रविवार, ३१ मे, २०१५

अनुवादित कविता - रफिक अहमद : मल्याळी कविता

वहिदा मरून गेली त्या रात्री 
तिची विधवा आई आस्मा ही घराबाहेर एकाकी उभी होती.
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..

भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.
उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.
झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला.
शेजारच्या झाडावरील घरट्यावरती उडुनी तो पडला.
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......

गावाकडची दुपार ....


गावाकडे उन्हाळ्यातली रणरणती दुपार झाली की घरोघरी फक्त अशी वृद्ध माणसेच असतात. घरातली गडी माणसे अन धडधाकट बाया बापड्या पोटापाण्यासाठी घराबाहेर असतात. स्वतःचे शेत शिवार आणि तिथं पिकपाणी असलं तरच लोक तिथं जातात, नाहीतर दुसरयाच्या वावरात रोजानं कामाला जातात. पाण्याची ओरड सगळीकडेच वाढलेली असेल तर सरकारी कामावर जातात, नाहीतर पंचक्रोशीत आसपासच्या शेतशिवारात जातात.

शनिवार, ३० मे, २०१५

पुष्प की अभिलाषा... आवर्जुन वाचावे असे.....



पुष्प की अभिलाषा... आवर्जुन वाचावे असे.....
चाह नहीं, मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ,
चाह नहीं प्रेमी-माला में बिंध प्यारी को ललचाऊँ,
चाह नहीं सम्राटों के शव पर, हे हरि डाला जाऊँ,
चाह नहीं देवों के सिर पर चढूँ भाग्य पर इठलाऊँ,
मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर देना तुम फेंक!
मातृ-भूमि पर शीश- चढ़ाने, जिस पथ पर जावें वीर अनेक !

गुरुवार, २१ मे, २०१५

मातीचे पाईक - फ.मु.शिंदे



चंद्र थकला होता रात्रभर जागला होता,
रात्रभर एकटाच चंद्र जागला होता

मामा मामा म्हणणारे दिवस नव्हते ;
ढगात तोंड खूपसून चंद्रच रडत होता……

चंद्राचे चिमुकले गेले, मामाचे वाडे गेले,
पाटीवर लिहून काढलेले रात्रीचे पाढे गेले…

एक काळ देशभरात आढळणारी एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळात मात्र बहुतांश करून ग्रामीण भागातच अस्तित्वात आहे. त्यामानाने शहरात तिचा अस्त झाला आहे. पूर्वी प्रत्येकाला मामा, मावशी, काका, काकी ही नाती विपुल असायची. जोडीला चुलत, मावस भावंडे असायची. या नात्यांचे सुख काही और असायचे. दिवाळीच्या वा उन्हाळी सुट्टीत मुले आवर्जून मामाच्या गावाला जायची वाट बघायची. एक अनामिक प्रेमाची, मायेची ओढ त्यात असायची. नात्यांमधला आस्थेचा संस्कार घट्ट विणेचा असायचा. एखाद्या वर्षी आजोळी जाऊन मामा, मावशीला भेट झाली नाही तर जीवाची उलघाल व्हायची. आता परिस्थिती बदलली आहे. आता चंद्रच एकटा पडला आहे कारण त्याच्याकडे पाहून अंगाईगीत गाणारी आईदेखील लुप्त झाली आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन वा मातेचा अपत्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन यामुळे हा बदल झालेला नसून परिस्थितीने काळवेळ यांच्यावर नियंत्रण मिळवून माणसाला यंत्रवत बनवले आहे. परिणामी कुणाजवळही फुरसत नाही. आईकडे बाळासाठी नाही आणि बाबांकडे तर कुणासाठीच वेळ नाही ! मग निंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला गं बाई ही तर फार लांबची गोष्ट आहे.

गुरुवार, १४ मे, २०१५

ओढ आषाढीची ....


माघ वारी झाली की पंढरीकडे जाणारा ओघ कमी होत जातो, माघ असेपर्यंत हवेत थोडासा गारवा असतो मात्र फाल्गुन येतानाच उन्हाची चाहूल घेऊन येतो. पीकपाण्यातून हाती काय आले याचा हिशोब हा महीना देऊन जातो. मग हळूहळू वस्त्यांवरची कामे उरकली जातात. येणारा दिवस उन्ह वाढवतच राहतो त्याची दखल बळीराजा घेत राहतो. फाल्गुनासवे वसंताचे आगमन होते अन निसर्गाला उधाण येते, पानाफुलातील रंगांची, गंधाची उधळण मन मोहते ! फाल्गुनातल्या अमलकी एकादशीला उन्हातही बऱ्यापैकी गर्दी पंढरीत गोळा होते, तिच्यातही वसंताचे उधाण दिसते. काहीसे सुसह्य ऊन, झेपेल अशी गर्दी यातून वाट काढत ही एकादशी निघून जाते. मराठी वर्षातल्या अखेरच्या महिन्यातले सण पुढ्यात येतात, रंगपंचमी अन होळी ! हल्ली पाण्याची ओढाताण वाढल्यामुळे सर्वत्र लहान मुले वगळता मोठी माणसे अपवादानेच रंगपंचमीचा आनंद लुटतात. होळीनंतर येणारी धुळवड मात्र बेजान गावात नवा जीव ओतायचा प्रयत्न करते ! पीक हाती न आल्याचे दुःख माणसे धुळवडीच्या निमित्ताने विसरतात, विहिरी तळाकडे गाळात रुतत चालल्याचे शल्य बाजूला सारतात, मातीला पडत चाललेल्या भेगा नजरेआड करतात, कणगीतले धान्य खाली चालल्याची व्यथा आपल्या पोटात ठेवून मातीशी एकरूप होतात ! मातीने कितीही छळले, कितीही वेळा दुष्काळ आला तरीही हे भूमीपुत्र धूळवडीला मातीला अंगाखांद्यांवर खेळवून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात. तिच्यात न्हाल्याशिवाय वर्ष संपू शकत नाही अशा भावना धुळवडीतून प्रकटतात !

सोमवार, ११ मे, २०१५

माझ्या मातीच्या माय भगिनी ....



चाफा,मोगरा,जाई-जुई अन सदाफुलीने हातात हात गुंफून एकत्र बाहेर पडावे तशा या माझ्या मायभगिनी सकाळ झाली की घरातलं सगळं आवरून सावरून कामाला बाहेर पडतात. भल्या पहाटे उठून झाडलोट सारवण करून चुलीवर चहाचे आधण चढवीत न्हाणीत हजर होतात. घरातली जाणती माणसे जागी झाली की मग तान्हुले कुणी असतील तर त्यांना जागे केले जाते. काठवटीत पीठ मळून चुलीवर त्याच्या खमंग भाकऱ्या करून एखादे कालवण करून भांडी कुंडी आवरुन ह्या मोतियांच्या माळा घराबाहेर पडतात…

रविवार, १० मे, २०१५

अस्सल नटरंगाची कहाणी .....



चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू आक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण त्यांच्याशी कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण 'अशा' माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट...

नेटमुशाफिरीत विख्यात दिग्दर्शक रवि जाधव यांची जुनी मुलाखत वाचनात आली अन 'त्यां'च्या त्या घटनेची आठवण झाली…….
दूरदर्शनवरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली…
त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाच्या तपस्येमुळे व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली, त्यातून एका कलाकाराची जिंदगानी कशी उध्वस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते.