मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा - सलाम बॉम्बे..



हिंदी सिनेमा पूर्णतः निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच गणला गेला नाही त्याला काही सिनेमे कारणीभूत आहेत. चित्रपटाकडे पाहण्याचे विविधांगी दृष्टीकोन या गृहीतकामागे आहेत, गल्लाभरु सिनेमाच्या जोडीने असेही चित्रपट निर्मिले गेलेत की ते पाहून आपण सुन्न व्हावं, आपल्यातल्या माणसाने आत्मचिंतन करावं, झालाच तर क्लेशही करावा. अशा सिनेमांच्या यादीत एक नाव 'सलाम बॉम्बे'चे आहे! या सिनेमाविषयी विस्ताराने मांडणी करण्याआधी यातल्या एका सीनचा उल्लेख करावासा वाटतो.

यातला बाबा(नाना पाटेकर) हा रेड लाइट एरियातला एक नामचीन भडवा आणि ड्रगपेडलर असतो. एका सीनमध्ये 
त्याला भेटायला एक विदेशी पत्रकार इयन (संजना कपूर) आलेली असते, तिच्या सोबत हिंदी अनुवादक असतो जो बाबाचा परिचित असतो. बाबा त्याला सांगतो की त्याने रेखाला (अनिता कंवर) जगाच्या उकिरड्यातून बाहेर काढलंय आणि तिला तो आता आपली घरवाली समजतोय. तिच्यापासून झालेल्या मंजू (हंसा विठ्ठल) या मुलीला आपल्या अपत्याचा दर्जा दिलाय अशी मखलाशीही तो करतो.
बोलता बोलता तो सवयीप्रमाणे घसरतो आणि ती पत्रकार देखील मस्त चिकणा माल आहे हे तिला सांग असं त्या अनुवादकाला सुनावतो. अनुवादक चिडतो आणि असलं काहीही तिला सांगणार नाही असं उत्तर देतो!
त्यांच्या बाचाबाचीवर ती पत्रकार विचारते की, 'बाबा काय म्हणतोय?"
यावर अनुवादक खोटंच सांगतो की, "बाबा विचारतोय की चहा घेणार का?"
पुढच्याच सीनमध्ये बाबाच्या हाताखाली गर्द विकणाऱ्या टोळीतला हरकाम्या चिलीम (रघुवीर यादव) दोन कळकटलेल्या ग्लासमध्ये चहा घेऊन येतो. त्याला तिथं आलेलं पाहताच विकृत असलेल्या बाबाच्या डोक्यात बीभत्स कल्पना येते.
तो म्हणतो, "थांबा तुम्हाला मी गंमत दाखवतो, खूप मजा येईल!"
बाबा आपल्या कंबरेचा चामडी पट्टा काढतो आणि एकेक करून गंमत म्हणून चिलीमच्या पायाखाली फटके मारू लागतो. सुरुवातीला हाफ चड्डीमधला चिलीम बरोबर उड्या मारून ते चुकवतो. त्या गडबडीत त्याच्या खिशातून 555चे सिगारेट्सचं सोनेरी पाकीट पडतं, चहाचे ग्लास पडतात. फुटतात. त्याच्या पिंडरीवर पट्ट्याचे मजबूत वळ उमटतात. माराच्या वेदनेने चिलीम विव्हळू लागतो आणि अखेरीस पेकाटात लाथ बसल्यागत खाली बसतो! 
पस्तिशीच्या वयाचा, मळकटलेल्या देहाचा नि काळवंडलेल्या चेहऱ्याचा काटकुळा रोगट चिलीम कुत्र्यागत ओरडू लागतो! बाबाच्या चेहऱ्यावर विकृत हास्य विलसत राहतं. चिलीमच्या वेदना नि बाबाची विकृती सहन न झालेली इयन अनुवादकाला सोबत घेऊन तडकाफडकी निघून जाते.
एका मिनिटात तिथला नूर बदलतो. बाबा भानावर येतो आणि इतक्या वेळ वेदनेने कळवळणारा चिलीम चक्क हसू लागतो. चिडिया उड गयी म्हणून बाबाला खिजवतो! बाबाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि जुन्या हिशोबाचे कारण देऊन तो चिलीमला आपल्या टोळीतून बेदखल करतो. चित्रपटात चिलीम बाबाला पुरून उरत नाही मात्र त्या क्षणी तर तो त्याच्यापुढे झुकत नाही. तो देखील तावातावाने निघून जातो आणि जाताना अकस्मातपणे बाबाला हाताने इशारा करतो 'घे चढवून'चा !

'सलाम बॉम्बे'च्या हरेक फ्रेममध्ये एक कविता दडलीय आणि हरेक सीनमध्ये एक कथा आहे. वरती वर्णिलेल्या दोन  सीन्सच्या आधी आणि नंतर जे सिक्वेन्स आहेत ते अगदी सुन्न करणारे आहेत. नशेड्या बकाल एकाकी चिलीमच्या आयुष्याचा पाया घृणा, तिरस्कार, दारिद्रय, भणंग भयाण दुःखांवर आधारलेला असल्याने पट्ट्याचा मार त्याच्यासाठी अगदी किरकोळ असतो. त्याच्या आयुष्यात याहून भयंकर दुःखे असतात! माणसाच्या हाती काहीच नसलं आणि पुढ्यात बकाल भयाण उदास अंधारं आयुष्य असलं की त्याला वेदनेची, दुःखाची नशा चढते. त्याशिवाय त्यांना काही पर्यायही नसतो. किंबहुना दुःख हाच त्यांच्या आयुष्याचा पाया बनून जातो. दुःख नसलं तर ही माणसं अधिक सैरभैर होतात, उध्वस्त होतात आणि बेफाम होतात.

'सलाम बॉम्बे'मधून अशी माणसं एकेक करून समोर येत जातात आणि प्रेक्षक कोलमडून जातो. आपण जर सुखवस्तू असलो तर आपल्या सुखाची आपल्याला टोचणी लागते नि जर आपणच शोषित असलो तर मग सिनेमाच्या हरेक फ्रेममध्ये आपण स्वतःलाच शोधू लागतो! हे या सिनेमाचे उत्तुंग यश होते. 
'सलाम बॉम्बे'ची वीण बहुपेडी होती, यातली दुःखे समान नव्हती, यातल्या वेदनांचे सल भिन्न असले तरीही टोकदार होते, यातली पात्रं विभिन्न स्तरांवरची असली तरी काळाच्या कराल जबड्यात पिसलेली होती! मुंबईच्या बकाल रस्त्यांवरची अनाथ भटकी मुले असोत वा रेड लाईट एरियात अमानवी अवस्थेत जगणाऱ्या वेश्यांच्या भयाण गल्ल्या असोत हा सिनेमा काहीच भाष्य करत नाही, नुसतं मांडत जातो! किंबहुना दिग्दर्शिकेने भाष्य करण्याची जबाबदारी प्रेक्षकांच्या मस्तकी टाकून एक अणकुचीदार सल बहाल केलाय!

सिनेमाच्या कथेचा जीव इवलासा असला तरी ती आभाळाला गवसणी घालणारी गोष्ट होती! कृष्णा (शफीक सय्यद) हा पौगंडावस्थेतला किशोरवयीन गरीब फाटका पोर असतो. त्याच्या आईने त्याला अपोलो सर्कसमध्ये सोडून दिलेलं असतं. त्याच्या आईने त्याला तंबी दिलेली असते की भंगारात जमा झालेली त्याच्या थोरल्या भावाची सायकल सोडवून आणण्यासाठी जेंव्हा तो पाचशे रुपये कमावेल तेंव्हाच त्यानं घराचं तोंड पाहावं अन्यथा आपलं तोंड काळं करावं. लहानगा कृष्णा काही दिवस सर्कशीच्या चमूसोबत घालवतो आणि एके दिवशी सर्कस आपलं चंबूगबाळ आवरून स्थलांतरित होते. सर्कसचं सारं विश्व अवघ्या काही तासांत त्याला आपल्यापासून बेदखल करत निघून जातं. कृष्णा गांगरून जातो नि पुढच्याच क्षणाला सावध होतो. कुठे जायचं काहीच ठाऊक नसतं. नशीब नेईल तिकडे तो जातो आणि मुंबईला जाणारी ट्रेन पकडतो.

मुंबईत पोहोचलेला कृष्णा बेवारसाचंग जिणं जगू लागतो. लोकलचं स्टेशन त्याच्यासाठी आसरा बनतं. तिथं असणाऱ्या अनाथ नि घरादारा पासून परागंदा झालेल्या कळकट मळकट मुलांशी त्याची ओळख होते. हळूहळू तो त्यांच्यात सामावून जातो. तिथंल्याच रस्त्यावरच्या चाचाच्या कँटीनमध्ये तो चहावाला पोऱ्या म्हणून कामास लागतो! बदनाम गल्लीत चहा पोहोचवू लागतो. तिथली बायकापोरे त्याला चायपाव म्हणूनच त्याला ओळखतात. हेरॉईनच्या व्यसनात आकंठ बुडालेल्या भणंग अवस्थेतील चिल्लम (रघुवीर यादव) बरोबर त्याची मैत्री होते. चिल्लम हा फुटकळ ड्रगसप्लायर, अंमली पदार्थाच्या व्यवसायातील शेवटचा घटक! त्याचा बॉसवजा मालक बाबा(नाना पाटेकर) हा नावालाच माणूस असतो, कारण तो चमडी बाजारमधला एक उलट्या काळजाचा दल्ला असतो!

बाबाचे रेखा(अनिता कंवर) या मध्यमवयीन वेश्येशी संबंध असतात. खरे तर तिला या धंद्यात त्यानेच लोटलेले असते. मात्र त्याचा आव तर असा असतो की जणूकाही तोच तिचा मुक्तिदाता आहे! मंजू (हंसा विठ्ठल) ही रेखाची मुलगी. 
अशक्त, कुपोषित! रस संपलेल्या पाचटासारखं तिचं हडकुळं काळपट शरीर पाहून पोटात कालवतं. याच वस्तीत एक नवी कोरी हेमांगी षोडशवर्षीय पोर आलेली असते. रीतसर सौदा करुन तिची विक्री झालेली असते. तिथल्या शोषित स्त्रियांपेक्षा ती काकणभर अधिक देखणी वाटते. तिच्यातलं कोवळंपण गव्हांकुरासारखंय! तिचं निरागस मन त्याहून लुसलुशीत वाटतं. कृष्णाकडून ती चहा घेते, त्याला पैसे देऊ करते. कृष्णाच्या कोवळ्या मनाला तिची भुरळ पडत्ये, तो तिला 'सोलवा साल' या नावानेच पुकारतो. त्याच्या नकळत तिची ओढ लागून राहते. तर त्याच वेळी बाबाला तिच्यावर हात फिरवायचा असतो, तिची नथ उतरण्याआधी कुस्करता येतं का या विचाराने त्याचे प्लॅनिंग सुरु असतं. अखेर सोलवा सालची पहिली रात्र मुक्रर होते, वास्तवात तिला याचं फारसं गांभीर्यच नसतं.

खरं पाहता ती ज्या भकास ओसाड दुनियेतून आलेली असते ते पाहू जाता इथला नरक देखील तिला लोभस वाटत असतो. हे सारं तिच्या तारुण्याच्या शोषणापायी सुरु आहे याची तिला पुरेशी भनक नसते! याच दरम्यान बाबा आणि चिल्लम 
यांच्यात वैमनस्य येतं. चिल्लम पैशाला मौताज होतो. काही केल्या त्याच्या नशेची तलफ जात नाही. त्याची तडफड पाहवत नाही. कृष्णा त्याला जीवापाड मदत करु पाहतो मात्र तो बचावत नाही. भणंग भिकारी गर्दुल्ल्या चिल्लमची अंत्ययात्रा निघते तेंव्हा भडभडून येतं. आपली हतबलता डोळ्यांतून वाहू लागते. क्लायमॅक्सला कृष्णाला घराची ओढ लागते मात्र त्याने कष्टाने जमा केलेले पैसे देखील चिल्लमने आपल्या व्यसनात उडवलेले असतात. कृष्णाचं माघारी फिरणं दुरापास्त वाटू लागतं. मुंबईच्या रस्त्यावरती बेवारसाचं जगणं त्याच्या वाट्याला उरतं. सिनेमाच्या अखेरीस काळीज पोखरणारा सवाल प्रेक्षकांच्या वाट्याला येतो!

विकसनशील देशांत विकासाच्या नावाखाली बकाल होत चाललेली शहरे आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणाऱ्या तिथल्या शोषणकथा आपल्या नजरेसमोर येतात. कॅमेरा संथगतीने फिरतो, दिग्दर्शक वा संवादलेखक आपल्याला प्रबोधनाचे कोणतेही डोस पाजत नाही, किंबहुना कोणताही मेसेज देणारं एकही पात्र यात नाही. मीरा नायरनि हे हेतुतः केलं असावं कारण याला प्रबोधनाचा बाज दिला असता तर निव्वळ डॉक्युमेंट्रीचं स्वरूप आलं असतं. त्यापेक्षा आपण अगदी टोकदार मांडणी करत राहायचं आणि त्याचवेळी त्यावर काहीच भाष्य करायचं नाही हा फंडा दिग्दर्शिकेने वापरलाय जो अत्यंत प्रभावी ठरलाय. सिनेमा ज्याला जसा रिलेट होतो जो ज्या दृष्टिकोनाने सिनेमा पाहतो त्याला त्या त्या प्रतिमेत तो दिसतो! तरीदेखील रस्त्यावरची अनाथ भटकी मुलं, अंधकारमय असणारं त्यांचं वर्तमान, त्यांच्या प्रति समाजाची असंवेदनशीलता आणि यासगळ्याकडे कमालीच्या बधिरपणाने पाहणारी व्यवस्था हे सारं अंगावर येतं.

जी मुले कायद्याच्या भाषेत गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या बालपणाचे संरक्षण होणं गरजेचे आहे अशा दोन्ही 
वर्गवारीतील मुलांच्या समस्येवर हा सिनेमा बोट ठेवतो. किरकोळ चोरीपासून ते कृष्णाने बाबाला मारल्याच्या घटनेपर्यंत सिनेमा अगदी सूक्ष्म निरीक्षणे नोंदवतो. 'सोलवा साल'चं कमालीचं निरागस असणं आणि अधाशी मुंबईच्या वासनेत तिचा सहज बळी जाणं हे इतक्या मृदू पद्धतीने दाखवलंय की कोणताही बिभत्सपणा न करता तो प्रसंग हादरवून सोडतो. अखेरचे श्वास मोजत असणाऱ्या चिल्लमसाठी कृष्णाचं कासावीस होणं, त्याच्यासाठी औषधं आणणं, त्याला खाऊ घालून त्याची काळजी घेणं हे अत्यंत नितळपणे समोर येतं. या सगळ्या कुकर्मासाठी केवळ बाबाला जबाबदार ठरवून आपण मोकळे होऊ शकतो का? याकरिता सामूहिक विवेकाच्या शीर्षकाखाली आपल्यापैकी हरेकास सजा द्यावी का? सूड आणि प्रतिशोध यांच्या भावनावेगाखाली भरकटलेल्या बालकांसाठी आपल्याकडे काय योजना आहेत वा कोणतं समुपदेशन केलं जाणार आहे या बाबतीत पूर्णतः अंधकार आहे. समाज म्हणून आपलं अपयश आणि गुन्हेगारांच्या हातात हात घालून चालणारा कायदा, प्रशासन यांच्यासमोर आपणच कःपदार्थ वाटू लागतो. 'सलाम बॉम्बे'चे हे मोठे यशच म्हणावे लागेल.
चहावाला कृष्णा त्याच्या हरवलेल्या निरागसतेसाठी रडतो आणि अखेरीस त्याचं रूपांतर कशात होतं हे परिवर्तन पोटात गोळा आणणारं आहे. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या चिल्लमप्रमाणे तो पहिल्यांदा मुंबईत कसा आला आणि आता फक्त निराशेचे आणि दुःखाचे मळभ अनुभवतो हे पाहताना त्याचं ते 'विसरणं' बरं वाटू लागतं.

मुंबईचं झगमगाटाचं रुपडंच जगापुढे नित्य मांडण्याकडेच साऱ्यांचा कल असतो, सिनेमाखेरीज साहित्यातून देखील झुकते माप दिले गेलेय. भाऊ पाध्ये, अरुण साधू, जयवंत दळवी, मधू मंगेश कर्णिक आदींनी मात्र मुंबईची काळी बाजू समोर आणलेली. मुंबईच्या झगमगाटाआडचा भेसूर चेहरा त्यांनी नेमका समोर आणला. कास्टिंगमधल्या सर्वच अभिनेत्यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. प्रभावी दिग्दर्शन, नेटकं छायाचित्रण, अफलातून सिनेमॅटोग्राफीमुळे सिनेमा अत्यंत बोलका झालाय. सिनेमा बालगुन्हेगारीवर फोकस करत असतानाच यातलं कृष्णाचं मुख्य पात्र निभावणाऱ्या कृष्णाने रीअल लाईफमध्ये एका स्टोअरमध्ये चक्क चोरी केली, त्याला अटक झाली तेंव्हा नकळत सिनेमातला मुख्य कंटेंट ओरिजिन चर्चेत आला होता. या सिनेमापासून प्रेरणा घेत 'सलाम बॉम्बे' याच नावाने स्वयंसेवी संस्था उभी राहिली जी स्ट्रीट चिल्ड्रेन्ससह मुलांच्या करिअरसाठी, क्रिडा कौशल्य विकासासाठी काम करतेय! मुंबईमधल्या अनेक मुलांच्या जीवनात या संस्थेने आशेचा किरण आणलाय! मीरा नायरच्या 'सलाम बॉम्बे'ला आणि अशा सिनेमांना आपलंसं करणाऱ्या बॉलिवूडला याचे श्रेय जाते.
#lovebollywood हा हॅशटॅग त्यासाठीच तर आहे!

- समीर गायकवाड

1 टिप्पणी: