शनिवार, १८ जुलै, २०१५

चंद्राची कैफियत.....


तुम्हाला मामा आहे ? तुम्ही अंगाई ऐकलीय ? तुमचे बालपण पाळण्यात गेलंय? तुम्ही चांदोबा पाहिलाय ? तुमच्या घराला खिडकी आहे ? यातील एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर हे लेखन आवर्जून वाचा...
काल पहाटेच्या स्वप्नात चांदण्यांच्या गावी गेल्यावर वाटेत मला हिरमुसला चंद्र भेटला … मी विचारलं "काय झालं ?" ओलेत्या डोळ्यांनी उतरल्या चेहरयाने तो उत्तरला, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ असेल तरच बोलतो.. नाहीतर तू आपला तुझ्या वाटेने मला असेच मागे सोडून पुढे निघून जा …" मान डोलावून मी खुणावले, तसे तो रडवेल्या आवाजात बोलू लागला…
"काय सांगू तुला ? रात्र रात्र झोप येत नाही मला ! असाच जागा असतो, डोळे लावून बसतो, मान दुखायला होते. शेवटी डोळे पत्थरून जातात अन डोके बधीर होते !"
हमसून हमसून रडत चंद्र असं का सांगतोय मला काही कळत नव्हतं. तो डोळे पुसत पुसत पुढे सांगू लागला, "अलीकडे माझे फार फार वाईट दिवस आलेत रे ! माझ्याकडे बघून आता कुठली आई अंगाई गात नाही नी कुठले तान्हुले बाळ माझ्याकडे बघत बघत झोपी जात नाही…आता कुठल्या तान्हुल्याचा पाळणा कुण्या खिडकीतूनही दिसत नाही… मी तासंतास खिडकीशी तसाच उभा असतो, दारे खिडक्या सारं सारं बंद असतं.. आत तान्हुल्याचा आवाज येतो पण तोही माझ्यासाठी रुसत नाही..… "

शुक्रवार, १० जुलै, २०१५

औरंगजेब ते लियाकत अली खान .....


मुघल सम्राट शहाजहान १६५९ मध्ये आपल्या मुलाकडून औरंगजेबाकडून कैदेत बंदिस्त झाला, औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचा मुडदा पाडला आणि मुघल सम्राटाची गादी कब्जा केली. जवळपास ३०० वर्षांनी हाच इतिहास पाकिस्तानात थोड्याफार फरकाने पुन्हा घडला. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाह यांनी अट्टाहास करून अखंड भारताची फाळणी करून १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान पदरात पाडून घेतला पण ११ सप्टेबर १९४८ ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पुढे त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले...

राजर्षी शाहू - एका लोकराजाची गाथा....



शाहू महाराजांचे नाव घेतले की दुर्दैवाने आजही काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात.

तर काही लोकांना शाहूंच्या विचाराशी काही देणेघेणे नसते पण उठता बसता शाहूंचे नाव घ्यायला आवडते. तर काहींना शाहूंचे विचार केवळ आरक्षणाच्या अनुषंगाने महान वाटतात, त्या लोकांना शाहू म्हणजे केवळ आरक्षणाचे उद्गाते वाटतात. काही लोकांना शाहू फक्त आपल्या जातीच्या भूषणापायी प्रिय वाटतात ! तर काही लोकांना राजकीय सोयीपोटी शाहू जवळचे वाटतात. संपूर्ण शाहू महाराज खूप कमी लोकांच्या पचनी पडतात ! शाहूंची पूर्ण माहिती नसतानाही त्यांची भलावण करणारे आणि खाजगीत त्यांच्या नावे बोटे मोडणारे असे दोन्ही प्रकारचे लोक समाजात मोठ्या प्रमाणात आढळतात. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय मनापासून संपूर्ण शाहू ज्यांच्या मनाला पटले आहेत असे लोक मात्र खूप कमी आढळतात ! नेमके कोणते कार्य शाहू महाराजांनी केले आहे ? शाहूंचे सामाजिक योगदान काय आहे ? त्यांच्या जातीधर्मा विषयी कोणत्या भूमिका होत्या ? या सर्व बाबींचा धावता आढावा वाचायचा असेल तरच पुढे वाचा अन्यथा आपला हिरमोड होईल .......

छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - २



छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ पत्रे - (२).................
मजकूर -
सरंजामी छ २४ रबीलाखर इहिदे
सीतेन अलफ पुणे व इंदापूर व चाकण
सुपे बारामती येथे इनाम हिंदू व मुसल
मान यासी इनाम आहेत. त्यास पेशजी आपणांस
मुकासा असताना अफजल खान आधी जेणे प्रमाणे
तसलमाती ज्यास जे पावेत असेल
तेणे प्रमाणे देणे यैसा तह केला असे मोर्तब
सुद.

............मर्यादेय विराजते. (शिक्क्याची मोहोर)
.................................................................................
तजुर्मा -

उन्हाशी झुंज अजून संपली नाही ....



सुर्याच्या आगीने जीवाची काहिली होत्येय. उन्हे भल्या सकाळपासूनच वैऱ्यासारखी, उभ्या जन्माचा दावा मांडल्यागत डोक्यावर नेम धरून बसलेली ! विहिरी कोरड्या ठक्क झालेल्या. काळ्या मायेच्या सगळ्या अंगाला खोल खोल भेगा. दूरवर कुठेही हिरवाई नाही. ओसाड माळरानावरनं भकास तोंडाचा काळ डोळे खोल गेलेली माणसे चोवीस तास हुडकत फिरतो. दूर बांधाबांधापर्यंत कुठेही पाखरे नाहीत की त्यांचे आवाज नाहीत, जळून गेलेल्या झाडांच्या फांद्यावर वाळून गेलेल्या घरट्यांच्या काटक्या उरल्या आहेत, र्हुमर्हुम आवाज काढणारा वारा सगळ्या शेत शिवारातून कण्हत कण्हत फिरतो आणि पाझर तलावाच्या पायथ्याशी जाऊन डोळे पुसतो. खुराड्याच्या सांदाडीला कोंबड्यांची लोळत पडलेली मातकट पिसे उगाच अस्वस्थ करतात.

रविवार, २८ जून, २०१५

बैलाचे ऋण - श्री.दि.इनामदार



तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात,
नको करू हेटाळणी आता उतार वयात
नाही राजा ओढवत चार पाऊल नांगर, 
नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर !

माझ्या ऐन उमेदीत माझी गाईलीस ओवी, 
नको चाबकासारखी आता फटकारू शिवी
माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गूळ, 
कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ

अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ, 
मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत
मेल्यावर तुझे ठायी पुन्हा ए कदा रुजू दे, 
माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे ....

शुक्रवार, २६ जून, २०१५

चॉकलेट पुराण ...




चॉकलेट म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटायचा काळ बालपणीचाच. आता चॉकलेट ढीगभर खायला मिळतात पण त्यात ते आकर्षण नाही. मला आठवतेय लहानपणी रावळगाव चॉकलेट मिळायचे. दोन पैशात एक आणि पाच पैशाला पाच अस त्याचा भाव असे. माझ्या गणिताचे लहानपणापासून ते आजपर्यंत तीन तेरा नऊ अठरा झाले असल्याने चॉकेलटच्या भावाचे हे गणित मला कधी कळलेच नाही. पांढऱ्या प्लास्टीक वेष्टनात गुंडाळलेले अस्सल चॉकलेटी रंगाचे गोल गरगरीत अगदी मजबूत टणक असे ते चॉकलेट...तोंडात हळू हळू घुमवत घुमवत गालाच्या या पडद्यापासून ते त्या पडद्यापर्यंत जीभेशी मस्ती करत ते विरघळून आकाराने बारीक होत जायचे. दोघा तिघांनी एकदम चॉकलेट खाल्ले असेल तर तुझे आधी संपले की माझे आधी संपले हा वानगीदाखल संशोधनात्मक कार्यक्रम तोंडातले चॉकलेट तोंडाबाहेर काढून तपासणी काढून पूर्ण व्हायचा. आम्ही सिद्धेश्वर पेठेत राहत असताना तिथे रेणके राहत असत, त्यांची पोरे अगदी वस्ताद. ते कधीच चॉकलेट विरघळू देत नसत,मग त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघताना टुकटुक माकड कधी होऊन जायचे काही कळत नव्हते.

गुरुवार, १८ जून, २०१५

मराठी कवितेचे राजहंस - गोविंदाग्रज !....



'मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा
भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
जे ध्येय तुझ्या अंतरी निशाणावरी,
नाचते करीजोडी इहपर लोकांसी
व्यवहारा परमार्थासी वैभवासी वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

महाराष्ट्राचे वर्णन करणाऱ्या बऱ्याच कविता येऊन गेल्या आणि भविष्यात देखील त्या येत राहतील. आपण ज्या भूमीत जगतो, लहानाचे मोठे होतो तिचे ऋण व्यक्त होण्यासाठी आपल्या मातीवर प्रेम करणारी, तिचे गुणगान करणारी कविता लिहावी अशी भावना कविमनात उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. तदोदभवित हेतूने आजपावेतो अनेक नामवंत कवींनी मराठी माती आणि मराठी माणसांचा गौरव करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत पण कवी गोविंदाग्रजांच्या या कवितेतला जोश काही औरच आहे.

‘तरुण आहे रात्र अजुनी’ आणि सुरेश भट...



सुरेश भट व्यक्ती आणि वल्लीही या लेखात त्यांचे स्नेही डॉ. किशोर फुले यांनी अत्यंत रोमांचक आणि बहारदार आठवणींचा शेला विणला आहे. त्याचा गोषवारा देण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही. ते लिहितात की, “अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिकत असतांना सुरेश भट विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा एक दरारा होता. त्या काळात अमरावती शहरात खाजगी मथुरादास बस सर्व्हिस होती. कॉलेजची मुले-मुली या बसने जायचे-यायचे. एकदा पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात काळे ढग भरून आले होते. बसमध्ये मुली बसल्या होत्या. भटांच्या भोवती मित्रांचा घोळका. मुलींकडे पाहून मित्रांनी कवीवर्याच्या कवित्त्वालाच आव्हान दिले. 'खरा कवी असशील, तर या सिच्युएशनवर कविता करून दाखव' ! आणि -

'काळ्या, काळ्या मेघांमधुनी ऐसी चमकली बिजली,
जशी काळ्या केसांमधुनी पाठ तुझी मज गोरी दिसली !'

ही कविता अवतीर्ण झाली आणि बसमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. या मनोरंजक आणि तात्काळ सेवेसारख्या तात्काळ कविता करतांनाच -

'हरवले आयुष्य माझे राहिले हे भास
झगमगे शून्यात माझी आंधळी आरास

व्यर्थ हा रसरुपगंधाचा तुझा अभिसार
वेचूनि घे तू वार्यागवरी माझे अभागी श्वास.'

किंवा

'पाठ दाखवून अशी दुःख कधी टळते का?
अन्‌ डोळे मिटल्यावर दैव दूर पळते का?
दाण्याचे रडणे कधी या जात्याला कळते का?'

असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या दर्जेदार कवितांची आरासही ते लावीत असत. महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेली ही काव्याची आराधना त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवली. कवितेसाठी त्यांनी आपल्या जगण्याचे मोल चुकविले. विद्यार्थ्यांचा घोळका आणि सुरेश भट असे समीकरणच होते. कारण वर्गखोलीत बसणे त्यांच्या सिलॅबसमध्येच नव्हते आणि दुसरे म्हणजे कॉलेजच्या परिसरातील झाडाखाली झडणारी त्यांची इन्स्टंट कवितांची मैफिल. मराठी वाङ्‌मय मंडळाचे ते अध्यक्ष होते. वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमात त्यांचे सवाल जवाब चालायचे.

बुधवार, १७ जून, २०१५

नको नको रे पावसा - इंदिरा संत..



नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन..