रविवार, ३१ मे, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज – अमरप्रेम ...

'तो' कुलाब्याच्या कॉजवे मार्केटहून यायचा. हॅण्डसम देखणा. अगदी मदनबाण वगैरे म्हणतात तसा अतिशय आकर्षक नसला तरी तरुण पुरुषाच्या अंगी असणाऱ्या खाणाखुणा त्याच्या ठायी होत्या. उंचापुरी भक्कम पिळदार अंगयष्टी. गौर वर्ण, कुरळे केस, उभट चेहरा, काहीशा दाट जाड भुवया आणि त्याखालचे मत्स्याकृती पाणीदार डोळे, विस्तीर्ण कपाळ, त्यावर रेंगाळणारी मस्तीखोर झुल्फं, सरळ नाक, वर आलेले गालाचे चीक मसल्स, उभट निमुळती हनुवटी यामुळे त्याचं इम्प्रेशन मॉडेलिस्टीक असायचं. कुणीही त्याला पाहिलं की किमान काही दिवस तरी त्याला विसरणं शक्य नसे, त्याची वेशभूषा ही अत्यंत आटोपशीर आणि रॉकींग होती. बहुतांश करून फिकट रंगशैलीचा चौकडा शर्ट आणि काळी जीन्स, व्हाईट स्पोर्ट्स शूज असा त्याचा वेष असे. शर्टचं वरचं बटन खुलं असे ज्यातून त्याची भक्कम छाती डोकावत असे.त्याची नजरही कमालीची तीक्ष्ण होती. तो काही एकटक पाहायचा नाही मात्र त्यानं एकदा जरी पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीला वाटे की तो एकसारखा आपल्याकडेच पाहतो आहे. प्रत्यक्षात त्यानं आपल्याकडे पाहत राहावं असं समोरच्याची अपेक्षा असे. तो कॉजवे मार्केट परिसरात एका मरीन कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह होता. कमाई खूप काही नव्हती पण जितकी होती त्यात तो खुश होता. एके दिवशी त्याच्या आयुष्यात 'ती' आली.

गुरुवार, २८ मे, २०२०

रेड लाईट डायरीज - लॉकडाऊनच्या वेदना : पुणे ते मेलबर्न



ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे करोना संक्रमणाची जी नवी घटना उजेडात आली आहे त्याचं प्रेरणास्थान दिल्लीत आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. करोना रुग्ण आणि संशयित व्यक्ती यांच्यासाठी सुरु असलेल्या मेलबर्नमधील आलिशान हॉटेल्समधील क्वारंटाईन सेंटर्समध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते आणि त्यातून शेकडोंना बाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आपल्याकडे काय घडलं होतं याची माहिती घेतल्यास ही घटना अधिक धक्कादायक वाटेल.

रविवार, १७ मे, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - दत्तूमामा

लॉकडाऊनमध्ये कुणाच्या जीवाचे काय हाल होताहेत यावर किती लिहावे तितके कमी पडेल अशी आताची एकंदर स्थिती होतेय. हे वर्तमानच असे आहे की आगामी काळात मागे वळून पाहताना आपली मान शरमेने खाली जावी, भयंकराच्या दारात उभ्या असणाऱ्या अनेक जीवांना आपण अंधाऱ्या खोल दरी लोटून दिलेलं असावं आणि त्यांच्या आर्त किंकाळ्यांनी आपलं काळीज विदीर्ण व्हावं. यातल्याच काही निवडक घटनांना थोडासा मुलामा चढवून इथे पेश करतोय. आजची लॉकडाऊन स्टोरी आहे दत्तूमामा केंजळयांची.

शुक्रवार, ८ मे, २०२०

मुक्या जीवाचं लॉकडाऊन...

गावाकडचं लॉकडाऊन शिथिल होईल तेंव्हा खूप बरं होईल. वस्तीवरल्या गुरांच्या पाळीवर येणारा महादू वावरात यायचा बंद झाल्यापासून गायींनी वैरण खायची सोडून दिलीय आणि म्हशी काही केल्या धार देत नाहीत. मागल्या साली वासरू मेल्यावर चंद्रीच्या पुढ्यात तिचं वासरू पेंढा भरून त्याचं भोत करून ठेवलेलं. धारा काढायची वेळ झाली की पितळी चरवी घेऊन महादू हजर व्हायचा. एकेक करून सगळ्या दुभत्या जीवांच्या कासा हलक्या करायचा. सगळ्यात शेवटी चंद्रीपुढं जायचा. तिच्या जवळ येताच तिच्या पाठीवरून हात फिरवायचा, पेंढा भरून ठेवलेलं तिचं वासरू वस्तीतल्या कोठीतून बाहेर काढायचा, चंद्रीपासून दहाबारा फुटावर उभं करून ठेवायचा.  वासराकडं बघताच चंद्रीचं आचळ तटतटून फुगून यायचं. आचळावरच्या लालनिळ्या धमन्यांचं जाळं गच्च दिसायचं, महादूने कासेला हात लावायचा अवकाश की पांढऱ्या शुभ्र धारा चरवीत पडू लागायच्या. चरवी गच्च भरायची. मखमली फेस दाटून यायचा. धारा काढून होताच महादू चंद्रीच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा. तिच्या मऊ पन्हाळीला कुरवाळायचा. वशिंडाला अलगद दाबायचा. पोटापाशी मालिश केल्यागत हात फिरवायचा. चंद्री खुश व्हायची. हंबरडा फोडायची. तिच्या डोळ्यात कधी तरी पाझर फुटलेला दिसे मात्र चंद्रीचं दूध आटेपर्यंत महादूच्या डोळ्याचं पाणीही आटलं नव्हतं. तिचं दूध काढून झालं की त्याच्या डोळयाच्या कडा पाणावलेल्या असत. खरं तर त्याला वाटायचं की आपण चंद्रीला फसवतोय, तिच्या मेलेल्या वासराला दाखवून आपण तिचं दूध काढून घेतॊय. पण चंद्रीचं दूध आटण्यासाठी तिची कास कोरडी होणं गरजेचं होतं हे त्यालाही ठाऊक होतंच!

रविवार, ३ मे, २०२०

लॉकडाऊनच्या काळातली ‘ती’ची देखभाल ...

जिला रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेलं असतं, समजाने धुत्कारलेलं असतं, शासनदरबारी जिची कोणती किंमत नसते, जिचं अस्तित्वच मुळात कलंकीत ठरवलं गेलेलं असतं अशी ती म्हणजे वेश्या होय. लॉकडाऊनच्या या कठीण काळात तिचं कसं होणार या विषयीची पहिला आवाज मी 27 मार्च रोजी उठवला होता. त्यास प्रतिसाद देत विविध दिग्गजांनी मदतीचे आश्वासन दिले होते. काहींनी तर मलाच पैसे पाठवले होते, जे मी त्यांना तत्काळ परत केलेले. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयातूनही याची दखल घेतली गेली. तसेच समाजकल्याण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनेही मदतीचे आश्वासन मिळालं. खेरीज कालच सुप्रिया सुळे यांच्या वतीनेही विचारणा झाली. दरम्यानच्या काळात विविध ठिकाणी एनजीओजच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला होता.

मनाचे लॉकडाऊन...


कोरोना व्हायरसच्या जगभरातील थैमानाला आता दोन महिने पुरे झालेत. सर्वत्र हाहाकार उडालेला आहे आणि जो तो दिग्मूढ होऊन गेलेला आहे. यावर भाष्य करणारी एक कविता युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केली गेलीय. किंबहुना तिथल्या बहुतांश देशातील प्रमुख वर्तमानपत्रात देखील तिची दखल घेतली गेलीय. ब्रिटीश राजकवी सायमन आर्मिटेज यांनी ही कविता लिहिली आहे. कवितेचे शीर्षक आहे 'लॉकडाऊन' ! ही कविता लोकांना भावण्याचं एक प्रमुख कारण आर्मिटेज यांच्या शब्दरचनेत आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की या तर माझ्याच भावना आहेत. अगदी सहज सोप्या शब्दात प्रवाही चित्रमय लेखन शैलीत आर्मिटेज यांनी लॉकडाऊनच्या वेदनांना तरल स्वरूपात मांडलंय. बारकाईने वाचलं तर ही कविता एक पोट्रेट आहे, ज्यात एका मनाची तगमग आहे जे कित्येक दिवसापासून अज्ञाताच्या अंधारकोठडीत कैद आहे. देहाचंच नव्हे तर मनाचंही लॉकडाऊन झाल्यावर मनाला असंख्य इंगळ्या डसतात आणि त्यातून प्रसवणाऱ्या वेदना केवळ स्मृतीविलाप करणाऱ्या न उरता अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या ठरतात. आर्मिटेजनी कवितेत वापरलेल्या रूपकांचा पसारा इतका अफाट आहे की त्यांच्या अर्थाचा पट नभातून विस्तीर्ण व्हावा. महाकवी कालिदासाच्या मेघदूतपासून ते प्लेगबाधित ईयमच्या विजयापर्यंत अनेक बिंदू कवितेत लखलखत राहतात. त्यातून सुरु होतो स्वत्वाचा शोध जो वाचकास अंतर्मुख करून जातो.