गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

'अनसोशल' मीडियावरवरचा 'भगवा' मुळचा आहे तरी कसा ?



मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण .



गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की अजूनही काही दृश्ये हमखास जशीच्या तशी नजरेस पडतातच. गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते. रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच असे. बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत.
पारायणात रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

मला उमगलेला 'मराठयांचा मूकमोर्चा'....


शिवरायांना बाह्य शत्रूंनी जितका त्रास दिला तितकाच त्रास अंतर्गत शत्रूंनी दिला. भाऊबंदकीच्या शापाने शिवरायांनाही त्रास झाला आणि संभाजीराजांना त्याची अधिक झळ पोहोचली. इतिहासावर चिंतन करताना हा मुद्दा अनेक वेळा माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींचा मानसिक छळ करतो. शिवछत्रपतींनी अनेक वेळा आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भाऊबंदकी मिटावी म्हणून प्रयत्न केला, पण वैरभाव संपला नाही. सर्वच शिवप्रेमींना या गोष्टीची खंत वाटते की आपला समाज राजांच्या हाकेस ओ देऊन एकीने का सामोरा गेला नाही. आज हे परिवर्तन घडत्येय. निमित्त कोपर्डीच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे झाले आहे. त्यातून लाखोंच्या मनात खदखदणारा असंतोष म्हणा वा माझ्यासारख्या सामान्य माणसासारख्यांची ही जुनी नासूर होऊन छळणारी खंत बाहेर पडते आहे. जे काम शिवरायांच्या काळात होऊ शकले नाही ते आज होतेय असे होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन बसणे योग्य वाटत नाही. कारण एकीकडे खंत व्यक्त करायची की मराठे कधीच एकत्र येत नाहीत, मराठे एकमेकाला सदैव पाण्यात बघतात, मराठे म्हणजे एकमेकाच्या अंगावर चढणारे खेकडे आहेत म्हणून हिणवायचे आणि प्रत्यक्ष अशी एकत्रित होण्याची पहिलीच ऐतिहासिक वेळ आल्यानंतर त्यातील दोष शोधत बसणे हा दुटप्पीपणा ठरतो.

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

अखिल बिरादरीचा बापवृक्ष .....



माती आणि आई ही प्रेमाची सर्वोच्च रूपे आहेत. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करताना यांचा दाखला देतोच. ममता, माया, स्नेह आणि आपुलकीने ओथंबलेलं नातं दर्शवताना आई किंवा मातीचं रूपक वापरलं जातंच. जो तो आपल्या परीने हे ममत्व जोपासतो. आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो किंवा आपली काळी आई आपल्यासाठी किती प्राणप्रिय आहे हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय असतो. आईवरचं प्रेम कुणीही व्यक्त करू शकतो, अगदी वन्य वा पाळीव प्राण्यातही पिलांचा आपल्या मातेप्रती स्नेहभाव असतो. ज्या प्रमाणे गाय आपल्या वासराला चाटते त्याच मायेने वाघीण देखील आपल्या बछडयाला तितक्याच मायेने चाटत असते. हे सर्व आपले प्रेम व्यक्त करू शकतात कारण ते सचेतन सजीव आहेत. चालू बोलू शकतात. मात्र मातीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या जीवात अचल सजीवही असतात ! फक्त माणूसच ह्या काळ्या आईवर प्रेम करतोय असं काही नाही. माणूस बोलून दाखवतो पण वृक्षवल्ली आपलं प्रेम कसं व्यक्त करत असतील याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. म्हणूनच मातीवर प्रेम करणाऱ्यांचा धांडोळा घ्यायचा झाला तर केवळ माणसांचाच विचार करून चालणार नाही. मातीवरील अस्सल प्रेमाचे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतिक काय असेल तर तो वटवृक्ष ! एका अंकुराच्या रूपाने उगवलेलं इवलंसं रोप मातीत खोल रुजत जातं आणि त्याची देहयष्टी फुलत जाते. बघता बघता त्याचा बुंधा भरत जातो अन त्याच्या फांदया वाऱ्याला कवेत घेऊ पाहतात. कधी काळी हातांच्या मिठीत मावणारे त्याचे खोड काही वर्षात भले मोठे होऊन जाते. चार जणांनी फेर धरला तरी त्याचा बुंधा हातात मावत नाही इतका प्रचंड पसारा वाढतो.

'हमें तुमसे प्यार कितना'ची रसाळ 'कुदरत' ....



७०-८० चे दशक हे अमिताभचे एकहाती दशक होते, वनमॅन  इंडस्ट्रीचा अनुभव बॉलीवूड घेत होते. अमिताभच्या आधीचा सुपरस्टार राजेशखन्ना बरयापैकी पिछाडीवर पडला होता. त्याला इंडस्ट्रीत अस्तित्व टिकवण्यासाठी एका हिट सिनेमाची प्रचंड गरज होती पण त्याचे सिनेमे त्याला साथ देत नव्हते. महबूबा, त्याग, पलकों की छाँव में, नौकरी, जनता हवलदार, चक्रव्यूह,बंडलबाज असे अनेक सिनेमे दणकून आपटले होते, नाही म्हणायला ७९मध्ये आलेल्या अमरदिपने थोडाफार व्यवसाय केला होता. पण त्याची धडपड सफल झाली आणि १९८१ मध्ये चेतन आनंदने दिग्दर्शित केलेल्या 'कुदरत'ने त्याला तारले व पुढे काकाने अनेक बरयापैकी हिट सिनेमे देऊन आपली पत शाबूत राखली...

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

शुक्रतारा - मंगेश पाडगावकर


'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडूनआठवते बालपण जेव्हां होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतो रंगत मी किती !
पण अकस्मात होतो जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून.........

घर असूनहि आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावे ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...'