शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण...




अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी 'आपण अध्यक्ष झालो तर इस्त्राईलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू' असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांना तेंव्हा ट्रम्प निवडून येतीलच याची हमी नव्हती त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासनांकडे कानाडोळा केला गेला. निवडून येताच इस्लामी राष्ट्रातील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध लादले होते. मुस्लिमांना कट्टरतावादी वा फंडामेंटालिस्ट म्हणून सातत्याने टोमणे मारणारे आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणारे ट्रम्प हे  खरे तर केवळ उजव्या विचारसरणीचेच नसून पक्के मुस्लीमद्वेष्टेही आहेत हे आता यथावकाश स्पष्ट होतेय. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर 'अमेरिका फर्स्ट' अशी साखरपेरणी करताना त्यांनी नाझीझमच नव्या रुपात अंगीकारला होता. याची अगदी ताजी उदाहरणे ब्रिटीश पीएम थेरेसा मे यांच्याशी झडलेले ट्विटरवॉर आणि दुसरे म्हणजे जेरुसलेममधे दूतावासाच्या स्थलांतराची घोषणा.

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

राणी पद्मावती, इव्हांका ट्रम्प आणि निर्भया...


मागच्या आठवड्यात आपल्या देशात तीन घटना घडल्या ज्यांचे परिघ भिन्न होते पण त्यांची त्रिज्या स्त्रियांशी संबंधित होती. स्त्री विषयक तीन भिन्न जाणिवांची प्रचीती या घटनांनी दिली. आपल्या देशातील जनतेचा आणि राजकारण्यांचा स्त्रीविषयक संकुचित दृष्टीकोन यातून उघडा पडला. आपल्या इतिहासात डोकावून पाहताना एकेकाळच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे दाखले नेहमी दिले जातात. मातृसत्ताक कुटुंब पद्धती प्राचीन काळी भारतात सर्वत्रच अस्तित्वात होती का यावर देखील मतभेद आहेत. पण सिंधू संस्कृती आणि द्रविड संस्कृतीत देखील याच्या पाऊलखुणा आढळतात. आजघडीला ही पद्धत जवळपास नामशेष झालीय अन कधी काळी कुटुंबप्रमुख असणारी स्त्री आता भोगदासी अन वस्तूविशेष होऊन राहिली आहे. नाही म्हणायला ईशान्येकडील राज्यांपैकी मेघालयातील गारो या मुळच्या इंडोतिबेट आणि खासी या माओ- ख्येर लोकांच्या वंशज असलेल्या आदिवासी जातीतच ही मातृसत्ताक पद्धती अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे जे आदिम काळापासून निसर्गाचा पोत जपत आलेत, ज्यांनी अजूनही माणुसकी निभावताना डिजिटल युगाला आपलेसे केले नाही त्यांनी मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची कास सोडलेली नाही अन जे महासत्ता व्हायची स्वप्ने पाहतात, टेक्नोसेव्ही जगाचे जे पाईक होऊ इच्छितात त्यांनी मात्र स्त्रीला मातृसत्ताक पद्धतीतील शीर्ष स्थानावरून खाली खेचून थेट पायाखाली रगडायचेच बाकी ठेवले आहे. असो.

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - 'आज्जी' आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स !



अलीकडील काळात आपल्याकडील चित्रपटांत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होते आहे. हिंदी चित्रपटात कथेची मराठी पार्श्वभूमीही वापरली जातेय. ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असणारा देवाशीष मखीजा दिग्दर्शित 'अज्जी' (मराठीतलं आजी / आज्जी) हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चित्रपटाची कथा एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे. या बलात्कार पीडित मुलीला कुणी न्याय देऊ शकत नाही आणि ती विवशतेच्या गर्तेत खोल बुडू लागते तेंव्हा अखेरचा न्याय देण्यासाठी तिची आज्जी पुढे सरसावते. ती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आरोपीचा सूड उगवते असे या चित्रपटात दाखवले गेलेय. आपल्या आई बाबा व आज्जीसोबत राहणारी दहा वर्षाची मंदा एक निरागस गरीब मुलगी. या आज्जी आणि नातीचा एकमेकीवर प्रचंड जीव असतो. मंदाची आज्जी शिवणकाम करते. तर पुष्कळदा मंदा तिच्यासाठी ब्लाऊज पोहचविण्याचे काम करत असते.

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

सौदी अरेबियातील बदलाचे मतितार्थ ...


सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व तिथले सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारियाचा कायदा चालतो. सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत. सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. सध्या हा देश चर्चेत आहे त्याचे कारण म्हणजे तिथल्या राजवटीने स्वीकारलेले परिवर्तनाचे वारे ! मागील तीन दशकात जगभरात इस्लामी मुलतत्व वादयांना छुपे पाठबळ देणारा हा देश एके काळी मागील दाराने केल्या जाणाऱ्या टेरर फंडींगसाठी ओळखला जायचा. पेट्रोडॉलरची भाषा बोलणारा हा देश आपल्या राजेशाहीच्या छानछौकीसाठी आणि अमर्याद ऐश्वर्यासाठी जितका ज्ञात होता तितकाच कर्मठ इस्लामी कायद्यांच्या, रिवाजांच्या अंमलबजावणीसाठीही परिचित होता. ओसामाबिन लादेन पासून ते आयसीसपर्यंतच्या कट्टरतावादयांचे अप्रत्यक्ष पालकत्व सौदीच्या पेट्रोडॉलरमध्ये होतं. पण सौदी राजवटीने कधीही खुले समर्थन देऊन आपल्या अंगावर राळ उडवून घेतली नाही. सौदीविरुद्ध जगभरातील बलाढय देशांनीही कधी कठोर शब्दांत निर्भत्सना केली नाही कारण तिथल्या तेलसाठ्यांचे आमिष आणि तेलाची निकड ! मात्र या देशात आता बदलाचे वारे वाहू लागलेत ज्याचे अनेक मतितार्थ आहेत.

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

दुसरा प्रवास ....



रेल्वे स्टेशन असो बस स्थानक वा अन्य कुठले सार्वजनिक गर्दीचे स्थान असो...
अशी मलूल, ओशाळवाणी, करपलेली अनाथ मुले आपल्याला हटकून दिसतात..
त्यांना पाहून आपण काय विचार करतो ? ...आपली संवेदनशीलता तेंव्हा नेमका काय प्रतिसाद देते ? हा प्रश्न अनाठायी आहे कारण त्यांचा आपल्याशी थेट संबंध काहीच नसतो. आपण त्यांच्या जगात नसतो आणि ते आपल्या जगात नसतात.

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - अकराव्या लेनमधली सावित्री ..



अकराव्या लेनमधली सावित्री मेली
तिच्या तिरडीचे सामान आले आणि
जगाने रांडा ठरवलेल्या तिच्या सगळ्या पोरीबाळींनी एकच गलका केला.
बांबूंचे तुकडे बांधून त्यावर कडब्याचे पाचट अंथरले गेले.
सावित्रीची अखेरची अंघोळ सुरु झाली,
पारोशा अंगाने विटाळल्या हाताने तिच्यावर पाणी ओतले जात होते.
पाण्यासोबत बायकांचे अश्रू मिसळत होते.

सगळ्या खिडक्या दारं, सगळे सज्जे, सगळ्या आडोशात
जिकडं पाहावं तिकडं पाणावल्या डोळयाच्या धुरकट बायका उभ्या होत्या.

सावित्रीचे डोळे स्वच्छ चोळले गेले, तिच्या स्वप्नांना धक्का न लावता.
सावित्रीच्या डोळ्यात मासे राहत असावेत असे वाटे,
इतके ते मासुळी पाणीदार होते.

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

अजून याद येते गावाची - एक आठवण नामदेव ढसाळांची .....



दिवस असे अधून-मधून मला शहरातून गावाकडे घेऊन जातात. आता तिथं सावलीचा विटाळ धरत नाहीत, आता महारवाडय़ाचं रुपांतर राजवाडय़ात झालं आहे. सुगीसराई-अलुत्याबलुत्याचे मोसम संपले आहेत. मर्तिकाच्या चिठ्ठय़ा पोहोचवणं, फाटय़ा फोडणं, महसुलाचा भरणा करणं, वीर नाचवणं, शिमग्याची सोंगं घेणं, महाराच्या होळीच्या विस्तवानं गावाची होळी पेटवणं.. आता सर्वच गेलं आहे बदलून. गाववस्ती, नदी-नाले पूर्वीचे राहिले नाहीत गावात गेलो की, महाराचं पोर आलं, असं आता म्हणत नाहीत. गाव किती बदलतं? पण बदलत नाहीत आठवणी….

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - रेड लाईट एरियातील नोटाबंदीची वर्षपूर्ती....


८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी झाली आणि देशभरात हल्लकल्लोळ झाला. अनेक क्षेत्रात याचे बरेवाईट परिणाम झाले. तीनेक दिवसापूर्वी या घटनेला वर्ष पूर्ण झाले आणि कोणकोणत्या क्षेत्रात कसे साधक बाधक फरक पडले याचे आढावे अनेकांनी आपआपल्या परीने मांडले. समान्य लोकांनीही आपली मते मांडली. त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनीही आपले ठोकताळे सादर केले. सरकारच्या वतीनेही विविध खात्याच्या मंत्र्यांनी सरकारची तळी उचलली जी एक साहजिक बाब होती. केंद्रातील उच्चपदस्थ लोकांनीही काही विधाने केली.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उत्तरप्रदेशातील निरंकुश सत्तेचे बेलगाम वारू...


उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन अत्यंत छोट्या घटनांचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीस करावासा वाटतो. पहिली घटना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच भ्रष्टाचार किती शिगेला पोहोचला असल्याचे दाखवून देणारी आहे. काही दिवसापूर्वीच गोरखपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलीय. खजनी भागातील धाधूपार येथे पाण्याच्या टाकीचे काम नव्याने करण्यात आले होते. या टाकीत पहिल्यांदाच पाणी भरायला सुरुवात केल्यानंतर टाकी फुटली अन् एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी टाकी फुटल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. सुमारे दीड कोटी रुपये या टाकीसाठी खर्च करण्यात आले होते. काही दिवसात धूम धडाक्यात ज्या टाकीचे उद्घाटन केलं जाणार होतं त्या टाकीचे हे सर्व पैसे अक्षरश: पाण्यात गेले. गोरखपूर हा मतदारसंघ योगींचाच असूनही प्रसारमाध्यमे चाटूगिरीत मग्न असल्याने याचा फारसा गवगवा झाला नाही.

अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...


लग्नाआधी नोकरी करणाऱ्या स्त्रिया लग्न झाले की थोड्याशा धास्तावतात. मातृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात आणखी घालमेल सुरु होते. तर प्रसूतीपश्चात येणाऱ्या कोंडमारयाच्या दिवसात तिला नोकरीविषयक निर्णय घेणं खूप कठीण वाटू लागतं. नोकरी करावी की नोकरी सोडून दयावी ह्या विचारांच्या चक्रात त्या पुरत्या गुरफटल्या जातात. काही स्त्रिया हल्ली सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गरोदरपणातील हक्काची रजा वापरून वेळ मारून नेतात पण पुढे काय करायचे याचे नेमके उत्तर त्यांच्याकडेही नसते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते तिथे कर्त्या पुरुषासोबत घरातील स्त्रीला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नसते. तिथे स्त्रियांकडे कुठलाच पर्याय उरत नाही. तर कधी विपरीत परिस्थिती असते. काही स्त्रियांना विश्रांती हवी असते, सध्याची नोकरी सोडून संसाराकडे लक्ष दयावे असा त्यांच्या अंतरात्म्याचा सूर असतो. पण त्या हुंकाराला त्या आतच दाबतात. तर काही स्त्रिया अशाही असतात की ज्यांना लग्नाआधीही नोकरी करण्याची इच्छा असते मात्र माहेरच्या प्रतिगामी लोकांनी काहीशी आडकाठी केलेली असते त्यामुळे त्या माहेरी असताना नोकरी करू शकत नाहीत.