
'द वॉशिंग्टन पोस्ट'साठी काम करणाऱ्या आणि सौदी सत्ताधीशांवर कडवट टीका करणाऱ्या पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियास किती महागात पडेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या निमित्ताने सत्तेविरुद्ध विद्रोहाचा नारा बुलंद करणाऱ्या निस्पृह लोकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सत्तेविरुद्ध आपली लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेचा खरा अर्थ समजलेला असतो असं म्हटलं जातं. अशा पत्रकारांनी चालवलेली लेखणी कित्येकदा थेट सत्ताधीशांच्या सिंहासनाला हादरवून सोडते. त्यामुळे बहुतांश राजसत्तांना असे पत्रकार नकोसेच असतात. असा निधड्या छातीचा पत्रकार कुठे विद्रोह करत राहिला तर तिथली सत्ता त्याचा सर्वतोपरी बंदोबस्त करत अगदी यमसदनास धाडण्याची तयारी ठेवते. पत्रकारच नव्हे तर आपल्याविरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा संशय आला तरी सत्ताप्रवृत्ती त्याच्या जीवावर उठते असे चित्र आजकाल पाहण्यात येते.