इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.