शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

देशोदेशीच्या विवाह प्रथा - एक आकलन!



एक काळ होता जेव्हा विवाह ठरवला जायचा तेव्हा वर वधूचे जन्म देखील झालेले नसत. म्हणजेच मूल जन्माला येण्याआधी त्याचा विवाह कुणासोबत होणार आहे हे ठरवले जायचे! त्याचबरोबर हे विवाह केवळ दोन कुटुंबांचे संबंध जुळवून आणण्यासाठी केलेले द्राविडी प्राणायाम असत. पुढे जाऊन हे विवाह टिकविण्याची जबाबदारी त्या वर वधूपेक्षा कुटुंबातल्या सर्व सदस्यांची असे. कारण हे विवाह त्या दोघांचेच नसत! त्यांचे आपसात पटले नाही तरी बळजबरीने ते नाते निभावावे लागायचे. परिणामी अत्यंत शुष्क शरीरव्यवहार वगळता काहीच नसे! पती पत्नीचे नाते नावाला असे.त्यानंतरच्या काळामध्ये मुलाचे आणि मुलीचे आईवडील या दोघांचे लग्न ठरवू लागले त्यात त्या नवदांपत्याची परवानगी नावापुरती असे. घरच्या मोठय़ा माणसांचा दबावच इतका असे की ते म्हणतील त्या जोडीदारासोबत लग्न लावले जाई. लग्न म्हणजे आर्थिक संबंध जोपासण्याचा नामी सोहळा असे.

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

प्रिय महानोर



प्रिय महानोर, 

तुम्ही गेलात आणि शिवारं उदासली.
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.

गोठ्यातल्या गायी मौन झाल्या,
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली

उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले

गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला

उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले

तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली,
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या

रविवार, ३० जुलै, २०२३

लोभ आणि धर्म - ओशोच्या गोष्टी.



एकदा मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले होते आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता.
शेकडो पुरोहित आणि संन्यासी जमले होते. हजारो बघ्यांची गर्दी जमली होती.
पैशाचा बिनधास्तपणे मुक्तहस्ते व्यय सुरु होता. गाव मात्र वेगळ्याच कारणाने थक्क झाले होते!
कारण ज्या व्यक्तीने मंदिर बांधले आणि या सोहळ्यात एवढा पैसा खर्च केला त्याहून अधिक कंजूष माणूस कोणी असू शकत नाही, असे त्या गावातील लोकांना वाटत असे. ती व्यक्ती कंजूषपणाची आदर्श होती.

रविवार, ९ जुलै, २०२३

लखलखीत तेजाची 'चमक'!


दोन दशकांपूर्वी त्या काळातील ट्रेंडसेटर निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा टेलिफोन एक्सचेंजजवळ 'फॅक्टरी' नावाचे कार्यालय होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत आणि रात्री उशिरापर्यंत जगभरातून तरुणाईची जत्रा असायची. राम गोपाल वर्माने कारखान्यातल्या त्याच जत्रेतल्या रोहित जुगराज या मुलाला आपल्या टीममध्ये घेतलं होतं. श्रेय नामावलीत त्याचे नाव असणारे ‘जेम्स’ आणि ‘सुपरस्टार’ हे दोन्ही सिनेमे सपशेल पडले!  रोहितने पंजाबी सिनेमाचा मार्ग स्वीकारला आणि गिप्पी ग्रेवाल आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत 'जट्टा जेम्स बाँड' आणि 'सरदारजी' सारखे हिट चित्रपट केले. आता रोहित त्याची पहिली वेब सिरीज ‘चमक’ घेऊन आलाय. चमक दोन प्रकारची असते, एक जी जगभर दिसते, म्हणजेच ग्लॅमर आणि दुसरी, जी माणसाच्या आत असते, म्हणजे आत्मनिरीक्षण, आत्मज्ञान. 'चमक' ही वेबसीरिज या दोन फ्लॅशमध्ये धावणाऱ्या माणसाची कथा आहे.

शनिवार, २४ जून, २०२३

त्यांच्यासाठी एक खिडकी खुली राहूद्यात!

श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत झालेले हत्याकांड असो वा अल्पवयीन साक्षीचे अघोरी हत्याकांड असो किंवा नुकतीच झालेली सरस्वती वैद्य या प्रौढ महिलेची निर्घृण हत्या असो. अशा हत्याकांडामधून काही गोष्टी कॉमन जाणवतात.
एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री घर सोडून निघून जाते अथवा घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध तिच्या इच्छेने कुणासोबत तरी राहू लागते तेव्हा घरातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत, हिंसक नकारात्मक आणि विरोधाच्या असतात.
खूप कमी लोक असे असतात की जे आपल्या मुलीच्या/ बहिणीच्या किंवा घरातल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात.
बहुतेकांना मात्र आपल्याच इच्छा आपल्याच अपेक्षा तिच्यावर लादायच्या असतात.
यातून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये एक ज्वलंत संघर्ष जन्म घेतो.

आपल्या मुलीने आपल्याच मर्जीप्रमाणे राहावे, आपण सांगू तेच ऐकावे त्याचबरोबर आपण ज्याच्याशी तिचे लग्न ठरवू त्याच्यासोबतच तिने लग्न करावे यासाठी अनेक पालक हट्ट धरतात. तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.
परिणामी मुलीला असे वाटते कि आपले कुणीच ऐकून घेत नाही.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे..



हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

शिवबा आपल्याला खरेच कळलेत का?


शिवाजीराजे म्हणजे मराठ्यांचं काळीज असं जेंव्हा लिहितो तेंव्हा नकळत आपण आपला खुजेपणा दाखवत असतो. शिवबा सगळ्यांचेच काळीज होते !

शिवाजी महाराज कसे होते हे सांगताना जो तो व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेले वा ज्या रूपांत तो राजांना पाहू इच्छितो तेच वर्णन संबंधितांकडून केले जाते.
मग सकल शिवाजी महाराज कळणार तरी कसे?
मनातले सर्व अभिनिवेश नि सर्व भावभावनांना दूर सारून राजांना पाहिलं तर हिमालयाहून उत्तुंग आणि जळाहून नितळ असे पराक्रमी, दक्ष, चाणाक्ष दूरदृष्टी असणारे द्रष्टे धोरणकर्ते, कुटुंबवत्सल, रयतप्रेमी, ज्ञानी, संयमी, शांत, विचारी अशा अनेक बहुआयामी राजांचे चित्र समोर येते.

ते क्षत्रियकुलावंतस असल्याचा अभिमान आपण मिरवतो तेंव्हा तो त्यांचा अभिमान नसून आपला वर्गीय अभिनिवेश असतो.
शिवबा राजांचं अस्तित्व सकल कुळ गोत्र जात धर्म यापलीकडचं होतं, त्याचा अभिमान असायला हवा!

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात.