 |
| कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स |
दरवर्षी सुट्ट्या लागल्या की त्या ब्रिटिश महिलेचा पती न चुकता भारतात यायचा. नंतरच्या काळात मात्र कैक वर्षे अंथरुणाला खिळून त्याचे देहावसान झाले. त्याच्या स्मृती जागवण्यासाठी ती वृद्धा गोव्यात टिटो बार्डेसला (दशकापूर्वी) आली होती. तिने डॉन विल्यम्सचं एक गाणं असं काही गायलं होतं की जमलेल्या तरुणाईला कावरंबावरं व्हायला झालं, ते गाणं होतं "कॉफी ब्लॅक.."
नॉर्थईस्टमधील डाऊन स्ट्रीट म्युझिक कॅफेज असोत की गोव्यातील फेरीबोट्स, वा मेट्रो सिटीमधली पंचतारांकित हॉटेल्स असोत, डॉन विल्यम्सची गाणी मंद स्वरांत कानी पडतात!
विशेषतः केरळच्या बॅकवॉटर्समधील हाऊसबोट्स आणि गोव्यातले नाईट पब्ज रोज रात्रीस भरात येण्याआधी म्हणजे अंधार गडद होण्याआधी जी शांतशीतल गाणी वाजवतात त्यात डॉनची गाणी आवर्जून असतात.
गतपिढीतला कुणी दर्दी रसिक तिथं असला तर मग तो एखादा खंबा ज्यादा रिचवतो. एखाद्या कमनीय ललनेला जवळ बोलवून ओलेत्या डोळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन चिल्ड 'पॉल जॉन' वा तत्सम स्कॉचचे सिप घेत राहतो!
रम्य भूतकाळ त्याच्या भवती घुमू लागतो!
हे गारुड विलक्षण असतं.