाटेला येत नाहीत…. बैल आयुष्यभर ओझी वाहतात अन बदल्यात चाबकाचे वार अंगावर झेलत राहतात. बैल उन्ह वारा पाऊस यांची तमा न बाळगता झिझत राहतात, कष्टत राहतात. कितीही वजनाचे जू मानेवर ठेवले तरी तोंडातून फेसाचा अभिषेक मातीला घालत बैल तसेच चालत राहतात पण थांबत नाहीत. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या तरी बैल हुंदके देत नाहीत. बैल आयुष्यभर कासऱ्याला बांधून असतात, वेसण आवळून नाकातनं रक्त आले तरी मान वर करत नाहीत. बैल ढेकूळल्या रानातनं जिंदगीभराचं मातीचं ऋण उतरवत राहतात, बैल क्वचित सावलीत बसून राहतात, मानेला गळू झाले तरी ओझे ओढत राहतात, बैल अविरत कष्ट करत राहतात. इतके होऊनही कुठल्याच रातीला बैलांच्या गोठ्यातून हुंदक्यांचे उमाळे ऐकायला येत नाहीत.…थकले भागलेले बैल एके दिवशी गुडघ्यात मोडतात, तर कधी बसकण मारतात तर कधी गलितगात्र होऊन कोसळून जातात अन लवकरच त्यांचे अखेरचे दिवस येतात.... पाझर सुटलेले मोठाले डोळे पांढरे होऊन जातात, पाय खरडले जातात, नाकातोंडातून फेसाचे ओघ येतात, कान लोंबते होतात, श्वासाची प्रचंड तडफड होते, मोकळी झालेली वशिंड पार कलंडून जाते, शेपटीला अखेरचे हिसके येतात अन अंगावरचे रेशमी पांढरे कातडे हलकेच थरथरते….
श्वास थांबतात, कष्ट संपतात, चाबकातून सुटका होते, खुटीला मारलेला कासरा निखळून पडतो, वेसण ढिली होते, गळ्यातली घंटा शांत होते. दगडी थर रचलेली गोठ्याची भिंत तेंव्हा मुक्यानेच धाय मोकलून रडते. मातीलाही कळा येतात, तिच्या अंगावर भेगा येतात, पिसाटलेला वारा थबकतो अन बैलाच्या कलेवरावर मायेची पाखर घालू लागतो, नांगरट करताना त्याच्या तालावर पिले मोठी करणारया टिटव्या एकच गलका करतात, उनाड रावे बाभळीच्या तुटक्या ओसाड फांदीवर हलकेच येऊन बसतात, कडब्याच्या गंजीवर बसलेले होले निराश होतात, वरून जाणारे बगळ्यांचे त्रिकोणी थवे खाली गिरकी घेऊन पुन्हा पुन्हा तिथेच येतात, पडवीत क्वाक क्वाक करणारया कोंबड्या वळचणीला जाऊन बसतात, दगड धोंड्यातनं डोकावणारे सरडे निश्चल बनून बघत राहतात, ज्यांच्या सावलीत बैल कधी काळी बसलेला असतो त्या वड- पिंपळाची गळून पडणारी पाने अमळ जास्त वेळ हवेत तरंगत राहतात अन बैलाच्या निष्प्राण कलेवराकडे बघत रडवेली होऊन मातीवर लोळण घेतात, पाने फुले शोकमग्न होऊन अंग चोरून बसतात, पाखरे शांत होऊन जातात सारी सृष्टी त्याच्या दुःखात सामील होते ….
पण माणूस, बैल मेल्यावर त्याचे चामडे काढून घेऊन जातो, चाबकाचे फटके खाल्लेल्या त्या चामड्याला रापवतो - कमावतो, उन्हात राबलेल्या त्या जीवाचे कातडे उन्हात वाळवतो, पावसात भिजत काम केलेल्या त्या अश्राप जीवाच्या चामड्याला रसायनात भिजत ठेवतो अन सरते शेवटी त्याचे जमतील तितके तुकडे करतो ! त्या चामड्याला ताणून बांधतो अन त्याचे ढोल,ताशे, पखवाज, दिमडी, घुमकं, डमरू बनवतो ! रानात राबताना देखील बैलाला वेळेवर पाणी प्यायला मिळत नाही अन बुरसटून खराब होऊन जाईल - आवाज नीट येणार नाही म्हणून वाद्याला बांधलेल्या त्याच्या चामड्यालादेखील शक्यतो पाणी लागू दिले जात नाही…आयुष्यच ज्याच्यासाठी कष्टाचा शाप झालेले असते त्या बैलाचे चामडे आता वाजत असते, माणसे त्याच्यावर राठ झालेल्या कामट्यांनी पिसाटल्यागत फटकवत राहतात, कधी हातांनी तर कधी दंडुक्याने बडवत राहतात… अफाट डोंगरओझी ओढताना, चाबकाची धारदार वादी अंगावर लाखो वेळा पडूनही जीतेपणी आवाज न काढणारे बैलाचे ते चामडे मेल्यानंतरच्या वेदनांनी कळवळून जाते अन आवाज करत राहते…. माणसे झिंग चढल्यागत त्या आवाजावर नाचत राहतात, ढोल ताशे बडवणारे हलग्या वाजवणारे हाताला वाई येईपर्यंत ते चामडे ताणत राहतात, आवाज टिपेला जातात अन एका क्षणी त्या चामड्यांचेही भोग संपतात ; ढोल फुटून जातात !
जगात इतके दुःख, इतकी विटंबना अन इतके कष्ट नक्कीच कुणाच्याच वाटेला येत नसेल..... म्हणूनच बैल दुःख वेदनेचे अन कष्टाचे प्रतिक बनून माझ्या लेखणीतून सातत्याने अवतीर्ण होत राहतात….
- समीर गायकवाड .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा