Tuesday, February 9, 2016

कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना - निदा फाजली ...प्रत्येक कवी वा शायर एखादया घटनेनंतर साहित्यनिर्मिती करतो. त्याच्या आयुष्यात एक वळण असे येते की तो आपल्या मनातले मळभ लेखणीतून रितं करतो. २००२ मध्ये आलेल्या लकी अलीच्या 'सूर' मधले 'कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चाँद खिले तो दिल में आ जाना...' या आर्त गीताला एक दुःखद इतिहास आहे. काही गहिरे संदर्भ यामागे आहेत. हे गाणं लिहिलंय विख्यात शायर निदा फाजली यांनी. या गाण्याच्या पार्श्वभूमीसाठी आपल्याला त्यांच्या भूतकाळात जावं लागेल.हळव्या कवीमनाचे निदा एके काळी स्वप्नाळू युवक होते. ग्वाल्हेरमधील व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निदांचे तारुण्यसुलभ भावनानुसार एका सहाध्यायी मुलीवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्याच वर्गात पुढच्या बाकावर बसणाऱ्या त्या देखण्या मुलीकडे पाहिले की त्यांच्या काळजातून अनामिक लहरी दौडत. आपल्यात आणि तिच्यात काही तरी खास नातं आहे याची त्यांना जाणीव झाली होती. तिचं दर्शन झालं नाही की निदा बेचैन होऊन जायचे.

तिच्यासाठी ताठकळत उभे राहणे हा त्यांचा छंदच झाला होता. आपल्या मनातले भाव तिला सांगितले नाहीत तर आपण उभयतांची फसवणूक करत आहोत हे त्यांच्या ध्यानी आले. तिला भेटून सारं काही सांगायचं त्यांनी ठरवलं. १९५७ - ५८ चा सुमार असेल. रोजच्याप्रमाणे आपल्या प्रियेच्या भेटीसाठी आतुर होऊन निदा मस्तपैकी आवरून सावरून महाविद्यालयात गेले आणि तिथल्या प्रवेशद्वारापाशी लागलेल्या नोटीसबोर्डवरील सूचनेने त्यांचे हृदय विदीर्ण झाले. निदांचे ज्या मुलीवर प्रेम होते, तिचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यावर लिहिलेली होती. सूचना वाचून निदांच्या हातापायातली ताकद गळाली. डोकं गरगरायला लागलं. 'असं होऊच कसं शकतं हा प्रश्न त्यांना छळू लागला. ती आपल्याला कसे काय सोडून जाऊ शकते तेही एक शब्द ही न बोलता ! या खुदा हा किती घोर अन्याय केलास !'निदांच्या मनावर या घटनेचा जबरदस्त आघात झाला. ते या घटनेला आणि त्या मुलीला कधीच विसरू शकले नाहीत....

निदांचे माता पिता फाळणीपूर्व काळात भारतात होते पण स्वातंत्र्योत्तर काळात देशात वारंवार हिंदू मुस्लीम दंगे होऊ लागल्यावर ते पाकिस्तानात वास्तव्यास गेले होते. पण तरुण निदा इथेच राहिले. त्या मुलीच्या आठवणींनी आणि मायभूमीच्या ओढीने त्यांना इथेच रोखले. १२ ऑक्टोबर १९३८ ला त्यांचा जन्म दिल्लीत झाला होता. पिता मुर्तुजा हसन यांचे पूर्वज काश्मिरी होते, चरितार्थासाठी ते ग्वाल्हेरला स्थायिक झाले होते. आई मां जमील फ़ातिमा दिल्लीच्या होत्या. निदा या जोडप्याचे तिसरे अपत्य होते. त्यांचे वडील स्वतःच एक चांगले शायर होते. त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मोठ्या मुलाच्या नावाच्या काफियाशी मिळते जुळते असे 'मुक्तदा हसन' हे नाव ठेवले होते. निदांचे बालपण ग्वाल्हेरला गेले आणि तिथेच १९५८ ला मुक्तदांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. मुक्तदांचे ज्या मुलीवर प्रेम होते ती मुलगी अकाली गेली आणि आईवडील पाकिस्तानला गेले. मग त्यांनी ग्वाल्हेरच सोडले. आईवडील परत यावेत म्हणून नात्यातील मुलीशी निकाह केला पण ते काही भारतात परतले नाहीत. पण मुक्तदांचे आयुष्य विस्कळीत झाले. पत्नीचा स्वभाव मिळता जुळता नसल्याने, विचार पटत नसल्याने आणि ज्या उद्देशासाठी लग्न केले होते तो उद्देशही सफल न झाल्याने त्यांनी पत्नीशी तलाक घेतला. ते एकटे राहू लागले. पोटापाण्याच्या सोयीसाठी भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली. या दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली.

एका सकाळी ते मंदिराजवळून जाताना सूरदासांच्या भजनाच्या काही पंक्ती त्यांच्या कानावर पडल्या."मधुबन तुम क्यौं रहत हरे? बिरह बियोग स्याम सुंदर के ठाढ़े क्यौं न जरे?......" या भजनात भगवान श्रीकृष्ण दवारकेतून निघून गेल्यानंतर त्यांच्या वियोगात बुडून गेलेल्या राधा आणि गोपिकांच्या विलापांचे प्रश्न आहेत." हे पुष्पवेलींनो तुम्ही अजून ताज्यातवान्या कशा आहात ? कृष्णाच्या वियोगात तुम्ही कोमेजून कशा गेल्या नाहीत ?" या पंक्ती ऐकून त्यातील अर्थ जाणून घेतल्यावर मुक्तदांना वाटले की त्यांच्या आतला अश्रुंचा सागर बांध तोडून आता लवकरच बाहेर पडणार आहे. त्या दिवसानंतर मुक्तदांनी कबीरदास, तुलसीदास आणि बाबा फ़रीद इत्यादी संतांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. या संतांचे साहित्य वाचून त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी अगदी साध्या सुलभ आणि प्रवाही शैलीत लिहिण्याची कला आत्मसात केली.इथून मुक्तदांनी जे लिखाण सुरु केले ते एका महान शायराला जन्म देणारे ठरले. त्यांनी स्वतःचे निदा फाजली नाव ठेवले. निदा म्हणजे आवाज ! आपल्या अंतरात्म्याचा आवाज त्यांना आता व्यक्त करायचा होता. आपल्या पूर्वजांच्या काश्मीरमधील फाजिला ह्या इलाख्यावरून त्यांनी फाजली हे नामाभिधान निदाच्या साथीला जोडले. आपल्या मातीचा आवाज त्यांनी स्वतःशी असा काही जोडला की त्यांचे नाव अजरामर झाले.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांचा नोकरीचा शोध आणि भाकरीचा संघर्ष सुरु झाला. १९६४ मध्ये ते मुंबईला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांत लिहायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांना लौकिकदेखील या लेखनातूनच मिळाला. १९६९ मधे त्यांचा 'लफ़्ज़ों के फूल' हा पहिला उर्दू काव्य संग्रह प्रकाशित झाला. त्या काळात चित्रपट निर्माते दिग्दर्शक कमाल अमरोही 'रझिया सुलतान' हा सिनेमा बनवत होते. या चित्रपटातील गाण्यांची जबाबदारी त्यांनी जांनिसार अख्तर यांच्यावर सोपविली होती. त्यांचे काम अर्धवट झालेले असतानाच एके दिवशी त्यांचे अकस्मात निधन झाले. शायर कवी जांनिसार अख्तर हे देखील ग्वाल्हेरचेच होते आणि त्यांना निदाच्या लेखणीतली ताकद चांगलीच ज्ञात होती व एकदा बोलता बोलता त्यांनी कमाल अमरोही यांच्यापाशी निदा फाजली यांच्या लेखणीबद्दल सांगितले देखील होते. त्यामुळे जांनिसार अख्तर यांच्या मृत्यूनंतर अमरोहींनी निदा फाजलींना निरोप पाठवला. कमाल अमरोहींनी रझिया सुलतानची राहिलेली दोन गाणी लिहिण्याची विनंती निदा फाजली यांना केली आणि त्यांनी हसतमुखाने आपल्या मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती जबाबदारी स्वीकारली असे नव्हे तर यथार्थपणे पारही पाडली. यातून त्यांना चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले. त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यातून पुढे बॉलीवूडचा त्यांच्याशी संपर्क आला आणि एक रोमांचक सफर त्यांनी सुरु केली. फिल्मी गाण्याव्यतिरिक्त त्यांनी आपली शेरो शायरी सुरुच ठेवली त्यात खंड पडू दिला नाही. पुढे त्यांचे आणखी काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आणि ते हिंदी उर्दूतले एक विख्यात शायर म्हणून नावारूपास आले... या दरम्यान त्यांच्यावर आणखी एक मोठा आघात झाला.

पाकिस्तानात राहणारे त्यांचे वडील मुर्तूजा हसन यांचे दिर्घ आजारानंतर निधन झाले. ते आपल्या पित्याच्या अंत्येष्टीत सामील झाले नाहीत.आपल्या पित्याचं जनाजाला त्यांनी खांदा दिला नाही.लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण त्यांच्या भावना त्यांनी कागदावर उतरवल्या तेंव्हा लोकांचे डोळे पाणावले. पित्याच्या मृत्यूनंतर त्यांनी एक नज्म लिहिली. आपलं काळीजच जणू कागदावर उतरवलं...निदांची ही शायरी वाचली तरी आपल्या डोळ्यात अश्रूंची गर्दी होते. आपल्या वडिलांवर सच्चे प्रेम करणाऱ्या एका सच्च्या मुलाची ही आर्त कविता आहे ज्यात त्यांनी आपल्या निरागस प्रेम भावनाना करुणेच्या रसात चिंब भिजवले आहे...
तुम्हारी कब्र पर मैं फ़ातेहा पढ़ने नही आया,
मुझे मालूम था,
तुम मर नही सकते
तुम्हारी मौत की सच्ची खबर
जिसने उड़ाई थी, वो झूठा था,
वो तुम कब थे?
कोई सूखा हुआ पत्ता, हवा मे गिर के टूटा था ।
मेरी आँखे
तुम्हारी मंज़रो मे कैद है अब तक
मैं जो भी देखता हूँ, सोचता हूँ
वो, वही है
जो तुम्हारी नेक-नामी और बद-नामी की दुनिया थी ।
कहीं कुछ भी नहीं बदला,
तुम्हारे हाथ मेरी उंगलियों में सांस लेते हैं,
मैं लिखने के लिये जब भी कागज कलम उठाता हूं,
तुम्हे बैठा हुआ मैं अपनी कुर्सी में पाता हूं |
बदन में मेरे जितना भी लहू है,
वो तुम्हारी लगजिशों नाकामियों के साथ बहता है,
मेरी आवाज में छुपकर तुम्हारा जेहन रहता है,
मेरी बीमारियों में तुम मेरी लाचारियों में तुम |
तुम्हारी कब्र पर जिसने तुम्हारा नाम लिखा है,
वो झूठा है, वो झूठा है, वो झूठा है,
तुम्हारी कब्र में मैं दफन तुम मुझमें जिन्दा हो,
कभी फुरसत मिले तो फ़ातेहा पढनें चले आना |

शेवटच्या पंक्तीत त्यांनी खरोखर आपले श्वास आपल्या लेखणीतून उतरवले आहेत.
मी तुमच्या कबरीवर (सद्गतीची) प्रार्थना म्हणायला आलो नाही,
मला माहिती होते
तुम्ही मृत होऊ शकत नाही.
तुमच्या मृत्यूची खरी बातमी
ज्यांनी पसरवली होती, तो (खचितच) खोटा असणार,
ते तुम्ही कधी होतात ?
कुठलं तरी पिकलं पान, हवेने गळून पडले असणार !
माझे नयन
अजूनही तुमच्या नजरेत कैद आहेत
मी जे काही मंथन करतो, बघतो
ते, तेच आहे
जे तुमचे कीर्ती आणि अपकीर्तीचे विश्व बनून राहिले आहे.
काहीच बदललेले नाही,
तुमचे हात माझ्या बोटांमध्ये श्वास घेताहेत,
लिहिण्यासाठी मी जेंव्हाही कागज कलम हाती घेतो
तेंव्हा (मला) समोरच्या खुर्चीत तुम्ही बसलेले दिसता !
देहात माझ्या जितकेही रक्त आहे
ते तुमच्याच गतीतनं कमतरतेसह (अपयशाला न भीता त्याच्यासह) वाहत असते.
माझ्या आवाजा आडून तुमचेच विचार येतात,
माझ्या आजारातही तुम्हीच अन माझ्या लाचारीतही तुम्हीच (आहात) l
या कबरीवर तुमचे नाव ज्याने कुणी कोरले आहे
तो खोटा आहे, तो खोटा आहे, तो खोटा आहे,
तुमच्या कबरीत मी दफन आहे आणि माझ्यात तुम्ही जिवंत आहात,
(तुम्हाला) कधी फुरसत मिळाली तर (माझ्या कबरीवर तुम्ही) प्रार्थना म्हणायला या !

वडीलांच्या मृत्यूनंतर आणखी एक नाट्यमय घटना निदांच्या आयुष्यात घडली. निदा पन्नाशीच्या वयात एकटयाचे आयुष्य जगत होते तेंव्हाची ही घटना. एकदा निदा गंभीर आजारी पडले होते, त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्यांच्या आजारपणाची बातमी त्यांच्या चाहत्यांना बेचैन करून गेली. याच चाहत्यात एक नाव होतं राजकोटच्या सह्वीस वर्षे वयाच्या मालती जोशींचे ! ह्या देखील पेशाने गायिका होत्या. त्या एका कार्यक्रमानिमित्त मुंबईला आल्या होत्या आणि त्यांना निदांच्या आजारपणाबद्दल कळले. त्या अस्वस्थ झाल्या आणि निदांना भेटायला गेल्या. या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि पुढे जाऊन नात्यात झाले. त्यांनी लग्न केले. निदांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मालती जोशी त्यांच्या सावलीसारख्या सोबत होत्या. त्यांना एक मुलगीही झाली. निदांनी तिचं देखणं नाव ठेवलं, 'तहरीर' ! म्हणजे लेखनशैली, लेहजा ! आपल्या अधुऱ्या प्रेमाची लिखावट त्यांना आपल्या मुलीत दिसली. त्या आठवणींच्या खपल्या पुन्हा पुन्हा निघत राहिल्या !

२००१ चे साल असेल. प्रीतीश नंदी, पूजा भट्ट आणि तनुजा चंद्रांना तेलुगु सुपरहिट 'स्वाती किरणम' वर बेतलेला हिंदी सिनेमा बनवायचा होता. एका हळव्या मनाच्या संगीत शिक्षकाच्या आयुष्यावरचा हा चित्रपट होता. त्यामुळे गाणी आणि संगीत ह्यातच सिनेमाचा प्राण होता. प्रीतिशजींना यासाठी निदांचे नाव अधिक योग्य वाटले. त्यांनी निदांना गाणी देण्याची विनंती केली. काही तासात त्यांनी आठ गाणी लिहून दिली. तनुजा चंद्रा अवाक झाल्या कारण प्रत्येक गाणं अप्रतिम होतं. निदांनी आपल्या हृदयातील सारं तुफान ह्या गाण्यात रितं केलं होतं. चित्रपट तिकीट बारीवर सणकून आपटला पण गाणी सुपरहिट झाली. 'कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चाँद खिले तो दिल में आ जाना.... मगर आना इस तरह तुम कि यहाँ से फिर ना जाना..." असं निदा कुणाला आणि का म्हणत आहेत याचा अर्थ ध्यानी आला की आपल्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.

८ फेब्रुवारी २०१६ ला निदांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( रज़िया सुल्ताना) हे त्यांचे पहिले चित्रपट गीत होते. त्यांची आणखी काही गाणी गाजली ..
आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर रज़िया सुल्ताना)
होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (सरफ़रोश)
कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता (आहिस्ता-आहिस्ता)
तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है (आप तो ऐसे ना थे)
चुप तुम रहो, चुप हम रहें (फ़िल्म इस रात की सुबह नहीं)
चाहत न होती, कुछ भी न होता( चाहत)
अजनबी कौन हो तुम, जबसे तुम्हें देखा है(स्वीकार किया मैने)
आज कल मेरी होंठों पर हँसी है आज कल (तमन्ना)
दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (ग़ज़ल)
हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (ग़ज़ल)
अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (ग़ज़ल) ..
या सर्व गाण्यात मला आवडणारे हेमलता आणि रफी यांच्या आवाजातले 'तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है..' हे गाणं सामील असल्याने निदांच्या जाण्याने मी खूप हळवा झालो होतो.

माझ्या आयुष्यातील काही अवीट गोडीच्या आठवणींना शब्दांचा गहिरा उजाळा देणाऱ्या निदांची गाणी गुणगुणली तरी आठवणींच्या तारा छेडल्या जातात. 

निदांजी 'आप तो ऐसे ना थे', के बेवक्त चल दिये...
आप हमेशा याद आते रहेंगे..

- समीर गायकवाड .

('सूर' बद्दल स्वतंत्र लिहावं लागेल इतकं कंटेंट त्याच्याशी निगडीत आहे. राकेश रोशन ते मेहमूद आणि लकी अली ते पूजा भट्ट असे अनेक पदर त्यात सामील आहेत..)