रविवार, १२ एप्रिल, २०२०

कोरोना व्हाया ‘अल कॉलरा’..

सोबतचे चित्र - 1562 मधलं पीटर ब्रुगेल यांचं 'ट्रायंफ ऑफ डेथ'.
कोरोना व्हाया ‘अल कॉलरा’..
लेखक, कवी हे खऱ्या अर्थाने संवेदनशील असले तर ते कालानुगतिक सुखदुःखांच्या झुल्यावर शब्दांची मैफल सजवत जातात त्यावर कधी अश्रू झोका घेतात तर कधी हसू ! निर्मिकाचं कामच मुळात असं असतं. स्वमग्नतेच्या कोषात दंग होऊन निर्मिलेलं साहित्य तात्कालिक यश मिळवू शकतं मात्र काळाच्या कसोटीवर लिहिलेलं साहित्य दीर्घकालीन ठसा उमटवतं. भवतालच्या विश्वाचा आपल्याला जसा उमगेल तसा धांडोळा घेणं हे सच्च्या साहित्यिकाचं लक्षण मानलं जातं. त्या त्या कालखंडात येऊन गेलेल्या साथी, रोग, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुकांमुळे घडलेल्या घटना, युद्धे, गृहकलह, मानवी वर्तनातील विरोधाभास आणि मानव विरुद्ध इतर चराचर अशा अनेक बाबींचं प्रतिबिंब खऱ्या साहित्यात जोरकसपणे उमटतं. जगभरातील प्रतिभावंतांनी आपापल्या परीने ते शब्दबद्ध केलंय.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

कोरोनाचे संक्रमण - इतिहासाचं अनोखं स्मरण !


सोबतचा फोटो चार एप्रिलला युरोपमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे छायाचित्र म्हणजे मानवी इतिहासाला निसर्गाने दिलेली चपराक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे दृश्य ग्रीसमधलं आहे. यात दिसणारा पेरिक्लेसचा पुतळा अथेन्समधला आहे. पेरिक्लेसचा काळ अडीच हजार वर्षापूर्वीचा असला तरी आताच्या कोरोना व्हायरस आऊटब्रेकशी त्याचा एका अर्थाने संबंध आहे. आजघडीला कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर युरोप हादरून गेलंय, त्यात ग्रीस देखील सामील आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वव्यापी झाल्यावर अथेन्समधल्या सर्व प्रमुख इमारती, गर्दीचे चौक, रस्ते धुण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून पेरिक्लेसचा पुतळा सॅनिटाइझ केला गेला. नेमक्या त्याच क्षणी हा फोटो क्लिक केला गेला आणि अख्ख्या युरोपमध्ये तो व्हायरल झाला ! असं काय होतं या फोटोत ? हे जाणून घेण्यासाठी इतिहासात बरंच मागे जावं लागेल.

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...

चीनमधल्या लॉकडाऊन स्टोरीज आता एकेक करून समोर येताहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चीनी दैनिकात एक कथा प्रसिद्ध झालीय. आशियाई देशात ती खूप व्हायरल झाली. पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्या व्यक्तीची मुलाखत प्रसिद्ध करायचं ठरवलं जेणेकरून लोकांच्या मनातली भीती कमी व्हावी आणि करोनाविरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी. ही दास्तान आहे फेंग ली या तरुणाची. सहा महिन्यापासून आपल्या आईवडिलांना भेटायला जायचं त्याच्या मनात घाटत होतं. कामाचा ताण काही केल्या कमी होत नव्हता. वुहानला जायची सवड काही केल्या मिळत नव्हती. अखेर योग जुळून आला. डिसेंबरच्या मध्यास त्यानं वुहानला आपल्या आईवडिलांकडे यायचं नियोजन पक्कं केलं. तो घरी येताच त्याच्या मातापित्यांना प्रचंड आनंद झाला. दरम्यान शहरात एकेक करून करोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. लीच्या घरीही याची दहशत जाणवत होती. मात्र पुढे जाऊन इतकं कठोर लॉकडाऊन होईल आणि आपलं आयुष्य त्यात गोठून जाईल याची त्याच्या कुटुंबातील कुणीच कल्पना केली नव्हती. जानेवारीत वुहानच्या सगळ्या सीमा सील करण्यात आल्या. लॉकडाऊन फारतर दोनेक आठवडे चालेल असा त्यांचा कयास होता. पण तसं झालं नाही. काळ जसजसा पुढं जात होता तसतसं लॉकडाऊनचा फास घट्ट आवळत होता. कसलीही दयामाया नव्हती की कुणाला त्यात सूट सवलतही नव्हती. पहिल्या दोन आठवड्यात भाजीपाला आणि जरुरी अन्नधान्य आणण्यासाठी घराबाहेर पडण्यास अनुमती होती. सुपरमार्केटस त्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. पुढे जाऊन घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. सर्वांच्या घराच्या दरवाजांवर सील लावण्यात आलं.