शुक्रवार, २ मार्च, २०१८

अवयव प्रत्यारोपण शास्त्रातील नवे पर्व ..


मानवी शरीराची आणि शरीराच्या गरजांची, रचनेची जसजशी उकल होत चाललीय त्यातून नवनवी माहिती समोर येते आहे. तिला आधारभूत मानत त्या गरजांची पूर्तता करताना आधुनिक शरीरविज्ञानशास्त्राने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. यातले सर्वात अलीकडच्या काळातील संशोधन मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या संशोधनाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील असंख्य प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन  येथे झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत अवयव विकसक संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पॅनलने जे रिसर्च डॉक्युमेंट सादर केले आहेत त्यातील माहिती थक्क करणारी आणि अनेक रुग्णांच्या जीवनदानाच्या आशा पल्लवित करणारी आहे. या पेपर्सनुसार मानवी अवयव आता मानवी शरीराबाहेर नैसर्गिक पद्धतीने निर्मिले जाऊ शकतील.
या संशोधकांनी मादी डुक्कराचे फलित प्रक्रिया झालेले बीजांड या करिता वापरले होते. गर्भधारणेसाठी यातील ज्या पेशी काम करतात त्यांचे वर्गीकरण करून त्यातील ज्या जीनपासून वा जीन्सच्या जोडीपासून गर्भाच्या हृदय निर्मितीचे काम चालते ते बाजूला काढले गेले. दरम्यान ज्या रुग्णावर हृदय प्रत्यारोपण करायचे होते त्याच्या हृदयाची स्टेमसेल काढून त्या जीन्सद्वारे गर्भात इंजेक्ट केले गेले. या नंतर नऊ महिन्याचा कालावधी जाऊ दिल्यानंतर परिपूर्ण वाढलेल्या डुक्कराचे हृदय मानवी पेशींनी बनलेले आढळले. या डुक्कराला कत्तलखान्यात नेण्याआधी हे हृदय काढून त्याचे स्टेमसेल देणाऱ्या हृदय प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णावर रोपण केले गेले. येथे अवयव मिसमॅच (शरीराने अस्वीकार करणे) होण्याची शक्यता पूर्णतः निकालात निघते. या आधी मानवी शरीराला त्याच्या जीन्सशी अजिबातच न जुळणाऱ्या अयवयवांचे यशस्वीरित्या रोपण करणे कठीण काम होते. अशा शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर शरीराने काही दिवसातच रोपण केलेला अवयव रिजेक्ट केले जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्याला या प्रक्रियेने आळा बसणे शक्य होणार आहे. 

प्रत्यारोपणासाठी अवयवांची गरज आणि मागणी जगभरात मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्या मानाने त्याची पूर्तता अत्यंत तोकड्या प्रमाणात होते आहे. लोकांचे आयुष्यमानही वाढते आहे आणि ते अधिक दीर्घायुष्यी असावं याकडे सर्वांचा कल वाढतो आहे. अशा समयी नानाविध कारणांनी विविध अवयवांची गरज असणारे रुग्ण जगभरात मोठ्या रकमेच्या खर्चिक शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार असूनही केवळ दाते न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागतोय ही वस्तूस्थिती आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही वर्षाकाठी ७५००० बाधित व्यक्ती आपल्याला हव्या असणाऱ्या अवयवाच्या दात्याची प्रतीक्षा करतात आणि अवयव न मिळाल्यामुळे रोज किमान वीस जणांचा तरी मृत्यू होतो. जगातील सर्वात प्रगत, विकसित आणि शास्त्रपारंगत देशात ही अवस्था आहे तर विकसनशील आणि अविकसित देशात किती गंभीर आणि वाईट चित्र या क्षेत्रात असेल याची कल्पना करवत नाही. अशात काहींना अवयवरोपण होऊन देखील जेनेटिक मॅचिंग न झाल्याने अनेक समस्या उद्भवतात. शरीराने अवयवाचा अस्वीकार करू नये यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. ह्या सर्व जटील समस्येवर आता या नव्या संशॊधनाने नवी दिशा दाखवली आहे. जे प्राणी कत्तलीद्वारे मारले जातात अशा पाळीव सस्तन प्राण्यात ही प्रक्रिया करता येईल. मेंढी, गाय आणि डुक्कर यांत मानवी अवयव अशा रीतीने जन्माला घालता येतील. तो प्राणी मारला जाण्याआधी मानवी निकडीचा अवयव काढून घेता येईल, अशाने अनावश्यक पशुहत्याही टाळता येईल. 

अशा पद्धतीने मानवी अवयव तयार करण्याची ही पहिली वेळ असली तरी बायोटेक्नोलॉजीच्या २०१२ मधील जेनेटिक इंजिनिअरींगमधील नव्या ऊतीनिर्मिती प्रक्रियेचाच हा एक भाग आहे.  मानवी प्लुरीपोटेंट पेशी विविध प्राण्यांच्या पेशीत वाढवल्या जाऊ शकतात हे या आधी २००६ मध्ये सिद्ध केले गेलेय. आता झालेले संशोधन हे या दोन्ही क्रियांचे एकत्रीकरण आहे. कॅलिफोर्निया येथील साल्क इन्स्टीट्युटमध्ये संशॊधकांनी याची आधीची पायरी पूर्ण करताना उंदराच्या छोट्या पिल्लात दुसऱ्या उंदराच्या पॅनक्रियाज, हृदय, डोळे आणि अन्य अवयवांच्या पेशीपासून बनलेले अवयव निर्मिले होते.  याचाच पुढचा टप्पा स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या हिरोमित्सु नाकाऊची यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीरित्या पार पाडला. ज्या उंदरांमध्ये हे अवयव निर्मिले गेले ते नॉर्मल आयुष्य जगले हे विशेष. त्यातील ज्या घुशीच्या पॅनक्रियाजच्या स्टेमसेलपासून दुसऱ्या उंदराच्या शरीरात पॅनक्रियाज बनवल्या गेल्या होत्या त्यांचे दात्या उंदरात प्रत्यारोपण केले गेले तेंव्हा त्याच्या डायबेटिक डीसऑर्डरवर ताबा मिळवता आला. हे संशोधन अफलातून होते आणि त्याचा पुढचा टप्पा गाठताना शास्त्रज्ञांनी मानवी अवयव मानवी शरीराबाहेर विकसित करून बायोटेक्नॉलॉजीत आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये क्रांतिकारी पर्व आणले आहे.  

अवयव दान आणि प्रत्यारोपणामुळे दरवर्षी हजारो लोकांना जगण्याची दुसरी संधी मिळते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातली वाढती दरी, मानवी अवयवांची मागणी आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यामुळे  अवयवांचा व्यापार हा काही लोकांसाठी पैसे कमवण्याचे साधन झाला आहे तर काहींना यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अवयवांच्या व्यापारामुळे  गरीबांचे शोषण होते आणि ते आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अवयव विकायला तयार होतात. दरवर्षी शेकडो भारतीय अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत  मरण पावतात. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत  असलेल्या लोकांची  संख्या यातील तफावत यामागील कारण आहे. दरवर्षी २.१ लाख भारतीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, मात्र  प्रत्यक्षात केवळ ३०००  - ४००० मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. हृदय प्रत्यारोपणाच्या बाबतीतही परिस्थिती काही  वेगळी नाही.  देशभरात दरवर्षी  ४ ते ५ हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असताना, केवळ १०० लोकांचे  हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. नॅशनल प्रोगाम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस (एनपीसीबी)च्या  २०१२ - १३  च्या अहवालानुसार२०१२-१३ मध्ये देशात  ८०  हजार ते एक लाख कॉर्नियाची गरज असताना केवळ ४४१७ कॉर्निया उपलब्ध होते. देशभरात सध्या १२० प्रत्यारोपण केंद्रे असून तिथे दरवर्षी साडेतीन ते चार हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया  केल्या जातात.  यापैकी चार केंद्रांवर १५० ते २०० यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. तर काही केंद्रावर क्वचित एखादे हृदय प्रत्यारोपण केले जाते. 

अवयव दात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील  प्रमुख समस्या आहे. जागरुकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा  यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज  आहेत आणि अवयव प्रत्यारोपणासाठी हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. अवयवांचे विच्छेदन किंवा ते शरीरापासून वेगळे करणे हे निसर्ग आणि धर्माच्या विरुध्द असल्याचे बहुसंख्य भारतीयांचे म्हणणे आहे. अवयव हवे असल्यास रुग्णालयातले कर्मचारी रुग्णाला  वाचवण्याचे परिश्रम घेणार नाहीत असा काहींचा समज आहे. तर काहींचे म्हणणे आहे की मरण पावण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले जाऊ शकते. याशिवाय, अवयवदानासाठी केंद्रीय नोंदीकरण व्यवस्था नसल्यामुळे देखील लोकांना अवयवदानाबाबत किंवा अवयवदात्याबाबत माहिती मिळू शकत नाही. ब्रेन डेथला प्रमाणित करणे ही देखील समस्या आहे. जर लोकांना ब्रेन डेथ बाबत माहिती नसेल, तर रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी तयार करणे अवघड होऊन बसते.

भारतात, १९७०  मध्ये प्रथम मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आशिया उपखंडात  प्रत्यारोपणात भारत आघाडीवर आहे. गेल्या चार दशकातील प्रत्यारोपण विकासाच्या इतिहासात  देशात अवयवदानाचा व्यापार हा प्रत्यारोपण  कार्यक्रमाचा एक अविभाज्य  भाग बनला आहे. सरकारने १९९४ मध्ये  मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा मंजूर केला होता. या कायदाअंतर्गत, असंबंधित  प्रत्यारोपणाला  बेकायदायशीर  ठरवण्यात आले आणि असंबंधित  प्रत्यारोपणावर निर्बंध  आणणे अपेक्षित होते. मात्र या कायदयामुळे अवयवांचा व्यापार थांबला नाहीच आणि मेंदू मृत झालेल्या स्थितीत अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली नाही. ब्रेन डेथया संकल्पनेला कधीच प्रोत्साहन दिले गेले नाही किंवा त्याचा व्यापक प्रमाणावर  प्रचारही झाला नाही. सध्या होत असलेल्या बहुतांश असंबंधित  प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्राधिकार समितीच्या मंजुरीने केल्या जातात.

सरकारने वर्ष २०११ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित सुधारित कायदा लागू केला. ज्यात अवयवदानाची प्रक्रिया सोपी करण्याची तरतूद  होती. या तरतुदींमध्ये अवयवदान करणाऱ्या मृत  व्यक्तीकडून अवयव मिळवण्याचे केंद्र आणि नोंदणी कार्यालय बनवण्याच्या व्यवस्थेचा समावेश आहे. तसेच अवयवांची अदलाबदली  नोंदणीकृत डॉक्टरद्वारे  प्रत्यारोपण समन्वयकाशी सल्लामसलत करुन अनिवार्य करणे तसेच संभाव्य अवयवदात्याच्या नातेवाईकांशी सल्लामसलत करुन, त्यांना अवयवदानाबाबत माहिती देणे आणि त्यांची अनुमती असल्यास अवयव काढण्याच्या केंद्राला याबाबत कळविण्याची तरतूद यात आहे.

भारतात रस्ते अपघातात मरण पावलेल्यांची  संख्या मोठी असल्यामुळे  मृतांकडून  अवयवदानाची  शक्यता अधिक आहे. कधीही प्रत्येक मोठया शहरातील आयसीयूमध्ये आठ ते दहा ब्रेन डेथचे रुग्ण आढळतात. रुग्णालयात होणाऱ्या  मृत्यूंपैकी ४ ते ६ टक्के मृत्यू ब्रेन डेथमुळे होतात. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १४ लाख लोक मृत्युमुखी पडतात. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अभ्यासानुसार, यापैकी ६५ टक्के लोकांच्या मेंदूला मार लागलेला असतो. याचाच अर्थ ९० हजार लोक ब्रेन डेथचे असू शकतात.

असे नाही की, भारतात लोक अवयवदान करु इच्छित नाही. मात्र ब्रेन डेथचे रुग्ण ओळखणे  आणि त्यांचे प्रमाणीकरण करण्याची  कोणतीही यंत्रणा रुग्णालयांकडे नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचे अवयवदान  करुन दुसऱ्या व्यक्तीचा  जीव वाचवण्याचा अधिकार नसतो.  कोणतीही व्यक्ती , लहान मुलापासून मोठयापर्यंत  अवयवदान करु शकते. ज्या व्यक्तीचा मेंदू मृत पावला  आहे आणि ज्याला मृत्यूनंतरचे अवयवदान म्हटले जाते, त्याचे प्रमाण भारतात अजूनही कमी आहे. स्पेनमध्ये दहा लाख लोकांमागे  ३५ लोक  अवयवदान करणारे आहेत. ब्रिटनमध्ये ही संख्या दहा लाख लोकांमागे ३७ लोक आणि अमेरिकेत  ११ लोक इतकी आहे. तर भारतात  हेच प्रमाण केवळ ०.१६ लोक इतके अत्यल्प आहे.

एखाद्याची अवयव दानाची इच्छा आहे हे सांगण्यासाठी दाता कार्डवर स्वाक्षरी करणे ही पहिली पायरी आहे. दाता कार्ड ही कायदेशीर  कागदपत्र नाही तर एखाद्याची दान करण्याची इच्छा दर्शविणारे आहे. मृत्यूनंतर  अवयव दान करण्याची एखाद्याची इच्छा दाता कार्ड दर्शविते, मात्र या निर्णयाबाबत त्याच्या नातेवाईकांना  किंवा दोस्तांना कळवणे महत्त्वाचे आहे. कारण अवयवदानासाठी, कुटुंबातील सदस्यांची अनुमती मागितली जाते. मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये यकृत, हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड, आतडे यांसारखे महत्त्वपूर्ण अवयव आणि कॉर्निया, हृदयाचे व्हॉल्व, त्वचा, हाडे, अस्थि, शिरा, नस यांसारख्या पेशी दान करता येतात. अवयवांना वस्तू बनवणे हा सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास  आहे आणि सभ्य समाजात अवयवांची गरज पूर्ण करण्यासाठी हा पर्याय स्वीकारता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने अवयवांच्या विक्रीबाबत  स्पष्टपणे म्हटले आहे की मानवी हक्कांच्या सार्वभौमिक जाहीरनाम्याबरोबरच स्वत:च्या संविधानाचे हे उल्लंघन आहे. शरीर आणि त्याचे अवयव वाणिज्यिक व्यवहाराचा विषय होऊ शकत नाही. त्यानुसार अवयवांसाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा निषेध करायला हवा. अवयवदानासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. यात नागरी समाज, धार्मिक नेते आणि अन्य हितधारकांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

अवयव प्रत्यारोपण आणि अवयव निर्मितीतले नवे संशोधन समोर आल्यावर याच जोडीने निसर्गाचा समतोल राखतच मानवी जीवनाचा विकास आणि नवनिर्माण वा पुनर्निमाण केले जाणे अभिप्रेत आहे. सायन्स आणि टेक्नोलॉजीच्या वेगवान अश्वावर स्वार झालेल्या मानवी समाजमनाने याचे भान ठेवणे गरजेचे आहे अन्यथा यातून मानवी अवयवांच्या गरजा भागतील पण नैसर्गिक समतोल ढासळून नव्या विनाशाची बीजे रोवली जातील हे सुज्ञास सांगणे न लगे. 

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा