सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (पूर्वार्ध)


“गणेशोत्सव जवळ आला की आमच्या मनात नानाविध तऱ्हेचे काहूर उठते..” पुण्याच्या बुधवार पेठेलगत असलेल्या शुक्रवार पेठ पोलिस चौकी नजीकच्या रेड लाईट एरियाच्या तोंडावर असणाऱ्या चांदणी बिल्डींगमधली वंदना डोळे विस्फारून असंच काहीबाही सांगत राहिली. त्यातलं काही मेंदूत साचून राहिलं तर काहीचा काळानुसार निचरा झाला. दोन वर्षापूर्वीच्या गणेशोत्सवात पुण्यातील वेश्यांचा (आताच्या भाषेतील सेक्सवर्कर्सचा) या उत्सवाबद्दलचा मूड टिपून घ्यायचा होता तेंव्हा नानाविध अनुभव आले. त्याच्या मागच्या वर्षी मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचे अनुभव घेतले होते. यंदा महाराष्ट्राच्या सीमेवर असणारया विजापूरात याच कारणासाठी आलो असताना थोडया वेगळया जाणिवांची अनुभूती झाली. बागलकोट रोडलगत असणाऱ्या एका वसाहतीबाहेर एक दिवस आणि नजीकच्या इंडी शहरात एक दिवस भेटी गाठींचे शेड्युल होते.

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

'लांड्या' विचारांचा मुखभंग ...


पंधरा ऑगस्टच्या एक दिवस आधी आपल्या लोकांच्या मेंदूपासून ते बुडख्यापर्यंत राष्ट्रप्रेमाचे झरे वाहत असतात. हा साथीचा आजार फक्त तीन दिवसच असतो. आता तर व्हॉटसएपचे बिनडोक फॉरवर्डछाप पब्लिक देशभरात प्रसरण पावलेलं असल्याने याचे पेव गल्लोगल्ली आढळते. कुणी कच्चा हरभरा खाल्ला तरी त्याचा गंध त्याच्या सोशलमिडीयातून इतरांच्या मोबाईलमध्ये पसरतो. असो. आवड ज्याची त्याची..
तर पंधरा ऑगस्टला आलेल्या देशप्रेमाच्या भरतीत पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलाम करणारी मुले आणि त्यांचे शिक्षक हा फोटो देशभरात व्हायरल वगैरे झाला. अनेकांनी त्यांना सलाम, त्रिवार वंदन, कडक कुर्निसात, सेल्युटही केला. अनेकांनी त्यासोबत आपल्या बद्धकोष्टी कवितादेखील पोष्टून आपलं काव्योदर साफ करून घेतलं. असो ज्याचं त्याचं पोट...

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

दाभोलकरांच्या पश्चातची चार वर्षे....



२० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विवेकवादाची दिवसाढवळ्या निर्घृणहत्या करण्यात आली. त्या घटनेला आज चार वर्षे पूर्ण झाली. अत्यंत भ्याड हल्ला करून या दिवशी त्यागवादी सजगतेवर नियोजनपूर्वक घाला घातला गेला. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सनातनी विचारांना वंदनीय मानणाऱ्यांनीच केल्याचा कयास त्या दिवसापासूनच उभ्या महाराष्ट्राने व्यक्त केलाय. ही हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वसनांवरचा रक्तरंजित डाग आहे ज्याचे सद्य स्थितीत तर कोणत्याच राजकीय पक्षाला कसलेच सोयरसुतक दिसून येत नाही.गांधीवादी विचारांवर श्रद्धा ठेवून आपली चळवळ शांततेच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका निशस्त्र व्यक्तीस मारलं गेलं तेंव्हा राज्यभर नव्हे तर देशभर त्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला,सर्वत्र एकच कोलाहल माजला तरी तपास यंत्रणांच्या कानात जू रेंगली नाही की कोणा राजकारण्याला याचा खंतखेद वाटला नाही. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, तपास जलदगतीने व्हावा म्हणून राज्यातील विरोधी पक्ष लाजेकाजेने का होईना अधूनमधूनक्षीण आवाज उठवताना दिसतात. त्यांचा आवाज असा क्षीण का आहे याला विविध कारणांची 'भगवी','हिरवी', 'निळी' झालर आहे.

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...




देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील सर्व घटकांना स्वातंत्र्य मिळाले का याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्या देशात आजही अनेक प्रकारचे वंचित, पीडित, शोषित आहेत, त्यातलेच काही वर्ग आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले नाहीत. यातीलच एक घटक म्हणजे अलीकडच्या सभ्य जगाच्या ढोंगी शब्दात सेक्सवर्कर वा देशी भाषेत वेश्या होत. त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्याची ‘खरी’ सकाळ कधी उगवेल की नाही हे नेमके कोणी सांगू शकत नाही. अशाच एका दुर्दैवी मुलीची ही एक करुण कथा.

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

'आई'ची कविता आणि महाकवी नामदेव ढसाळ....



आई गेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते. दुःख याचं आहे की, अज्ञानाच्या घोषा आड  तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या, गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं दुःख याचं आहे, तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

वृत्तवाहिन्यातील पत्रकारिता - अस्तंगत होत चाललेले सत्यतत्व.


'हाऊ सेन्सॉरशिप वर्क्स इन ब्लादीमीर पुतीन्स रशिया' या मथळ्याची बातमी अमेरिकेतील सर्वोच्च खपाचे दैनिक असणाऱ्या 'द वॉशिंग्टन टाईम्स'ने ९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात छापली होती तेंव्हा रशियन प्रशासनाला त्याच्या फार मिरच्या झोंबल्या होत्या, अमेरिकन मिडीयाने वाकुल्या दाखवत याचा आनंद घेतला पण तो फार काळ टिकला नाही जेमतेम वर्षातच अमेरिकेतच याहून वाईट परिस्थिती आली. डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी नावडत्या प्रसारमाध्यमांना व्हाईटहाऊसची दारे बंद केली. जी प्रसारमाध्यमे आपल्यावर आपल्या धोरणावर टीका करतात ती ‘अमेरीकाविरोधी’ असल्याचा कांगावा त्यांनी सुरु केला. टीका कारणाऱ्या प्रसारमाध्यमांना त्यांनी 'अपोझिशन पार्टी' असं हिणवून पाहिलं. यामुळे या माध्यमांच्या नाकात वेसण घातली गेली, काही माध्यमे झुकली तर काही आपल्या तत्वांवर टिकून राहिली. यातून ज्यांनी ट्रम्प प्रशासनापुढे आधीच पायघड्या अंथरल्या होत्या त्यांची मात्र चंगळ झाली. फ्रीलान्स पत्रकार डेरेक थॉम्पसन यांनी 'द अटलांटीक' मध्ये काही दिवसापूर्वी रंजक आढावा घेतला आहे त्यात काही महत्वाची तथ्ये समोर आलीत. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यापासून फॉक्स न्यूज, एमएसएनबीसी आणि सीएनएन यांची किती चंगळ सुरु झाली आहे हे त्यांनी आकडेवारी सहित दिले आहे. त्याच बरोबर प्रिंट मिडीयात आपल्या आवडत्या समूहाला त्यांनी जाहिरातीचा मलिदा कसा वाटला गेला याची रोचक माहिती त्यात आहे. जगभरातील मिडीयाचा आढावा घेताना 'द गार्डियन' या कुरापतखोर दैनिकाने २४ मार्च २०१७च्या अंकात ब्लादिमीर पुतीन त्यांना न आवडणाऱ्या मिडिया समूहाशी कसे वागतात आणि त्यांची पत्रकारीतेबद्दलची भूमिका काय आहे हे खोचक पद्धतीने मांडले आहे.