शोषणाच्या नि देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या स्त्रियांना काय काय सोसावं लागतं हे मंजू सिंहनी अनुभवलं आहे. यातल्या हरेक स्त्रीला मुक्त होता यावं नि त्यांचा छळवाद संपावा यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं आहे. त्यात त्यांना पती अजित सिंह यांची उत्तम साथ मिळाली. मंजू आणि अजित या दांपत्याने आजवर साडेपाच हजार मुलींची सुटका केली आहे. बाराशे मुलींचे यशस्वी पुनर्वसन केले आहे.
1988 साली त्यांनी वेश्यावस्तीतल्या तीन मुली दत्तक घेतल्या आणि आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. दत्तक देण्यास स्त्रिया कच खाऊ लागल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण थेट मुलींच्या सुटकेचे उद्दिष्ट ठेवू! त्यांनी तशा पद्धतीने काम करण्याचा एक प्रोटोकॉल ठरवला. छोटेखानी टीम बनवली. त्यांचे काम इतके जबरदस्त होऊ लागले की त्यांचा आपसूक गवगवा होऊ लागला. त्यांनी संस्थेची नोंदणी करून स्वरूप व उद्दिष्टे व्यापक करण्याचे ठरवले. 1993 मध्ये त्यांच्या 'गुड़िया' या एनजीओची अधिकृत नोंदणी झाली.