घरोघरच्या अंगणातली सकाळची कळा अजून पुरती सरली नव्हती तोवरच गुबुगुबूचा आवाज करत नंदीबैलवाला दाखल झाला. भाऊसाहेब गोंडे त्याचं नाव. गल्लीच्या तोंडावरच असणाऱ्या रुख्माआत्याच्या दारापुढं येताच थरथरल्या आवाजात बोलला,
"दुसऱ्याचं घर भरवणाऱ्या बाप्पा तुझं घर उसवू नको, आत्महत्या करू नकोस !"भाऊसाहेब असं का म्हणतोस रे बाबा म्हणून खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला की, “गावात शिरताच पोलीस पाटलाचं घर गाठलं, आमी आल्याची अन शंभूचा खेळ करणार आसल्याची वर्दी त्यास्नी दिली. नावपत्ता, निशाणी लिहून झाल्यावं परवांगी गाव्हली. तिथून पारापाशी येण्याधी पैल्या गल्लीला लक्षिमण रावताचं घर लागतं. तिथं ढोलकी घुमवली, शंभूच्या पायातली घुंगरं थिरकली. वाड्याचं दार कराकरा वाजवत उघडलं आणि आतून बोडख्या कपाळाची सारजाकाकू सूप हातात घेऊन आल्या. त्यास्नी तसं बगुन काळीज करपलं. बाई ईधवा झाली म्हंजीच लई वंगाळ झालं असं न्हवं. पर ज्या हातानं सोनं पिकवलं, जगाला घास भरवला त्याच हातानं फास लावून घ्यायचा. घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्बती करायचं म्हंजे वाईच इस्कोट... बंद्या रुपयागत कुक्कु कपाळाला लावणारी घरची लक्षुमी अशी कपाळावर बुक्का लावून बघितली की पोटात कालिवतं. तिच्या कपाळावरलं काळं ठिक्कर पडलेलं गोंदण बगवत न्हाई. तिच्या हातनं पसाभर जुंधळा सुपातून घ्यायचा म्हंजे झोळीदिकून म्होरं करूशी वाटत न्हाई. सारजाकाकूच्या मोत्याच्या दाण्यांना न्हाई म्हणता आलं नाई. तवा जाऊन रुख्माआत्याच्या दाराम्होरं आल्यावर त्यास्नी भायेर यायच्या आदी आमीच बोल लावलं. आमचं चुकलं का बापू ? तुमीच काय ते सांगा ! आमी पडलो अनपड अडाणी. .. “
भाऊसाहेबाने माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं. मी कसला बोलणार ! माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील तर तोच होता.