मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

अनमोल घडीची चिरंतन टिकटिक.....


"संध्याकाळी देव्हाऱ्यात लावल्या जाणाऱ्या समईचे पावित्र्य या सिनेमात असायचे, सकाळची सडारांगोळी करून तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतानाची प्रसन्नता त्यात होती. दुपारच्या शीतल वामकुक्षीचा निवांतपणा त्यात असायचा. शहर झोपी गेल्यानंतर उत्तररात्री खिडकीतून येणारा गार वारा शृंगाराचे हळुवार गुंजन जोडप्यांच्या कानात करायचा तो शृंगार या सिनेमात होता. सप्तरसाचे मर्यादित पण उत्फुल्ल रसरशीत अविष्कार या सिनेमात होते म्हणून ते अधिक जवळचे आणि अधिक सच्चे वाटायचे…………"

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज - एक आकलन!



आपल्याकडे स्वतःच्या राजकीय, जातीय फायद्याच्या गणितानुसार इतिहासाच्या चिंधडया उडवण्याचे काम सर्रास केले जाते. छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल तर तीन शतकापासून हा उद्योग सुरु आहे. त्याचीच एक चिकित्सा...

ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आले नव्हते. असं ऐतिहासिक साधनं दर्शवतात तरीही मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातिन-उस-सुलातिन या तीन ऐतिहासिक साधनानुसार संभाजीराजांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो ! या बदफैलीमुळे व्यथित होऊन शिवरायांनी संभाजीराजांना स्वराज्याचा वारसदार मुक्रब करण्यास नकार दिला म्हणून आपल्या पित्याविरुद्ध बंड करण्यासाठी ते मुघलांना मिळाले असा विपर्यासी इतिहास काही लोक मांडतात. ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि १३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी त्यांनी ११ मार्च १६८९ रोजी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ११ वर्षापूर्वी एक व्यक्ती आपल्या पित्याविरुद्ध, राज्याविरुद्ध तथाकथित गद्दारी करतो आणि नंतर त्याच लोकांसाठी, धर्मासाठी आपला जीव देतो या दोन घटनांची सांगड कशी घातली पाहिजे याचे उत्तर शोधण्यासाठी इतिहासाची पाने आपल्याला चाळावी लागतात.

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

नयनोमे बदरा छाये अन 'मेरा साया'!



'मेरा साया' १९६६ मधला सिनेमा. माझा जन्मही झालेला नव्हता तेंव्हा. पण हा सिनेमा मी बऱ्याचदा पाहिलाय, त्यातल्या 'नयनो मे बदरा' या गाण्यासाठी आणि अर्थातच साधनासाठी. मदनमोहनजींचे सुमधुर संगीत या सिनेमाला होते. साधना ही साठच्या दशकात इतकी प्रसिद्ध अभिनेत्री होती की तिची हेअरस्टाईल तेंव्हा मुलींमध्ये साधना कट म्हणून प्रसिद्ध होती. 'मेरा साया' मध्ये सुनील दत्त ठाकुर राकेश सिंहच्या भूमिकेत होते. त्यांचे गाजलेले जे सिनेमे आहेत त्यापैकीच हा एक होय.

साधनाची दुहेरी भूमिका यात आहे. के.एन.सिंह यात सरकारी वकीलाच्या भूमिकेत आहेत. त्यांचे ते भुवई उंचावून बोलणे आणि पॉज घेऊन छद्मीपणाने हसत बोलणे सिनेरसिक कधीच विसरणार नाहीत. अन्वर हुसैन, रत्नमाला, मुक्री, मनमोहन, धुमाळ आणि प्रेम चोपड़ा यांच्या सहायक भूमिका या सिनेमात होत्या.