Tuesday, May 4, 2021

मासूम - दो नैना एक कहानी...


आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.

बदलत्या काळानुसार अनेक गाणी आली आणि गेली, काही विस्मृतीत गेली. पुर्वी रेडिओ नित्य ऐकायचो तेंव्हा अनेक चांगली गाणी सतत कानी येत राहायची. काळ पुढे जात राहिला, मनोरंजनाची साधने बदलली आणि रेडीओ लुप्त झाला. मायेची माणसे दूरदेशी देवाघरी गेली आणि जगणे अधिक कृत्रिम होत गेले. यांत्रिक जीवनाचा भाग म्हणून मनोरंजन राहिले, त्यातला जिवंत रसरशीतपणा कधी संपला काही कळालेच नाही... 'मासूम' गाजला त्यातल्या कथेमुळे ; नसिरुद्दीन, शबाना, उर्मिला आणि जुगलच्या अभिनयामुळे ! यातील गीतांनी ह्या चित्रपटाचे सोने केले. एकापेक्षा एक सुरेल अन अर्थपूर्ण गाणी यात होती. आरडींचे संगीत, गुलजारजींची गाणी अन एकापेक्षा एक महान गायकांची गायकी असा अमृतसंगीताचा योग यात होता. यातले 'तुझसे नाराज नही' हे जास्त लोकप्रिय झाले पण मला भावते ते 'दो नैना एक कहानी' हे गाणे !

नसिरुद्दीन आणि शबानाचा दृष्ट लागण्यासारखा सुखी संसार. त्यात नसिरुद्दीन आणि सुप्रिया पाठकचे प्रेमप्रकरण! आणि मग जुगलचे आगमन. सुप्रिया पाठकचा दुर्दैवी मृत्यू. आणि मग आपलं पित्याचं कर्तव्य निभावण्यासाठी नसीरने जुगलला घरी आणल्यामुळे निर्माण झालेलं वादळ. आकाशपाताळ एक करण्याचा शबानाला पूर्णपणे हक्क ! तिची प्रतिक्रिया संयमी ! मनात विचारांचे आणि दुःखाचे वादळ असूनसुद्धा ! आपल्या कुटुंबातील दैनंदिन कर्तव्य यांत्रिकपणे पार पाडण्याचे काम ती पार पाडत असते. नसीरची तर अजूनही जास्त कुचंबणा. शबाना आपल्या दोन मुलींवर प्रेमाचा वर्षाव करीत असताना जुगल एका कोपऱ्यात राहून बाह्यस्वरूपी अलिप्तपणे आपलं जीवन जगत असतो. दिवसा खेळण्यात बागडण्यात त्याचा वेळ जातो परंतु त्याची रात्र मोठी कठीण असते. कारण सांज भल्या भल्या माणसांना आठवणीच्या सयीत विरघळवते. सांजेला जोडून येणारी रात्र माणसाला भावुक बनविते आणि आठवणींचा कल्लोळ माणसाच्या मनात निर्माण करते. एके रात्री शबाना आपल्या मुलींसाठी अंगाईगीत गात पुढे गायलेलं 'दो नैंना ..' हे गीत जुगलच्या कानी पडते. तो आपल्या अभ्यासिकेतून बाहेर येतो. हे गाणे अर्थातच त्याच्या मनात त्याच्या आईच्या आठवणी सचेत करते.

चित्रपटात हे गीत गातेय शबाना पण ते जुगलच्या मनातील भावनांच्या तरंगांशी अधिक मिळते जुळते आहे. 'दो नैना और एक कहानी, थोडा सा बादल थोडा सा पानी और एक कहानी..' या ओळी ऐकून जुगल बाहेर येतो आणि शबानाला तिच्या मुलींसाठी हे गाणे अंगाई म्हणून गाताना पाहतो. त्याचा जीव कासावीस होतो. 'थोडासा पानी' तर त्याच्या डोळ्यात केंव्हाच आलेय पण यातील जी 'एक कहानी' आहे, ती तिघांचीही वेगवेगळी आहे. शबानाचे दुःख वेगळे, नसीरची व्यथा अबोल शब्दातली तर जुगलचे वयच लहान अन दुखाचा डोंगर मोठा. जुगलला त्याची आई आठवते, तिचे प्रेम आणि सहवासातले क्षण त्याच्या काळजातून डोळ्याच्या पारयात उतरतात. नसीर त्याच्या मागे येऊन उभा राहतो पण थिजलेल्या अपराधी माणसासारखा ! ही दास्तान 'दो झिलोमे बहती रहती है' अशीच आहे. भावनांचे अनेक कंगोरे, तिन्ही पात्रांची घुसमट आणि वेदनेचे अचूक प्रकटन हा या गाण्याचा आत्मा आहे. हे गाणे ऐकताना 'गेले द्यायचे राहून' ही भावना अन कर्तव्य जे करायचे राहून गेले याचे एकत्रित स्मरण करून देते. काळाच्या पटलावर मोहरे होऊन जगताना आलेली यांत्रिकता अन वास्तविक जीवनात स्वीकाराव्या लागणाऱ्या तडजोडी सतत डोळ्यापुढे येत राहतात. अन अस्वस्थता वाढत जाते. हे गाणे मनावर अजब गारुड करून जाते. हव्याहव्याशा वाटणाऱ्या दुःखाचा पुनर्प्रत्यय देत राहते. 'मासूम' पाहताना नकळत डोळ्याच्या कडा दरवेळेस ओले करून जाते. या गाण्याला त्या वर्षीच्या उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्याला कारण म्हणजे गायिका आरती मुखर्जी ! विलक्षण आर्त व काहीसा कातर असा, पण मोकळा वाटणारा तलम आवाज हे या गायिकेचे वैशिष्ट्य गाण्याच्या प्रत्येक शब्दात जाणवत राहते. ह्या आवाजाची एक दर्दभरी मिठास या गाण्याला अजरामर करून गेलीय यात शंकाच नाही. शेखरकपूरने गाणे सजीव केलेय तर शबाना, जुगल अन नसीर हे तिघेही आपआपले पात्र जगलेत...

आजही कधीही कोठेही हे गाणे ऐकले की मन तल्लीनही होते अन वेदनेच्या स्मृतीवर आठवणींची हळुवार झुळूक अलगद फुंकर मारून जाते. 'मासूम'च्या अखेरीस शबाना जुगलला स्वीकारते. स्त्रीत्व आणि मातृत्व यांच्या लढाईत मातृत्व जिंकते. नसीरच्या गतकाळातील चुका, शबानाशी झालेला विश्वासघात, सुप्रियाचं अकाली निधन अन पोरका झालेला जुगल यात कुणाचा दोष यावर शबाना खोलात जाऊन विचार करते. उदार अंतःकरणाने नसीरला माफ करते. जुगलवर मायेचं छत्र धरते. तिच्यातली आई जिंकते. 'मासूम'चा आणखी एक महत्त्वाचा प्लसपॉईंट म्हणजे जुगल हंसराजचा अत्यंत निरागस कोवळा चेहरा. त्याच्या डोळ्यात अनाथ मुलाचं आईसाठी आसुसलेलं मन सहज तरळतं. गतकाळातील चुकांना मागे टाकून ममत्वाने पुढे जात राहण्याचं उदात्ततेचं जीवनतत्व 'मासूम'मधून समोर येतं. जगणं सुलभ होण्यासाठी त्याचा आधार वाटतो.

- समीर गायकवाडNo comments:

Post a Comment