शुक्रवार, १९ मे, २०१७

अंघोळाख्यान ...



बाळ जन्मल्यानंतर त्याला अंघोळ घालून स्वच्छ केले जाते आणि मग आईकडे त्याला सुपूर्द केले जाते. तेच मूल मोठे होते. बाल्य, कुमार, तारुण्य, प्रौढ अवस्थेनंतर वृद्धावस्था पार केल्यानंतर एका दुर्दैवी दिवशी त्याचा मृत्यू होतो आणि त्याचे अंतिम संस्कार करण्याआधी त्याला अंघोळ घातली जाते. व्यक्ती कोणत्याही जातधर्माचा असो त्याच्या आयुष्यात आरंभ, अंताच्या या बाबी घडतातच. एक जितेपणी तर एक मृत्यूनंतर ! अशा रीतीने आपल्या जीवनाचा अंघोळीशी अत्यंत जवळचा संबंध येतो ! अंघोळ ही कोणत्याही व्यक्तीच्या दिनक्रमात नित्यनेमाचे स्थान असणारी बाब आहे. तरीही काही आळसप्रेमींना अंघोळ नकोशी वाटते. 'अंघोळीची एखादी गोळी असती तर किती बरे झाले असते' अशी हुरहूर त्यांना वाटते. पण अशी सोय अजून तरी झालेली नाही त्यामुळे जन्मल्यावर सुरु होणारी अंघोळ श्वास थांबल्यावरही एकदा 'अंगावर' येतेच, मग कुठे त्यातून सुटका होते.

बुधवार, १० मे, २०१७

गर्भसंवेदना- काजल अहमद : कुर्दिश / इराकी कविता


तिच्या मैत्रिणींप्रमाणे
आपल्या कटीभाराचं ती आणखी कौतुक आता करू शकत नाही.
तिचे नितंब आता हलत नाहीत की सैलही नाहीत.
ती आता धाडसही करत नाही,
उंच पाळण्यात बसण्याचे आणि सुलेमानियाच्या नौकेत बसण्याचे.
तिचा वाङ्निश्चय होण्याआधी मात्र ती हे करायची.

मंगळवार, ९ मे, २०१७

पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....


१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.

महेश भट्टच्या प्रेमात देहभान हरपलेली परवीन एकदा सुरा हातात घेऊन त्याच्या घरात घुसली होती आणि महेशनी अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर हात जोडल्यानंतर तिने तिथून पाऊल काढते घेतले होते. (हाच प्रसंग त्यांनी 'अर्थ'मध्ये दाखवला होता). या नंतर बरेच दिवस महेशभट्ट परवीन बाबीकडे फिरकले नाहीत. तिनं मात्र पिच्छा पुरवला. शेवटी काही दिवस तिच्यापासून स्वतःला चुकवत फिरणाऱ्या महेश भट्टनी तिचं घर गाठलं तर त्यांना दारात उभं पाहून तिला हर्षवायुच व्हायचा राहिला होता. महेश आत आल्यावर तिनं भाबडेपणाने सगळी दारं खिडक्या लावून घर बंदिस्त करून घेतलं. जणू आता महेश तिच्या घरात कायमचे कैद झाले असा तिचा होरा असावा. पण पुढे जाऊन नियतीने तिची क्रूर चेष्टा केली हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. असो.... ही घटना महेश भट्ट यांच्या मनावर खोल कोरली गेली अन तिचे पडद्यावरील प्रकटीकरण म्हणजे 'जख्म'मधलं हे गाणं...

सोमवार, १ मे, २०१७

महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाच्या लाह्या बत्तासे ...


थोड्या लाह्या थोडे बत्तासे...
आज एकाच दिवशी दोन ‘दिन’आल्याने शुभेच्छोत्सुकांची चंगळ आहे.. किती शुभेच्छा देऊ आणि किती नको असे काहीसे झाले असेल नाही का ?..असो...
महाराष्ट्राच्या विभाजनाची स्वप्ने पाहणाऱ्या, त्याची शकले करू इच्छीणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र दिनाचे गोडवे गावेत हे म्हणजे कसायाने गाईची महती सांगण्यासारखे आहे....
एकीकडे मंगल देशा, राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा आणि कुठल्या कुठल्या देशा म्हणून तुताऱ्या फुकत राहायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र विभाजनाचे 'रेशीम' विणत राहायचे हा दुट्टपीपणा आहे.

रविवार, ३० एप्रिल, २०१७

रेड लाईट डायरीज - एक रात्र 'दिवाली नाईट'ची.....


आमचं सोलापूर शहर कर्नाटक आणि आंध्रच्या सीमेवर आहे. या दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील नजीकच्या शहरात आणि उस्मानाबाद, कोल्हापूर, नगर या सीमासलग जिल्ह्यातील ज्या भागात बांधकामे चालू आहेत तिथे सर्वत्र बिहारी मजूर मोठ्या प्रमाणावर आहेत. यांचे ह्युमन एस्कॉर्ट ठेकेदार असतात, वर्षाकाठी दर दिवाळीला या लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून छुप्या पद्धतीने भोजपुरी गायिका, नर्तिका (छे छे, डान्सबार बंद झाल्यामुळे कुठेही नाचायला तयार असणाऱ्या मुलीच ह्या) आणि डीजे सहित आधुनिक वाद्यांनी सुसज्ज ऑर्केस्ट्रा आणून एकच कल्ला केला जातो. या मुली प्रोव्हाईड करणारी एक चेन असते. त्यातल्याच एकाने माहितीपूर्वक आवतन दिल्याने आणि मी ज्या वसंतविहार भागात राहतो तिथेही बांधकामांना ऊत आलेला असल्याने, तिथल्या एका बिहारी ठेकेदाराच्या आग्रहाने दिवाळीच्या रात्री एका सीमावर्ती डीप इंटेरियरच्या मात्र हायवेलगतच्या भागात झालेल्या अशाच एका बेभान मैफीलीत सामील झालो. दिवाळीचा हा अनुभव व्यक्तीसापेक्ष भिन्न जाणिवा देणारा होता. काहींनी याचा आनंद लुटला काहींनी ऐश केली तर काहींचे शोषण झाले तर माझ्यासारखा भणंग गोठून गेला. त्या रात्रीची ही चित्तरकथा.

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

अनुवादित कविता - ए. के. रामानुजन ; तमिळ कविता

बांगडया...

सख्यांनो तो ज्या समुद्रात जातो, तो गगनभेदी रोरावतो, प्रलयंकारी फुगतो.
शंख शिंपल्यांना उधळतच किनाऱ्यावर आणतो, कधी त्यात आवाज शिटीचा घुमवतो.
पण माझा नावाडी त्याच्या लाकडी होडक्यातून पुढेच जात राहतो. लाटांच्या थंड फटक्यांना वल्ह्यांचे गतिमान संगीत देतो.

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

कसदार 'जयवंत' साहित्यिक .....


कोकणच्या लाल मातीला आपल्या दर्जेदार साहित्यातून उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख सांगता येतील, ते म्हणजे जयवंत दळवी. जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

'लिओ टॉलस्टॉय' - कादंबरीकार ते तत्ववेत्ता .... पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध



काही काळापूर्वी अभिनेता रजनीकांतचा एक किस्सा वाचनात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले ! असाच किस्सा लिओ टॉलस्टॉय यांच्याबाबतीत पूर्वी घडलाय. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असते त्यामुळे अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच उमगत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय गोंधळला. पण पुढच्याच क्षणी त्यानं ते सगळं सामान उतरवलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना ! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्यावर बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर उभ्या असलेल्या सार्वकालीन महान कादंबरीकाराने आपलं सामानही उतरवून दिलं या कृतीनं बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनंच त्यांचे आभार मानले, ते तिने दिलेल्या कामाबद्दल. हमालाला देय असलेली रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

कल्पवृक्ष ....



बघता बघता पावसाच्या बातम्या हळूहळू कमी झाल्यात, कवींच्या कविता करून झाल्यात... आणि बघता बघता पाऊस थबकलाय देखील... इकडे काळ्या मातीने सगळे पाणी अधाशासारखे गटागटा पिल्येय... काही ठिकाणी कोवळे हिरवे कोंब आलेत तर मातीच्या सांदीत दडून बसलेल्या चुकार बीजाला कुठे तरी अंकुर देखील आलेत.. वाळून काडी कामटी झालेल्या खोडाला पालवी देखील फुटलीय... पण हे सारं कुठं होतंय ? .. हे सारं लगोलग फक्त काळ्या मातीतच होतंय... मात्र बरड रानात, मुरमाड जमिनीत हे इतकं सहजासहजी होत नाहीय....

'सिंहासन' - त्रिकालाबाधित राजकारणाचा मानबिंदू..

सिंहासन .. 

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेलं दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मुटकुळे करून बसलाय.
काही वेळापूर्वी त्याला दस्तुरखुद्द 'सीएम'चा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्याच फोनच्या विचारात आहे.
इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडिओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण मोलकरीण छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी!
तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो.

ती आत येते. रेडिओवर मंद स्वरात गाणे सुरु असतं - 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं, हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं, अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… '
दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो.
बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते.
दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे.
त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची रिंग वाजते.
पलीकडून संवाद सुरु होतो -
"श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं? काय म्हणत होते श्रीमंत?"
दिगू उत्तरतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचं विचारत होते…"
पलीकडून प्रतिप्रश्न येतो "पण असं झालं काय अचानक. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?"
बोलत बोलत आलखनपालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोऱ्या असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मीपणे हसत उत्तरतो,
"काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........