तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर,
माझ्या ऐन उमेदीत माझी गाईलीस ओवी,
माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गूळ,
अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ,
मेल्यावर तुझे ठायी पुन्हा ए कदा रुजू दे,
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर पाच दशके इतक्या विस्तृत काळात अत्यंत देखणी, आशयसंपन्न अशी कविता ज्यांनी काव्यशारदेच्या चरणी अर्पित केली अशा कवींमध्ये कवी वा. रा. कांत यांचे नाव घेतले जाते. वा.रा. कांत एक विलक्षण प्रतिभाशाली कवी होते याचा प्रत्यय त्यांच्या काव्यात सातत्याने जाणवत राहतो. स्वतःचा मृत्यू आणि मृत्युपत्र हा कवितेचा विषय असू शकतो हे त्यांनी अत्यंत टोकदार संवेदनशील रीतीने प्रसूत केलं. एक वेगळाच विस्मयकारक अनुभव त्यांच्या 'मृत्युपत्र' कवितेत येतो.
या रचनेद्वारे आत्मसंवादी कविता लिहीत असताना कांत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कवितेतही एक हृदयस्पर्शी व्यक्तता साधतात. इस्पितळात रुग्णशय्येवर असताना कांतांनी आपल्या मुलाला ही कविता लिहायला लावली होती. ही त्यांची अखेरची कविता ठरली. मालाड येथील एव्हरशाइन नर्सिग होममध्ये रुग्णशय्येवर असताना कांतांनी त्यांच्या मुलाकडून लिहून घेतलेली ही अखेरची कविता ! या कवितेवर काही संस्कार करायचे त्यांच्याकडून राहून गेले असण्याची शक्यता आहे. परंतु अर्धागवायूच्या आजारामुळे पुढे या कवितेसंबंधी ते कोणाशीही काही बोलले नाहीत.