
साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते. असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कवी मनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपूरास गेली, तो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्या, पण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिली, इतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक निर्मिले गेले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होता, तर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला, १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यतित होत होते....