
'टायटन द ओशियनगेट सबमरीन डिझास्टर' ही 2025 मध्ये रिलीज झालेली 'नेटफ्लिक्स'वरील डॉक्युमेंटरी आहे, जी 18 जून 2023 रोजी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या ओशियनगेट कंपनीच्या टायटन सबमर्सिबलच्या अंतर्गत स्फोटाने झालेल्या दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवते. ही दुर्घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती, कारण यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मार्क मुनरो यांनी केले आहे आणि ती या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा, तांत्रिक त्रुटींचा आणि मानवी चुका यांचा सखोल अभ्यास करते.
ही सबमर्सिबल ओशियनगेट एक्सपिडिशन्स या कंपनीने बनवली होती, जी श्रीमंत पर्यटकांना टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती अडीच लाख डॉलर्सचे शुल्क आकारत होती. जगभराचा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असणाऱ्या महाकाय टायटॅनिक बोटीचा अपघात सर्वश्रुत आहेच, समुद्रात चिरनिद्रा घेत असलेल्या टायटॅनिक बोटीचे अवशेष उत्तर अटलांटिक महासागरात सुमारे 3,800 मीटर खोलवर आहेत. टायटॅनिकवर आजवर सिनेमे, माहितीपट निघाले नि त्यावर आजतागायत अनेकदा लिहिलेही गेलेय; त्यामुळे टायटॅनिक हा अनेकांच्या जिज्ञासेचा विषय बनून राहिला आहे. अनेकांना वाटते की हे अवशेष पाहून यावेत, त्यात देखील एक थ्रिल आहे अशी अनेकांची धारणा आहे. त्यातूनच या अवशेषांना भेट देण्याची संकल्पना जन्मास आली. या संकल्पनेला मूर्त स्वरूप ओशियनगेटने दिले. त्यांनी समुद्रतळाशी जाईल अशी पाणबुडीच्या बेसवर बनवलेली सबमर्सिबल बनवली. तिचे नाव टायटन! जून 2023 मध्ये अंतर्गत स्फोटाने तिचा विनाश झाला आणि त्यात स्वार असलेले ओशियनगेटचे सीइओ व पायलट असणारे स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश आणि साहसाची आवड असणारे हॅमिश हार्डिंग, पाकिस्तानी उद्योगपती शाहझादा दाऊद, शाहझादा यांचा एकोणीस वर्षांचा मुलगा सुलेमान दाऊद टायटॅनिक तज्ज्ञ आणि फ्रेंच सागरी संशोधक पॉल-हेंरी नार्जोलेट या सर्वांचा मृत्यू झाला.ही सबमर्सिबल खोल समुद्रात बुडत असताना सुमारे 1 तास 45 मिनिटांनी संपर्क तुटला आणि नंतर ती अंतर्गत स्फोटामुळे नष्ट झाल्याचे सिद्ध झाले. या घटनेने जगभरात मोठी खळबळ उडवली, कारण यामुळे सागरी पर्यटन आणि सुरक्षिततेच्या नियमांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.