शनिवार, २४ जून, २०२३

त्यांच्यासाठी एक खिडकी खुली राहूद्यात!

श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत झालेले हत्याकांड असो वा अल्पवयीन साक्षीचे अघोरी हत्याकांड असो किंवा नुकतीच झालेली सरस्वती वैद्य या प्रौढ महिलेची निर्घृण हत्या असो. अशा हत्याकांडामधून काही गोष्टी कॉमन जाणवतात.
एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री घर सोडून निघून जाते अथवा घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध तिच्या इच्छेने कुणासोबत तरी राहू लागते तेव्हा घरातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत, हिंसक नकारात्मक आणि विरोधाच्या असतात.
खूप कमी लोक असे असतात की जे आपल्या मुलीच्या/ बहिणीच्या किंवा घरातल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात.
बहुतेकांना मात्र आपल्याच इच्छा आपल्याच अपेक्षा तिच्यावर लादायच्या असतात.
यातून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये एक ज्वलंत संघर्ष जन्म घेतो.

आपल्या मुलीने आपल्याच मर्जीप्रमाणे राहावे, आपण सांगू तेच ऐकावे त्याचबरोबर आपण ज्याच्याशी तिचे लग्न ठरवू त्याच्यासोबतच तिने लग्न करावे यासाठी अनेक पालक हट्ट धरतात. तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.
परिणामी मुलीला असे वाटते कि आपले कुणीच ऐकून घेत नाही.

मुलगी घर सोडून निघून गेल्यामुळे कुटुंबात, नात्यात, समाजात आपली बदनामी झाली हा समज आपल्याकडे मोठय़ा प्रमाणामध्ये दृढ आहे.
घर सोडून निघून गेलेल्या मुलीबद्दल तिच्या कुटुंबियांमध्ये कमालीचे नकारात्मक विचार असतात.
त्यामुळे या मुली द्विधावस्थेत सापडतात.

यातील काही मुली आपल्या पतीसोबत वा पार्टनरसोबत सुखात राहतात. त्यांच्यात काही वितुष्ट येत नसल्याने वा त्यात काही टीआरपी सदृश्य मटेरियल नसल्याने तशा घटना आपल्यासमोर येत नाहीत. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अगदी साचेबंद झाला आहे.

मात्र जर का या मुलींचे निर्णय चुकीचे ठरले तर त्यांना त्याचा प्रचंड पश्चाताप होतो, वाईट वाटते. मात्र त्या आपल्या जन्मदात्याच्या घरी परतू शकत नाहीत! कारण घरातल्या लोकांनी खोट्या इभ्रतीच्या मुद्यापायी त्यांचे परतीचे रस्ते बंद केलेले असतात.

परिणामी या मुलींना वाटयाला येईल ते सोसत राहणे हा एकच पर्याय उरतो. काही आयुष्यभर सोसत राहतात. तर काही मुली अपार खचून जातात. एकतर त्या जीव देतात अथवा त्यांची हत्या तरी केली जाते. आपल्या मुलीसाठी ज्यांनी घराची दारे कायमची बंद केलेली असतात ते लोक अशा घटना घडल्या की आक्रोश करू लागतात.

मुलगी घरातून निघून गेल्यानंतरच्या दरम्यानच्या काळात संपूर्ण समाजाचा आविर्भाव असा असतो त्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी कुठला तरी मोठा गुन्हा केला आहे! ज्या कुटुंबात अशा घटना घडलेल्या असतात त्या कुटुंबांना समाज अत्यंत वाईट वागणूक देत असतो. तोच समाज या मुलींच्या हत्या झाल्या की अचानक जागा होतो.

मात्र समाजाची जागृती त्या मुलीच्या जीवाबद्दलची नसते उलटपक्षी मुलीला मारणारा कुठल्या जातीधर्माचा आहे त्यानुसार लोक त्या घटनांना रंगवत राहतात, आपली विकृती त्यात मिसळत जातात आणि त्या भागी गुरुदेव मुलीचा मृत्यु एक सनसनाटी व्हायरल बातमी म्हणून लोकांच्या सोशल मीडियावर ते मिरवली जाते.

लोक आपापले गोल सेट करू लागतात. वास्तवात ही या पिढीची एक मोठी समस्या आहे, जिच्याकडे पाहण्याचा परिपक्व दृष्टिकोन आपण अद्यापही स्वीकारु शकलो नाही.

आपण आपल्या मुलींना समजून घेत नाही, तिचे निर्णय चुकले तर त्याच्यासाठी आपण दारे बंद करतो ते देखील समाजासाठी! जो समाज आपल्या व्यक्तिगत सुखदुःखातले कोणतेही सत्व सच्चेपणाने वाटून घेत नाही त्याच्यापायी आपण आपल्याच घरातील सुखशांतीला चूड लावतो हे अद्यापही आपल्याला आकळले नाही.

बऱ्याचदा असेही घडते की एक निर्णय चुकला नंतर ती मुलगी नव्याने दुसरा निर्णय घ्यायला जाते आणि आगीतून फुफाट्यात जाते. पहिल्या खेपेस तिचं म्हणणं ऐकून घ्यायला एखादा मित्र मैत्रीण तरी असते. दुसऱ्या वेळेस तिच्या पाठीशी कुणीच नसते!

या मुलींची, बायकांची अमानुष हत्या झाल्यानंतर अपवाद वगळता लोक त्यांच्यासाठी संवेदना व्यक्त करत नाहीत तर त्यांच्या मनातले गरळ ओकण्यासाठी व्यक्त होताना दिसतात!

संसाराची स्वप्ने बघणारी एक जिती जागती मुलगी जीवाला मुकली याचे ते दुःख नसते! तिला कुणी ठार मारले त्याच्या जातीधर्म आदी बाह्यांगांवरती लोकांचा संताप अवलंबून असतो.

येत्या काळात मरणारी मुलगी आपल्यापैकी कुणाच्याही कुटुंबातील असू शकते याचे आपल्याला भान उरले नाही. आपल्या धडावर आता शिर राहिले नाही, तिथे विकृतीने ताबा घेतलाय!

अशा घटना कमी व्हाव्यात वा या घटनांमधून काही अघटित घडू नये घडवणे असे वाटत असेल तर आपल्या मुलीशी संवाद असायला हवा. तिला समजून घेतलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे तिच्यासाठी परतीची दारे कायमुळे असावीत.

कळप सोडून गेलेल्या हरिणीच्या पाडसाची शिकार पिसाळलेला कुत्रा देखील करू शकतो, पाडस चुकले म्हणून कळप तिला सोडून पुढे जात नाही! तिने कळपासोबत राहावे याची दक्षता घेतच ते पुढची वाटचाल करत असतात.

आपल्या मर्जीने लग्न करताना घरच्यांचा विरोध असला की भविष्यात काही विलक्षण चुका घडतात, त्यांना टाळणं कठीण होऊन जातं!

काही प्रकरणात लग्नानंतर भावनांचा बहर ओसरतो, व्यावहारिक जगात वावरताना नि सहवासाच्या जवळीकीतून जाणवलेल्या निरिक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक असतो.
आपला जोडीदार आपल्याला अनुकूल नाही हे उमगते.
आपली जोडी योग्य नसून विजोड आहे हेही कळते!
आयुष्यभराचा जोडीदार म्हणून माणूस ओळखण्यात आपण फसलो आहोत हे ही उमगते!
इथून पुढे सगळी गल्लत होत जाते

आधीच घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलेले असते त्यामुळे आपला जोडीदार अपात्र, अयोग्य आणि सार्थ नाहीये हे ठाऊक असूनही त्याविषयी कसलीही वाच्यता न करता उलट त्याचे खोटे गुणगान गायले जाते, जेणेकरून आपल्या निर्णयावरुन झालेली नाराजी कमी व्हावी!

आपली फसगत झाली हे झाकून ठेवले जाते!
ह असे का होते याचे आणखी एक कारण म्हणजे जेंव्हा घरच्या मंडळींना डावलून लग्न केलेले असते तेंव्हा घराकडचे सर्व रस्ते दोन्ही बाजूंनी बंद केले गेलेले असतात, संवादासाठी एखादी फटदेखील शिल्लक ठेवलेली नसते.
आपल्या मनातली खंत सांगण्यासाठी एखादी खिडकीदेखील खुली नसते!
सारी माणसं परकी झालेली असतात.

अशा वेळी दोन्ही बाजूंनी किमान एक तरी माणूस खुल्या संवादासाठी उपलब्ध असायला हवा याचे भान राखले जात नाही.
त्यातून गुंता अधिकच वाढत जातो!

अक्षरशः मेलेलं नातं खोट्या आनंदाने माथी मिरवावं लागतं!
त्याच्या व्यथा वेदना मूक असतात ज्या त्या त्या व्यक्तीस रोज आतल्या आत जाळत जातात.

ज्यांना पश्चात्तापही व्यक्त करण्याची संधी नाकारली जाते ती तरुण मुलं / मुली कोसळून जातात नि त्यांचे संसार निव्वळ औपचारिकता बनून जातात आणि ते स्वतः जिवंत प्रेते बनून श्वास घेत राहतात!
या नात्यांना कसलाही अर्थ नसतो, त्यात कसलीही ओढ नसते निव्वळ ओढून ताणून ते नाते निभवावे लागते!
अशा जगण्याला काय म्हणावे?

यातून आणखी गंभीर चुका होत राहतात. अशा लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली वा तिला एखादे अपत्य झाले की मग तर तिच्या दुर्दैवाचे अक्षरशः दशवतार होतात. तिची कशी फरफट होते हे पाहण्यास देखील कुणी समोर येत नाही.

मात्र त्याऐवजी घर सोडून गेलेली मुलगी / मुलगा आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल, ते स्वतःच्या पायावर भक्कम उभे असतील तर फसवणूक होऊन देखील त्यांचा त्रास काहीसा कमी होतो. ते लवकर खचत नाहीत.
तरीदेखील अशा वाट चुकलेल्या मुलांना / मुलींना घरचा आधार सर्वाधिक हवाहवासा वाटतो!

"मुली / मुला तू मोकळेपणाने बोल, तुझा निर्णय चुकला असेल तर तू मोकळेपणाने घरातल्या कुठल्याही व्यक्तीपाशी कधीही सांग. तुझ्या भूतकाळास विसरून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले असतील" अशी ग्वाही दिली जाणं गरजेचे आहे.
अशा मुलीचे पुन्हा लग्न करता येते, नव्याने त्यांना उभं करता येतं.

त्यांची चूक दुरुस्त करण्याची संधी त्यांना देता येते मात्र हे आपण करतच नसू तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक नसतो!
त्यांनी जोशात नि भावनेच्या भरात निर्णय घेतलेला असतो आणि त्यांचं खरं म्हणणं ऐकून न घेणाऱ्यांनी केवळ कानकोंडेपणा केलेला नसतो तर त्या अपरिपक्व जीवांशी उभा दावा मांडलेला असतो, तोही बहुतांशी जग काय म्हणेल, नात्यातले लोक काय म्हणतील या भीतीने!

मुलांची / मुलींची मर्जी ध्यानात ने घेता केल्या गेलेल्या अरेंज्ड मॅरेजमध्येही बऱ्याचदा असे चित्र दिसते मात्र तिथे किमान घरचे रस्ते तरी खुले असतात.
परंतु त्या नात्यात काही दम नसतो.
करपलेले नाते आयुष्यभर रेटून न्यावे लागते.
घरच्यांना वाईट वाटेल म्हणून काहीजण सुखी असल्याचा दिखावा करत कुढत कुढत जगतात तर काहींना सुखाचे आभासी चित्र उभे करावे लागते!
या संसाराला सुखाचा संसार कसे म्हणावे?

हे चित्र बदलण्यासाठी सर्वांचीच मदत लागेल.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा