शनिवार, १२ जानेवारी, २०१९
हॅलो..
आपण एखाद्याचं हृदय घायाळ करायचं, त्याच्या काळजाला जखमा द्यायच्या, नंतर त्याच्यासाठी एकाकीपणे झुरत राहायचं, त्याची क्षमा मागण्यासाठी जगत रहायचं, त्याच्या आवाजासाठी तडफडत राहायचं, एका क्षमायाचनेसाठी हजारो फोन कॉल्स करायचे पण पलीकडून कुणीच आपला आवाज ऐकण्यासाठी नसणं या सारखा दैवदुर्विलास कोणताच नाही.याच थीमवर एक प्रसिद्ध काव्य रचले गेले आणि त्याचं रुपांतर गीतात झाल्यावर त्याला २०१७ मध्ये 'सॉन्ग ऑफ द इअर'चे ग्रामी ऍवार्ड मिळाले !
जिने काव्य रचले तिनेच ते गायले. ऍडेल तिचे नाव.
माझी आवडती गायिका आणि आवडते गाणे.
ऍडेलच्या 'हॅलो' या कवितेचा मराठीतील स्वैर अनुवाद खाली दिलाय.
~~~~~~~~~
हॅलोSSS मी बोलतेय.
इतकी वर्षे होऊन गेलीत आणि तुला भेटण्यासाठी मी व्याकुळ आहे याचं आश्चर्य आहे...
मनातलं सर्व मळभ जाण्यासाठी
काळ हेच औषध आहे असं म्हणतात.
पण माझ्या जखमा काही भरून आल्या नाहीत.
हॅलो, तू ऐकतोयस ना ?
तारुण्यात ज्याच्यासोबत मी स्वच्छंद वावरले
त्याची दिवास्वप्ने मी कॅलिफोर्नियातून पाहत्येय.
सगळ्या सुखांनी पायावर लोळण घेण्याआधी ते सुख कसं वाटायचं हे आता आठवत नाही.
खरं तर आपल्यात मोठं अंतर होतं..
आणि आता लक्षावधी मैलावरून मी फोन केलाय.
मी जे काही केलंय त्याबद्दल क्षमा मागण्यासाठी
हजारो वेळा मी फोन केला असेल.
पण जेंव्हा कधी मी फोन केला तेंव्हा हरेक वेळेस तू घरी नसायचास.
म्हणून दुरूनच हॅलो म्हणावे लागतेय.
तुझं काळीज तोडण्याच्या दुष्कृत्यापायी क्षमायाचनेसाठी
तुला फोन करण्याचा प्रयत्न केला इतकं तरी मी म्हणू शकतेय.
तुला अंतर्बाह्य हेलावून टाकण्यासाठी हे पुरेसं नाहीये याची मला तमा नाही.
हॅलो कसा आहेस तू ?
मी तर माझ्या अपराधीपणाबद्दलच बरळतेय, अगदी नेहमीप्रमाणेच !..
तू बरा असशील अशी आशा करते.
ज्या ठिकाणी आपल्या दोहोत खूप काही घडू शकलं नाही तिथं आता तरी तू काही केलंयस की नाही ?
आपल्या दोघात सिक्रेट काहीच नव्हतं.
वेळ वेगाने निघून जातोय,
म्हणून पुन्हा एका बाजूने मीच हॅलो म्हणतेय.
खरे तर पलीकडे कुणीच नाहीये, पण मी हॅलो म्हणतेय.
आणि आता लक्षावधी मैलावरून फोन केलाय.
मी जे काही केलंय त्याबद्दल क्षमा मागण्यासाठी
हजारो वेळा मी फोन केला असेल.
पण जेंव्हा कधी मी फोन केला तेंव्हा हरेक वेळेस तू घरी नसायचास.
तुला हेलावून टाकण्यासाठी हे पुरेसं नाहीये याची मला तमा नाही.
मला तमा नाही...
खरे तर पलीकडे कुणीच नाहीये, पण मी हॅलो म्हणतेय.
मी हॅलो म्हणतेय....
- ऍडेल आणि ग्रेग कर्स्टीन.
~~~~~~~~
ऍडेल गाते खूप सुंदर. तिची गायकी अंतर्मनाला भिडते. तिची आजवरची गाणी याची साक्ष देतात.
या गाण्याच्या व्हिडीओमध्ये ती त्याच्या घरी येते. तेंव्हा पिनड्रॉप सायलेन्स आहे... सुरुवातीचे काही क्षण अगदी निशब्द आहेत.. किर्र आवाज करकरत दरवाजा उघडतो. त्याच्या घरात खूप वर्षापासून कुणीच नसावं. धुळकट खिडकीत रात्रकिडे मरून पडलेत, घरातलं सगळं फर्निचर झाकून ठेवलंय, बंदिस्त खिडकीच्या पडद्यांवर धूळ जमा झालीय... आणि ती घरात येते. घरात सगळीकडे एक मळभ दाटून आलेय ज्यात त्याचं 'फिलिंग' आहे, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत ज्या तिला खुणावताहेत.. ती त्याला पुन्हा मोबाईलवरून कॉल करते.. त्याच्यासोबत घालवलेले क्षण तिच्या डोळ्यापुढे तरळताहेत. त्याचे भास होताहेत. तो दिसतोय... त्याला फोन करण्यासाठी दूर रस्त्यावरील ज्या पब्लिक बूथमध्ये ती पूर्वी जायची तो बूथही दिसतो. पण आता तो विजनवासात गेलाय त्याच्यावर धूळ माखली आहे, झाडाझुडपांचे साम्राज्य तिथे झालंय.. शेवटी आठवतं ते त्याचं रागाने निघून जाणं आणि राहून राहून समोर येत राहते ती, तिला त्याला सॉरी म्हणायचंय. पण ऐकायला तो कुठे आहे ?
कविता अर्थपूर्ण आहे. आणि गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीय आहे. जमल्यास एकदा बघा.
कवितेचा अर्थ विस्तृतपणे सांगताना एका मुलाखतीत मात्र ऍडेलने म्हटलं की हे काही तिच्या आणि त्याच्या अशा ठाशीव पद्धतीचं ब्रेकअप गीत नसून तिने स्वतःशीच केलेल्या ब्रेकअपचं हे स्वगत प्रकटन आहे. या अर्थाने कवितेकडे पाहिल्यास भिन्न आशय आणि अभिव्यक्ती समोर येते. हेतू कोणताही गृहीत धरला तरी कविता देखणीच वाटते.
गीताच्या व्हिडीओत सुरुवातीला त्याच्या सुनसान घरात आल्यानंतर एका क्षणासाठी ती उदासवाण्या आरशात स्वतःला न्याहाळते.
तेंव्हा गुलजार यांची काळीज पिळवटून टाकणारी एक पंक्ती आठवली..
'आईना देख़ कर तसल्ली हुई, हमको इस घर में जानता हैं कोई...'
आपलं कधी कुठं चुकलं असेल तर वेळीच सॉरी म्हणता यायला हवं नाहीतर काळीज चिरून टाकेल असा पस्तावा वाट्यास येतो...
- समीर गायकवाड.
गाण्याची लिंक - ऍडेलच्या आवाजात 'हॅलो' हे गीत इथं क्लिक करून ऐकता येईल .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा