मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

संयुक्त महाराष्ट्र आणि शाहीर अमरशेख .....


दिल्लीतल्या रस्त्यांवरचा मराठी माणसाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा होता अन त्यात अग्रभागी असलेल्या एका ट्रकच्या हौदयात उभे राहून एक शाहीर माईकचा वापर न करता गळ्याच्या शिरा ताणून सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सलग सहा तास एका हाताने डफ वाजवत आपल्या खडया पहाडी आवाजात पोवाडे गात होता आणि हे अद्भुत दृश्य बघून हैराण झालेले दिल्लीकर तोंडात बोटे घालून त्या शाहीराकडे अचंबित नजरेने बघत होते !
चार वाजता मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. या सभेत बोलताना आचार्य अत्रे त्या शाहीराचे कौतुक करताना सदगदित होऊन बोलले -
"शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं...."
ती सभा होती संयुक्त महाराष्ट्रासाठीची !
अन 'दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है' असं ठणकावून सांगणारे ते महान शाहीर होते - 'शाहीर अमर शेख' !
या अमरशेखांच्या कर्तुत्वाचा आणि जीवनाचा हा धांडोळा ....

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

माणसातला 'देव' ...

 
वाढत्या वयाबरोबर काळ माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची नक्षी काढायला स्रुरुवात करतो तेंव्हा त्याच्या मनातला भक्ती भाव अधिक तीव्र होतो. पैलतीरीचा तट जेंव्हा खुणवू लागतो तंव्हा देव -देवत्व याविषयी अधिक ओढ लागते. अंगावरची कातडी जसजशी ढिली होत जाते तसतशी ती अधिक नरम पडत जाते अन मनातला ताठा देखील तोवर गळून पडलेला असतो, उरलेली असते ती काळजी, भीती अन त्यातून जन्मलेली श्रद्धा. काळजी राहिलेल्या आयुष्याची असते तर भीती मरणाची असते अन श्रद्धा देवावरची ! काहींची श्रद्धा पूर्वापार असते तर काहींची समयोचित असते तर काहींची गरजेतून उत्पन्न झालेली असते मात्र क्वचित काही लोकांचीच श्रद्धा अंतःकरणातून पाझरलेली असते. पण बहुतांश करून वयपरत्वे अशी श्रद्धा दाटून आलेलेच जास्ती असतात.
श्रद्धा जेव्हढी उत्कट आणि प्रामाणिक असते तितकी काळजी आपसूक कमी होते अन काळजी कमी झाली की मरणाची भीतीही कमी होते म्हणून उतारवयात माणसे परमार्थाकडे सहजच झुकतात. 'शेवटचा दिस सुखाचा व्हावा' हा स्वार्थही त्यात असतो. आयुष्यभर केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनी ज्याची त्याची श्रद्धेची शिदोरी तयार होते, कधी आयुष्यात आई वडीलांची सेवा केलेली नसेल अन त्यांच्या पश्चात कोणी काशीत उंबरठे झिझवत असेल तर त्याला आईबापही कळले नाहीत अन देव तर नाहीच नाही.

बुधवार, २० एप्रिल, २०१६

काव्यमय पितापुत्र - 'राना'-माधव !


एखादया प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा बहुतांश करून डॉक्टरच होतो तर राजकारणी माणसांची मुले सर्रास राजकारणी होतात. त्याच चालीवर मोठया वकिलांची अपत्ये वकिली करताना आढळतात तर बिल्डरची मुले वडिलांचा कित्ता गिरवतात. कलाक्षेत्रात ही बाब सिनेमा वा नाट्य क्षेत्रात कमीअधिक लागू होते, तिथे मातापिता जे कुणी सिनेमा नाटकाच्या क्षेत्रात असतात त्यांचा सहज पाठिंबा मिळतो. त्यांचे वलय, त्यांची साधने यांचा फायदा होतो अन पुढच्या पिढीला पाय रोवणे तिथं सोपे जाते. मात्र पुढच्या पिढीचे नाणे खोटे असेल तर मात्र ते आपोआपच मागे पडते. इतर कलाक्षेत्रात मात्र असे घडताना दिसून येत नाही. चित्रकाराचं अपत्य चित्रकारच होईल किंवा शिल्पकाराचं अपत्य पत्थराला आकार देईल असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशीच अवस्था क्रिडाक्षेत्रातही पाहायला मिळते. असंच काहीसं साहित्यिकाचं असतं. उत्तम साहित्यिकाचं अपत्य देखील प्रतिभावंत साहित्यिकच झाल्याचं अपवाद वगळता दृष्टीस पडत नाही. मराठी साहित्यात अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत जिथे मायबापापैकी कुणीतरी साहित्यिक आहे अन त्यांची दुसरी पिढी देखील साहित्यात रममाण झाली आहे. अशा दुर्मिळ साहित्यिक पितापुत्रात सोलापूरचे ज्येष्ठ कवीश्रेष्ठ रा.ना.पवार व त्यांचे प्रतिभावंत कवी पुत्र माधव पवार यांची नोंद होते. गिरणगांव म्हणून परिचित असणाऱ्या व कलाक्षेत्रात काहीसं बकालपण असणाऱ्या सोलापूरसारख्या शहरास या पवार पितापुत्रांच्या लेखनाने एक नवी ओळख प्राप्त करून दिली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

'बाप'कवी - इंद्रजित भालेराव



इंद्रजित भालेराव हे अस्सल काळ्या मातीचे कवी महाराष्ट्राला कसे गवसले त्याची कथा मोठी सुरस आहे. १९८५ च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं एक नवलेखक शिबीर कोल्हापूरच्या पन्हाळगडावर सुरू होतं. त्यात भालेराव शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते. कवितांचं सादरीकरण सुरू होतं. भालेरावांची पाळी आली. त्यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेत नवशिक्षित शेतकरी दाम्पत्याचं वर्णन होतं. नवविवाहित कुळंबीण आपल्या काबाडाच्या धन्याला सांजच्या पहारी लवकर घरी येण्याचं निमंत्रण कसं देते, हा प्रसंग भालेराव कवितेतून मांडत होते.

रविवार, १० एप्रिल, २०१६

'पंत गेले, राव चढले' आणि नाट्यछटाकार 'दिवाकर' - एक आकलन...



नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. हा साहित्यप्रकार मराठीत दिवाकरांनी ईतका समर्थपणे हाताळलाय त्याला तोड नाही. 'पंत मेले, राव चढले' ही दिवाकरांची एक प्रसिद्ध नाट्यछटा आहे.

शनिवार, २ एप्रिल, २०१६

रणरागिणी ताराराणी ...


दख्खन जिंकायचीच ह्या मनसुब्याने औरंगजेबाने जेंव्हा दिल्ली सोडली तेंव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला, कळसूबाईच्या शिखरावर रोमांच उठले. मावळच्या खोऱ्यात वारा बेभान होऊन वेड लागल्यागत हसत सुटला. संतांच्या ओव्या थरारून गेल्या. काहीशी मरगळून गेलेली सृष्टी टक्क सावध होऊन बघत राहिली. गडकोटांना स्फुरण चढले. कडयाकपारया उल्हासित झाल्या, नदीनाल्यांना भरून आले. तिन्ही ऋतूंना गहिवर दाटून आला. काळवंडलेल्या आभाळात पिसाळलेले ढग जमा झाले, सौदामिनींचा चित्कार सुरु झाला अन काळाला उधाण आले ! कारण सावज आपण होऊन मृत्युच्या दाढेत जणू चालतच आले ! काळाहून क्रूर असणाऱ्या औरंगजेबाने आधी कपटाने शंभूराजांचा काटा काढला त्याला वाटले मरगट्टे संपले. पण तिथूनच एका विलक्षण चमत्कारक अध्यायास सुरुवात झाली. भद्रकाली रणरागिणी ताराराणी कोपली आणि तिने औरंग्यास पुरते नेस्तनाबूत केले. त्याला इथल्याच मातीत चिरनिद्रा घ्यावी लागली. पण त्या नंतर जे काही घडले त्यामुळे मराठी मातीस भाऊबंदकीचे रक्तरंजित इतिहास घडताना मूक रुदन करण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते. त्या इतिहासाची ही पोस्ट .....

बुधवार, ३० मार्च, २०१६

फोटोची गोष्ट - तपकीरवाली मावशी .....



काही क्षणच असे असतात की एका झटक्यात काही वर्षे मागे घेऊन जातात, तसाच हा क्षण होता...."विटून गेलेल्या हिरव्या रंगाचे काठापदराचे नऊ वारी लुगडं अन रुपेरी बुट्टीची इरकली खणाची चोळी अशा टिपिकल गावाकडच्या वेशातल्या आजींना पाहून मी एका झटक्यात अनेक वर्षे मागे गेलो. खिळे ठोकलेल्या ढवळपुरी जाड चपला त्यांच्या पायात होत्या. नक्षीचे छर्रे उडालेल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या दुई हातात भरलेल्या होत्या, माळकरयांचे भूषण असणारी तुळशीची माळ अन एक काळ्या मण्यांची सर गळ्यात होती. कपाळावर बारीक तुळशीचे पान गोंदवलेलं होते....."

सोमवार, २८ मार्च, २०१६

सर्वसामान्याचा अनोखा ताजमहाल !



महाल,राजवाडे,प्रतिके,स्मारके काय राजे लोकांनीच बांधावीत का ? सामान्य माणसाचे प्रेम हे बादशहाच्या प्रेमाइतके उत्तुंग प्रेम नसते का ? साध्या भोळ्या सर्वसामान्य माणसालाही प्रेमाचे प्रतिक निर्माण करावे वाटले तर त्याने काय करावे ? राजा महाराजांनी आपल्या प्रेमाच्या खातीर उंचे राजवाडे, महाल उभे केले म्हणून त्यांचे प्रेम श्रेष्ठ अन म्हणूनच इतरांचे प्रेम कदाचित तितके श्रेष्ठ ठरवले जात नाही असे का ? राजा महाराजांकडे तितकी संपत्ती, तितके मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, सामान्य माणसाचे तसे नसते. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या प्रेमाचे तसेच उत्तुंग प्रतिक उभारावे वाटले तर त्याकडे जग कुतूहलाने पाहते. आपल्या पत्नीवर असीम प्रेम करणारी काही आगळी वेगळी माणसे अशीच झपाटून जातात अन काही तरी वेगळे करून दाखवतात. ही माणसे इतरांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनतात.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

गोष्टीवेल्हाळाची बाराखडी - साहित्यिक वर्कशॉप !



एखादं गाणं विविध गायकांनी कसं गायलं असतं याचं सादरीकरण आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. मात्र एक समान रचना विविध लेखकांनी कशी सादर केली असती याची अनुभूती आपल्याला क्वचित लाभते. त्यादृष्टीने हा खटाटोप.
इथे एका वाक्यात एक घटना नमूद केलीय. या एकपंक्तीय घटनेची मांडणी विविध साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या नि कल्पनाविलासाच्या आधारे कशी केली असती याचे हे प्रकटन.
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." – हे ते वाक्य !

व्यंकटेश माडगूळकर –
ती वैशाखातली रणरणती दुपार होती. गावाबाहेरल्या माळावरच्या जुन्या वडाखाली उभ्या असलेल्या कौमुदीचे चित्त कशातच लागत होते. वारं पिऊन तर्राट झालेलं ते झाड कोष्ट्याच्या माळावरून पालथ्या घागरीसारखं दिसायचे. आजूबाजूला भरड मुरमाची जमीन अन डाव्या अंगाला असणाऱ्या पाझर तलावावरून येणारी गार हवा यामुळे त्या डेरेदार सावलीच्या झाडाखाली कुणीही आलं की त्याला पेंगुळल्यागत व्हायचे. आसपासच्या माळावर गुरं चरायला आणणारे गुराखी दुपारची भाकरी खायला तिथंच यायचे पण आज गावात जत्रा असल्याने कुणी तिथं येणार नाही याची खात्री असल्याने कौमुदी तिथं बिनघोर थांबली होती. दुपारची गरम हवा सरत आली तरी सुजित अजून आला नव्हता त्यामुळे तिला जरा चिंता वाटत होती. दावणीचा दोर ओढून रोजच्या सवयीने तिथं आलेली एक अवचिंदी जाफराबादी म्हैस अन तिच्या मागोमाग शेपूट हलवत आलेले मरतुकडे काळे कुत्रे वगळता भवताली कुणीच नव्हते. मधूनच आभाळात उडणारा भोरडयांचा थवा अन वाऱ्यावर डुलणारी गवताची पाती इतकीच काय ती हालचाल होत होती. दिस जाता जात नव्हता अन डोईवरची उजेडाची उतळी घेऊन सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला. बाभळीच्या बांधावरून दिसणारा काळा ठिपका मोठा होत गेला, तिचं लक्ष तिकडंच होतं. तो सुजितच होता !

मंगळवार, २२ मार्च, २०१६

पाऊलवाट…



पाऊलवाट हे वाटसरूच्या मनावर होणारे एक गारुड असते, वाटसरूनी तयार केलेले ते जादुई रस्ते असतात. कधीतरी कुणीतरी उजाड माळरानातून पायी जाताना या वाटा तयार होतात.कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. आधी गेलेला खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेला असतो. त्याच्या पावलाच्या ठसे मागून येणारयाला दिशा दाखवतात. अन अनेक माणसे त्या वाटेने जाऊ लागतात, अन तयार होते पाऊलवाट.वाटेने लागणारे काटे-कुटे जाणारा प्रत्येक माणूस काढून बाजूला टाकून देतो, काटाडयांनी भरलेले वाळके फांद्यांचे तुकडे देखील आधी जाणारे मागून येणारयासाठी बाजूला सरकवत जातात. पाऊलवाटेत अडथळे काहीही असोत ते बाजूला केलेले असतात, एखादी भली मोठी शिळ आडवी आली तर तिला वळसा घालून ही वाट पुढे सरकते. डोंगराच्या अल्याड पल्याड नाचत नाचत जाते,खोल दरीत निसरडी होऊन हळूवार उतरते पण चालणारयाला हाताचा आधार मिळेल याची तजवीज करते. झरे,ओहोळ,ओढे,नाले याना पार करून मागे पुढे जाते. शेताच्या रस्त्याने कधी नागमोडी होते तर कधी सरळसोट असते. पाऊलवाटेवर कधी कुठले दिशादर्शक फलक नसतात, पण आधी जाणारयाने मागच्यासाठी एक विश्वास तयार केलेला असतो त्याच्या आधारावर मागचा त्याच वाटेने पुढे जातो......