Wednesday, June 28, 2017

दाग देहलवी - आईच्या अधुऱ्या प्रेमाची गझल.....

daag dehlavi

दाग देहलवींचे खरे नाव नवाब मिर्झा खाँ. त्यांचे वडील नवाब शमसुद्दीन खाँ हे फेरोझपूर झिर्काच्या नवाब लोहारुंचे भाऊ होते. दागजींची आई वझीर खानूम ही दिल्लीतल्या मोठया सुवर्णकाराचीहस्तकलाकाराची अत्यंत देखणी मुलगी होती. नवाब शमसुद्दीन यांच्या व्यक्तीमत्वावर सौंदर्यावर भाळून तिने हट्टाने त्यांच्याशी निकाह लावला. खरे तर हे तिचे दुसरे लग्न होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ती इंग्रज अधिकारी मार्स्टन ब्लेक याच्या सोबत पळून गेली होती. (अठराव्या शतकात एक मुस्लीम युवतीने केलेलं हे जिगरबाज धाडस अत्यंत सनसनाटी होतं) मात्र काही वर्षांनी मार्स्टन ब्लेकचा खून झाला. (त्याच्या खूनाची करणे अज्ञात असली तरी सौंदर्यवती पत्नी खानूमपायीच त्याला प्राण गमवावे लागल्याचा कयास इतिहासकार बांधतात)

पतीचा खून झाल्यावर त्याच्यापासून झालेल्या दोन मुलांसह ती दिल्लीला परतली. दिल्लीला आल्यावर दुसरा निकाह नवाब शमसुद्दीन खाँशी केल्यावर तरी सुखाचा संसार होईल असे तिला वाटत होते. नवाबासोबत दिल्लीत असताना तिच्या पोटी मिर्झा उर्फ दाग चांदणी चौक परिसरात जन्मास आला. पण पुढे जाऊन वझीर खानूमचा संसार सुखाचा झाला नाही. विल्यम फ्रेझर ह्या अत्यंत उमद्या व देखण्या ब्रिटीश एजंटच्या खुनाच्या कटाच्या आरोपाखाली शमसुद्दीन खाँ यांना फासावर लटकावण्यात आले. विल्यम फ्रेझरचे वझीर खानूमवर प्रेम असावे या संशयातून नवाबाकडून हे कृत्य घडले. नवाबाच्या पश्चात चौतीस वर्षाची खानूम आणि चार वर्षाचा दाग यतीम होतील असे वाटत होते पण नियतीने त्यांची पुन्हा साथ दिली. 

दिल्लीचा अखरेचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा मुलगा मिर्झा मुहंमद फकरु याच्याशी वझीर खानूमचा निकाह झालाती त्यांची दुसरी पत्नी होती. हे लग्न तिने आपल्या मर्जीने केले पण तिचे मन लाल किल्ल्यात फारसे रमत नव्हते. मात्र इथे असताना दागला शायरीचे वेध लागले. आजोबा बहादूरशहा यांना असणारे शेरोशायरीचे व्यसन त्याच्या रोमारोमात भिनले. विख्यात प्रतिभावंत शायर जौकला त्याने गुरु मानले. मिर्झा गालिबनीही त्याला काही सल्ले दिले. थोडंसं स्थिरस्थावर होते आहे असे वाटत असतानाच वझीर खानुमवर पुन्हा कुऱ्हाड कोसळली.

१८५६ च्या सुमारास मिर्झा फकरु वयाच्या चाळीशीच्या आतच मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवस वझीर खानूम दागसह तिथेच राहत होती पण पुढच्याच वर्षी उठाव झाला आणि लाल किल्ला सोडून ते रामपूरला रवाना झाले. या वेळी दाग २५ वर्षांचे होते तर त्यांची आई ५५ वर्षांची होती. वृद्धत्वाकडे कलत असूनही तिचे सौंदर्य कमी झाले नव्हते ! तिथे युवराज नवाब कल्ब अली खाँ च्या आश्रयास ते राहू लागले. (भारतीय नवाबांच्या इतिहासात सर्वात जास्त वासनांध आणि ऐय्याशी नवाब म्हणून या कल्ब अली खाँचे नाव काळ्या अक्षरात नोंदले गेलेले आहे. त्याच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा निकाह झाला तर पतीच्या आधी त्याच्या सोबत तिला रात्र काढावी लागे. हा मेल्यानंतर त्याच्या कबरीतून दोन वेळा बाहेर लोटला गेला होता शेवटी त्याची उभी कबर बांधली गेली. आजही रामपूरमध्ये ही उभी कबर अस्तित्वात आहे.) 

या नवाबापाशी दाग आणि त्याची आई तब्बल तीस वर्षे राहिले. त्याचे नवाबाला शायरी सुनावण्याचे काम चाले. या काळात वझीर खानूमची मानसिक अवस्था फार विमनस्क झाली होती. तिला भास होत राहायचे. आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या या पुरुषांवर तिने मनस्वी प्रेम केलं होतं. १८८७ मध्ये या नवाबाचा मृत्यू झाल्यावर दाग देहलवी तिथून पुन्हा दिल्लीला आलेदिल्लीहून हैदराबादला गेले. हैदराबादच्या निजामाचे ते काव्यगुरु झाले. इथे त्यांनी प्रदीर्घ काव्यलेखन केलं. १९०५ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 

दाग जन्मले तेंव्हा त्यांच्या आईला समाजमान्यता उरली नव्हती. जन्मापासून त्यांना सावत्र भावंडे होती. पुढेह जाऊन सावत्र वडील लाभले. शिवाय कल्ब अली खाँचा 'तसलादरबारही त्यांनी अनुभवला. इथे त्यांची आई सैरभैर झाली. आपल्या आईची अवस्था त्यांना बघवत नव्हतीतिचं प्रेमव्याकुळ होत राहणं आणि एकेक करून तिचे जोडीदार हिरावून घेतलं जाणं दागच्या मनावर आघात करून गेलं. हैदराबादेत असताना आपल्या आईच्या या व्याकुळ अवस्थेचं शब्दांकन करताना त्यांना सुचलेली गझल म्हणजे - 
"तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था
न था रक़ीब तो आख़िर वो नाम किस का था। "

आईच्या नावाने नियमित काळाच्या अंतराने आलेल्या प्रेमाच्या अध्यायात (पैगाममध्ये) नवे नाव कोरलेले असेते नाव विधात्याने धाडलेले होते म्हणून ते प्रेमिकाचे नाव नव्हतेते तिच्या जोडीदाराचे नाव होते. आपल्या मातेस तिला हवे असणारे प्रेम चिरंतन स्वरूपात कधीही लाभू शकले नाही. कुमार वयापासून ते जरठ अवस्थेपर्यंत तिला प्रेमव्याकूळ जिणं जगावं लागलं याचं टोकदार दुःख या गझलेतून दाग देहलवींनी मांडलं गेलंय. "गुज़र गया वो ज़माना कहें तो किस से कहेंख़याल दिल को मेरे को सुबह-ओ-शाम किस का था।"
"अगर्चे देखने वाले तेरे हज़ारों थेतबाह हाल बहुत ज़ेरे-बाम किसका था।" या ओळी वाचताना अंगावर काटा येतो. आपण (आपली आई) बेवफा कधीच नव्हतो पण नियतीचे गुलाम होतो याची टोचणी शेवटच्या ओळीत व्यक्त केली आहे. एका शायराने आपल्या कमनशिबी आईच्या फरफटीचे केलेलं हे वर्णन काळजाचा ठाव घेऊन जातं..

'तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था
न था रक़ीब तो आख़िर वो नाम किस का था।वो क़त्ल कर के हर किसी से पूछते हैं
ये काम किस ने किया हैये काम किस का था।

वफ़ा करेंगेनिबाहेंगेबात मानेंगे
तुम्हें भी याद है कुछये कलाम किस का था।

रहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा
मुक़ीम कौन हुआ हैमुक़ाम किस का था।

न पूछ-ताछ थी किसी की वहाँ न आवभगत
तुम्हारी बज़्म में कल एहतमाम किस का था।

हमारे ख़त के तो पुर्जे किए पढ़ा भी नहीं
सुना जो तुम ने बा-दिल वो पयाम किस का था।

इन्हीं सिफ़ात से होता है आदमी मशहूर
जो लुत्फ़ आप ही करते तो नाम किस का था

तमाम बज़्म जिसे सुन के रह गई मुश्ताक़
कहोवो तज़्किरा-ए-नातमाम किसका था।

गुज़र गया वो ज़माना कहें तो किस से कहें
ख़याल दिल को मेरे को सुबह-ओ-शाम किस का था।

अगर्चे देखने वाले तेरे हज़ारों थे
तबाह हाल बहुत ज़ेरे-बाम किसका था।

हर इक से कहते हैं क्या दाग़’ बेवफ़ा निकला
ये पूछे इन से कोई वो ग़ुलाम किस का था।'

आजही कधी ही गझल ऐकताना दाग आणि त्यांची आई यांचा इंद्रधनुष्यी कॅनव्हास डोळ्यापुढे येतो. एका मनस्वी बंडखोर तरुणीचे आयुष्य कसे चुरगाळत गेले आणि तिच्या मूक वेदना तिच्या मुलाच्या काळजात कशा पाझरत गेल्या याचे चित्र तरळत राहते...
कवीचे अनुभव जितके सच्चे आणि दाहक तितके त्याचे काव्य मनाला थेट भिडत जातेअगदी अणकुचीदार शस्त्राने घायाळ करावे तसे त्याचे काव्य आघात करून जाते...

समीर गायकवाड.

टीप - प्रसिद्ध गझल अभ्यासक श्री. प्रदीपजी निफाडकर यांच्या लेखाच्या आधारे ब्लॉग लिहिला आहे.