शनिवार, १७ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - बायकांचे एस्कॉर्ट असेही ....



आपल्याकडे बायका पोरींना ‘धंद्याला’ लावणे वा त्यांची खरेदी विक्री करणे किती सहज सोपे आहे याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आपले कायदे किती कुचकामी आहेत आणि जी काही कलमं आहेत ती किती तकलादू आहेत हे यातून प्रकर्षाने ध्यानात यावे.

२००३ सालच्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (अवैध मानवी तस्करी) एका खटल्यात पतियाळा येथील एका न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवले. पोलिसांच्या कर्तव्य तत्पर शिताफीने आणि न्यायालयातील वकिलांच्या न्यायिक दलालीने आय मीन दलीलांनी हा खटला १५ वर्षे रखडवला गेला आणि शिक्षा झाली फक्त दोन वर्षे !

निकाल देऊन शिक्षा ठोठावल्यानंतर पुढची ड्रामेबाजी अधिक भारी होती. निकालानंतर अवघ्या २० मिनिटांत त्याला जामीन मंजूर झाला. दलेरचा भाऊ शमशेरसिंह देखील दोषी ठरला. कोर्टाने दोघांना दोषी ठरवल्यानंतर पोलिसांनी त्यांना 'नाममात्र' ताब्यात घेतले होते, जामीन देताच त्यांना सोडून दिले !

दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेरवर आरोप होता की त्यांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये असल्याचे सांगून बेकायदेशीररित्या विदेशात घेऊन गेले होते. यासाठी ते मोठी रक्कम घेत होते. हे प्रकरण १९९८ ते २००३ दरम्यानचे आहे. दलेरचा भाऊ शमशेर मेहंदी याच्याविरोधात सप्टेंबर २००३ मध्ये एफआयआर दाखल झाला होता. शमशेर हा दलेरचा मोठा भाऊ आहे. पोलिस चौकशीत दलेर मेहंदीचे नाव समोर आले. त्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यातील आरोपानुसार दलेर मेहंदी आणि त्याच्या भावाने ११९८ आणि १९९९ दरम्यान अमेरिकेत दोन शो केले होते. ते जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांच्या टीमचे दहा सदस्य अमेरिकेतच राहिले होते. त्यानंतर एकदा एका अभिनेत्रीसोबत अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या दलेरने तीन मुलींना सॅन फ्रांन्सिस्को येथे सोडले होते. ऑक्टोबर १९९९ मध्ये दोघे भाऊ काही कलाकारांसोबत अमेरिकेला गेले होते, तेव्हाही त्यांनी तीन मुलांना न्यूजर्सीला सोडले होते.

ही आकडेवारी त्यांच्यावर शाबित झालेल्या आणि उघडकीस आलेल्या प्रकरणातील आहे. अशी कितीतरी प्रकरणे देश परदेशात घडत असतात. त्यात अशीच चाल ढकल सुरु असते. सोडून दिलेल्या लोकांचे काय झाले किंवा खरीदफरोख्त कशी केली जाते आणि त्या आपल्या मर्जीने पळून जातात का किंवा त्यांच्यावर बळजोरी केली जाते का या मुद्द्यांशी कुणालाही काही घेणे देणे नसते. त्यामुळे अशा खटल्यांना वेगाने पुढे रेटावे यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. ढिम्म बसून मख्खपणे मूक दर्शक बनून राहणारी न्याय यंत्रणा यासाठी इतकी उदासीन आहे की तिलाही याचा निपटारा वेगाने व्हावा असे वाटत नाही. लाखो केसेस जिथे वर्षानुवर्षे पडून आहेत तिथे अशा बेवारस शोषितांच्या केसेस म्हणजे नुसता कागदी कचरा ! मग कधी तरी निकाल लावला जातो आणि तातडीने जामीन देण्याची दक्षता बाळगली जाते.

दलेर मेहंदीच्या केसमधील सर्वात कळस म्हणजे या प्रकरणातील मुलींची दलाली करणारा पेशेवर दलाल बुलबुल मेहता याला न्यायालयाने पुराव्याच्या अभावी सोडून दिले गेले ! विविध राजकीय पक्षांची सलगी असणाऱ्या एका प्रसिद्ध पॉप सिंगर पेक्षा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या दलालांची लॉबी कधीही श्रेष्ठ आणि वजनदार आहे. दलालांची एक चेन भारतभर काम करते. आपल्या महाराष्ट्रात टॉपच्या दलाल म्हणून बायकांकडेच निर्देश करावा लागेल अशी परिस्थिती आहे. विषय निघाला आहे म्हणून कल्याणी देशपांडेचा उल्लेख करावा वाटतो. या बाईला इतक्या वेळा अटक झाली आणि इतक्या वेळा सोडले गेले की ही आत आहे की बाहेर आहे हे कळत नाही. विशेष बाब म्हणजे काही व्यवहार हिने ‘आत’ असताना केले होते. ह्युमन ट्रॅफिकिंगवर लगाम कसण्यासाठी पोलिसांची विशेष विंग असते, त्यातल्या बदल्या आणि बढत्या होण्यासाठी वेश्यांचा पैसा कसा वापरला जातो याच्या कहाण्या मोठ्या सुरस आहेत.

दलेर मेहंदी मोठा माणूस होता म्हणून जामीन मिळाला असे कुणाला वाटत असेल तर ते निखालस खोटं आहे. अशा घटना नित्य नेमाने घडत असतात. समाजाला याकडे बघण्याची काडीमात्र गरज वाटत नाही आणि यात कसलाही टीआरपी नसल्याने मिडीया देखील याकडे लक्ष देत नाही. वानगीदाखल एक उदाहरण आपल्या पुण्यातले. वेश्याव्यवसायासाठी परिचीत असलेल्या बुधवार पेठेतील बारा कुंटणखाने पुणे पोलिस आयुक्तालयाने जुलै २०१७ मध्ये सील केले होते. यामध्ये सूस-पाषाण येथील एका सदनिकेचा समावेश होता. अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियमच्या तरतुदीनुसार हे कुंटणखाने सीलबंद करण्यात आले होते. यातील दोन कुंटणखाने तीन वर्षासाठी तर उर्वरीत एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले होते. तडफदार पोलिस आयुक्त रश्मीत शुक्ला यांनी मागील वर्षभरात २० कुंटणखाने सीलबंद करण्याची धडाकेबाज कारवाई केली होती.

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवारपेठ वेश्याव्यवसायासाठी प्रसिध्द आहे. येथे सज्ञान मुलींबरोरच अनेकदा अल्पवयीन मुलींकडूनही वेश्या् व्यवसाय करुन घेतला जातो. यासाठी अल्पवयीन मुलींना इतर राज्यातून तसेच बांग्लादेश व नेपाळसारख्या देशातून नोकरीच्या आमिषाने फसवून आणले जाते. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्यावतीने वेळोवेळी छापे टाकून अल्पवयीन मुलींची वेश्याश व्यवसायातून सुटका केली जाते. याप्रकरणी पिटा ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र छापे टाकून कारवाई केल्यानंतरही पुन्हा येथे वेश्यायव्यवसाय सुरु होत असतो. ही बाब लक्षात घेऊन फरासखाना व चतुश्रृंगी पोलिस ठाण्याकडून कुंटणखाने सील करण्याचा प्रस्ताव तेंव्हा पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी व अतिरिक्त दंडाधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली. तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम मधील कलमाच्या प्रयोजनासाठी अति जिल्हादंडाधिकारी यांचे अधिकार देखील प्रदान केले गेले. या अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी धडाडीने हे कुंटणखाने सीलबंद केले. यामुळे अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात चाप बसेल असे वाटत होते. पण यात पकडल्या गेलेल्या कुंटणखाना चालवणाऱ्या बहुतांश बायका न्यायालयीन प्रक्रियेत सुटल्या आणि त्यांनी पहिले पाढे पंचावन्न सुरु केलेत. पोलिसांनी सील केलेल्या कुंटणखान्यामध्ये अवैध वेश्यायव्यवसाय चालवल्या प्रकरणी मोकामध्ये अटक असलेली आरोपी जयश्री उर्फ कल्याणी देशपांडे हिचा चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फ्लॅट एक वर्षाकरीता सील करण्यात आला होता आता तिच्या त्या धंद्याचे स्थलांतर कुठे झाले आहे याची यंत्रणेला माहिती नसावी.

या मोहिमेत पकडल्या गेलेल्या आरोपींची नावे आणि त्यांच्या कुंटणखाना सीलबंदीचा कालावधी असा होता - मिता नमाय मंडोल नया सपना विल्डींग, बुधवार पेठ एक वर्ष ; प्रिती सुनबहादुर तमांग माचिस बिल्डींग, बुधवार पेठ एक वर्ष ; राणी नूर शेख सपना बिल्डींग, बुधवार एक वर्ष ; स्विटी उर्फ सुलताना शेख कोहिनुर बिल्डींग, बुधवार पेठ एक वर्ष ; रुपा काबिल शेख कोहिनुर बिल्डींग एक वर्षे ; सोनी उर्फ रुपा इम्रान शेख शांता बिल्डीग, बुधवार पेठ एक वर्षे ; ज्योती नागप्पा कट्टमनी घर क्र. १०४७, बुधवार पेठ एक वर्षे ; मुक्ता रिजाऊल शेख अली बिल्डींग, बुधवार पेठ तीन वर्षे ; अंजली लछीराम नायक घर क्र. १०३८, बुधवार पेठ एक वर्षे ; विमला राजु तमांग ताजमहल बिल्डींग, बुधवार पेठ एक वर्षे ; अमिना लक्ष्मण शर्मा सागर बिल्डींग , बुधवार पेठ तीन वर्षे ; कल्याणी उमेश देशपांडे पल्लवी अपार्टमेंट, फ्लॅट नं. ५ , पाषाण एक वर्षाकरीता.

विशेष बाब म्हणजे यातील एका रेडमध्ये ज्या दोन अल्पवयीन मुली एका एनजीओकडे दिल्या होत्या त्या सर्वांचे पुढे काय झाले याची नेमकी माहिती मिळत नाही. यात नमूद करण्यात आलेल्या संपना, ताजमहाल, कोहिनूर, शांता, माचिस, नया सपना या इमारतीत कुंटणखाने जोमात सुरु आहेत.

अखेर पोलीस तरी किती वेळा धाडी टाकणार ? यातील गुन्हेगार अलगद बाहेर येतात पुन्हा नव्याने धंद्याला लागतात. तोवर पोलीस अधिकारी बदलून जातात, नव्या अधिकाऱ्यांना सगळी गणिते लक्षात येऊपर्यंत त्यांची अर्धी टर्म संपून गेलेली असते. कधी कधी त्यांना केवळ रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी कारवाई करावी लागते तर कधी कधी अत्यंत तळमळीने कारवाई केली जाते. पण परिणाम शून्य होतात.

आता तर ह्युमन ट्रॅफिकिंगची ऑनलाईन वेबपोर्टल निघालीत, फिमेल एस्कॉर्टचे गोंडस नाव मिळालेय. ज्यांना पूर्वी वेश्या वस्तीत जाण्याची लाज वाटायची ते उच्चभ्रू देखील आता मिटक्या मारत चमडी बाजारचा आनंद घेतायत. एकंदर आपण खोल गाळात रुतत चाललो आहोत आणि त्याच्या तळाशी आहेत रांडा म्हणवल्या जाणाऱ्या अगतिक बायका पोरी ! कुणी साठीची तर कुणी सहा वर्षाची, कुणावर वार झालेले तर कुणाची वारही न पडलेली ! आता तर या शोषितांच्या किंकाळ्या देखील उमटत नाहीत कारण आम्ही ऐकणं बंद केलंय ...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा