मंगळवार, २५ जून, २०१९

झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी


काळ मोठा महान असतो तो सर्वांना पुरून उरतो. तो कोणाला कसा सामोरा येईल हे कुणी सांगू शकत नाही. आपल्या कर्मानुरूप त्याचं प्रत्यंतर येत राहतं. आपण जे पेरतो तेच उगवत जातं हे सूत्र सर्वंकष लागू पडतं आणि ते ही सर्व बाबतीत ! अगदी सोशल मीडियावरच्या ट्रोलराक्षसाच्या बाबतीतही ! मुद्दा ट्रोलचा आहे म्हटल्यावर कालपरवा घडलेली एक महत्वाची घटना चक्षुसमोर येणं साहजिक आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भाजपच्या रणरागिणी असंही म्हटलं जातं. विरोधी पक्षाचा हल्ला आक्रमकपणे परतावून लावण्यात त्यांचं विशेष कसब आहे. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रीय असतात. अनेक नेत्यांसोबत झडलेली ट्विटरवॉर्स विशेष स्मरणीय आहेत. फाडून काढणे किंवा धूळ चाटायला लावणे यासाठी त्यांची खासियत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टच्या वा प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ आयटी सेलची भली मोठी फौज काम करत असते. आयटीसेलचे नेटकरी म्हटले की त्यात ट्रोल आलेच. ट्रोल म्हटलं की जे जे वाईट आणि अश्लाघ्य आहे ते ते सर्व आलेच. पण 'छु' म्हणून दुसऱ्याच्या अंगावर सोडलेलं श्वान कधी कधी आपल्याही अंगावर येऊ शकतं. याचं प्रत्यंतर बऱ्याच जणांना येऊ लागलंय, राहिलेल्या उत्साही आणि उतलेल्या नेटकऱ्यांनाही येईलच. कारण ती निसर्ग नियमानुसारची बात आहे.

सोमवार, १७ जून, २०१९

दहावी निकाल : ‘सर्वाना शिक्षणा’चे अपयश



या आठवड्यातील एक महत्वाची घटना म्हणजे दहावीचे निकाल होय. आपल्या कालविसंगत शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत दहावी व बारावी इयत्तांच्या परीक्षांचे अवाजवी स्तोम माजवले गेलेय, त्यांची मांडणी व मुल्यांकन दोन्हीही गचाळ पद्धतीने होतेय. दहावीच्या परीक्षेत साठोत्तर काळात फर्स्ट क्लास मिळाला तरी विद्यार्थी हुशार समजला जायचा. ऐंशीच्या दशकानंतर या गृहितकावर बोळा फिरवत मुलांची टक्केवारी ऐंशी ते नव्वदच्या घरात पोहोचली तेंव्हा मुलं हुशार म्हणून ओळखली जाऊ लागली. यावर कडी करत २००८ मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने एक आमुलाग्र बदल घडवत नवं धोरण आणलं. त्याची फलश्रुती त्याच वर्षी समोर आली.

रविवार, १६ जून, २०१९

मोळीवाला - एक आठवण वडीलांची...



'फादर्स डे'निमित्त सकाळी सोशल मीडियावर माझ्या वडीलांचा फोटो पोस्ट करताना विख्यात शायर, कवी निदा फाजली यांच्या 'मैं तुम्हारे कब्र पर फातेहा पढने नही आता' या कवितेचा अनुवाद दिला होता. त्या पोस्टवर व्यक्त होण्याऐवजी इनबॉक्समध्ये येऊन एका ज्येष्ठ स्नेहींनी वडीलांची विचारपूस केली, त्यांची माहिती ऐकून ते चकित झाले. त्या अनुषंगाने पोस्टमध्ये आणखी थोडं तरी वडीलांबद्दल लिहायला हवं होतं असं मत त्यांनी नोंदवलं. आईबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो, वडीलांबद्दल लिहिताना, बोलताना आपण नेहमीच हात आखडता घेतो हे सत्य स्वीकारत वडीलांची एक आठवण इथे लिहावीशी वाटतेय.

गुरुवार, १३ जून, २०१९

रेड लाईट डायरीज - दाखले


धगधगत्या दुपारच्या असह्य उकाडयातच,
मी तान्हुल्याच्या वाटयाला येते.
कवटाळताच उराशी गच्च त्याला,
रंडक्या भिंतींतले आभाळ गदगदून येते.

सोमवार, १० जून, २०१९

विद्रोही परखड लेखनाचे दीपस्तंभ - गिरीश कार्नाड


आपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का ?
नाही ना ?
पण एक माणूस होता असा.
त्याची ही दास्तान.
गिरीश कार्नाड  त्याचं नाव.

गुरुवार, ६ जून, २०१९

ग्रामीण मतदाराचा बदलता कौल -



सतराव्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागून आता दहाएक दिवस झालेत. निकालातले औत्सुक्य संपलेय. अनेक राजकीय अभ्यासकांद्वारे, विचारवंतांद्वारे आपआपल्या परीने या निकालाचे अन्वयार्थ लावून झालेत. काही ठिकाणी ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचे, पराभवाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केलीय, विजेत्यांनी विजयोत्सव साजरे करण्यास सुरुवात केलीय तर पराभूतांनी जमेल तितकं आणि झेपेल तितकं आत्मचिंतन सुरु केलंय. विविध माध्यमं आपआपल्या कुवतीनुसार या निकालांचे मतितार्थ शोधत आहेत, आपले अंदाज चुकुनही आपणच किती नेमकं भाष्य केलंय हे सांगण्याची अहमहमिका सुरु झालीय. तसं पाहता अगदी मोजक्या लोकांचे अंदाज बरोबर आलेत, अन्य सर्वांचे अंदाज चुकलेतच. अंदाज चुकण्यास अनेक घटक कारणीभूत होते. सरकारबद्दलचा कथित असंतोष, कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या लोकांची संख्या, विविध धोरणात झालेली फसगत आणि त्यातून झालेली जनतेची फरफट, जातीय धार्मिक ध्रुवीकरणावरची नाराजी, शेतकरी वर्गाबद्दलची अनास्था, वर्तमानाचे काटे मागे फिरवून देशाला मध्ययुगाकडे नेण्यासाठी सुरु असलेली सनातनी कसरत आणि कट्टरतावाद्यांचा वाढता प्रभाव इत्यादी घटक आणि त्याविषयी सोशल मीडियात सुरु असलेली चर्चा यामुळे अनेकांचे अंदाज चुकण्यास मदतच झाली. विशेष बाब म्हणजे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येण्याआधीपासूनच्या काळात सोशल मीडियावर पूर्णतः काँग्रेसविरोधी वातावरण होते पण मागच्या तीन वर्षात मोदीविरोधी लेखनास सोशल मीडियात बऱ्यापैकी धार चढली होती. विशेषतः मागच्या वर्षात याचं प्रमाण जाणवण्याइतकं होतं. याचा प्रभाव अंदाज वर्तवण्यात झालेल्या चुकात दिसून येतो. पण ढोबळ मानाने हे सर्व घटक शहरी, निमशहरी, नागर भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील कक्षेशी निगडीत होते, ग्रामीण भागाचं प्रतिबिंब यात नव्हतं, किंबहुना ग्रामीण जीवनाचा या घडामोडीशी फारसा संबंध नव्हता. उलट गावजीवनाशी संलग्न असलेल्या प्रश्नांवर अनेकांची नाराजी स्पष्ट दिसत होती तरीदेखील ग्रामीण भागातही निवडणुक निकालांचे तेच चित्र दिसले जे शहरी भागातल्या मतदानातून समोर आले होते. असं का घडलं असावं याची अनेक कारणे असतील. देशभरातील विविध राज्यात याची कारणे थोडीफार वेगळी असतील, पण त्यांचा पिंड एकच असणार. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास निवडणुकीआधी दोन महिनाभरच्या काळात राज्याच्या विविध ग्रामीण भागात फिरता आलं,लोकांशी मनमोकळं बोलता आलं, त्यांच्या मनात डोकावता आलं त्यातून काही गोष्टी जाणवल्या त्या काँग्रेसला उभारी घेण्यास अडवून गेल्या हे नक्की. त्याचा हा गोषवारा.

शनिवार, १ जून, २०१९

महात्मा गांधींनी हिटलरला लिहिलेलं पत्र..

जितिश कल्लाट या भारतीय कलाकाराने निर्मिलेले बापूंनी हिटलरला पाठवलेल्या पत्राचे डिजिटल कव्हरींग लेटर 

सोशल मीडियावरती अनेक लोक गरळ ओकत असतात. अश्लील, अर्वाच्च शिवीगाळ करत असतात. राजकीय पोस्टवर याचा सुकाळ असतो. विशेषतः असे लोक ज्यांचे समर्थन करत असतात त्यांचे नेतेही अशीच भाषा वापरत असतात, एनकेन मार्गाने हनन सुरु असते ज्याच्या पातळीस आता कुठलाही स्तर उरलेला नाही.
आपण म्हणतो, जाऊ द्या ! कशाला शहाणपण शिकवायचे ? घाणीत दगड टाकला की काही शिंतोडे आपल्याच अंगावर उडतील !
ही माणसं बदलणार नाहीत तेंव्हा आपली डोकेफोड का करावी या विचाराने आपण मुकाट बसून राहतो.
आपल्या डोळ्यादेखत सभ्यतेचं वस्त्रहरण सुरु असते आणि आपण आपल्याशी घेणंदेणं नाही या वृत्तीने मूक राहतो.

तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे ?
असाच प्रश्न गांधीजींना पडला होता.