आषाढ महिना सुरु झाला की गावोगावचे म्हसोबा आणि मरीआई यांचे उत्सव सुरु होतात, काही ठिकाणी यात्रा भरतात. तर काही ठिकाणी 'कर' असते. देवाला पुरणपोळी, गोडाचा नैवैदय, कोंबडे, बकरे, तिखटाचा नैवेदय चढवण्याच्या मोहिमेला चेव येतो. खरं तर कुठला देव काहीच मागत नसतो मात्र माणसांनाच फार हौस असते, आपल्याला पाहिजे ते खायचं अन नाव देवाचं करायचं असा हा सगळा उदयोग असतो. अर्थातच काही लोक अत्यंत श्रद्धेने हे सारे सोपस्कार पार पाडत असतात. सोलापूरपासून १२५ किमी अंतरावर मी माझ्या भाऊबंदासोबत काल गेलो होतो, इंदापूरपासून दहाएक किमी अंतरावर हे म्हसोबाचे देवस्थान आहे. खरे तर गल्लोगल्ली उकीरड्याजवळ म्हसोबा असतात पण कुणाची श्रद्धा कुठल्या देवावर असेल हा श्रद्धेचा विषय असल्यानं त्यावर फार वेळ खर्ची घालत नाही. या ठिकाणी सर्व हौशा गवशा आणि नवशांची जणू जत्राच भरली होती.
पावसाळी दिवस असूनही दिवसभर कडक ऊन होते, मध्येच काही वेळ शिरवळ येऊन जात होती. सर्व विधी सोपस्कार पार पडल्यावर कामं आटोपून अगदी जेवणावळी संपत आल्या होत्या तेंव्हा आम्ही पोहोचलो. मंदिर परिसर अर्थातच प्रचंड अस्वच्छ होता, जागोजागी नारळाच्या करवंटया आ वासून पडल्या होत्या, सुकलेली हार फुलं पायाखाली येत होती, खोबऱ्याचे तुकडे आळशागत लोळत पडलेले , नारळपाण्याची चिकट ओल सर्वत्र पसरलेली, रडणारी विव्हळणारी लहान मुले अन त्यांच्याकडे सफाईदार दुर्लक्ष करून म्हसोबा कृपेसाठी त्या लेकरांचे मख्ख आईबाप तिथंच स्थितप्रज्ञागत मख्ख उभे होते. या पोरांनी लावलेल्या तारसप्तकात तिथला गलका मिसळून जात होता. विटून किटून गेलेल्या भिंतीवर अन मातकट चिकट फरशीवर घोंघावणारा माशांचा मोठ्ठाला जथ्था आनंदून गेला होता ! ...नशीब की पावसाने दोनेक दिवसांपूर्वी हात आखडता घेतल्याने चिखलाचे साम्राज्य कमी होते, पण आजूबाजूच्या ओल्यासुक्या चिखलात काही ठिकाणी डुकरे सुखैनेव लोळत पडली होती. कुत्र्यांचा तर सर्वत्र सुळसुळाट होता. तिथलं सारं हे वातावरण अर्थातच परिचयाचे होते कारण ग्रामीण भागातली देवस्थानं अन तिथले उत्सव यांना स्वच्छतेची जणू बाधा आहे. शिवाय या बाबींना सर्वांच्यालेखी गौण स्थान नसल्याने सगळे आपापल्या नादातच तिथं दंग होते.
आईसक्रीमच्या हातगाडया पासून ते खेळण्यांच्या छोटेखानी दुकानांनी तिथं यात्रेचा माहौल बनवला होता. इतरही अनेक वस्तूंची दुकानं, कॅंटीन, पान टपऱ्या या तर अशा ठिकाणच्या अविभाज्य घटकात मोडत असल्याने त्यांचं इथं असणं अनिवार्य होतं. आपल्या लोकांची क्रयशक्ती आणि लोकसंख्येचं दणकट परिमाण अशा ठिकाणी जास्ती अनुभवास येतं. जागोजागी जिकडे पाहावे तिकडे लोकांनी अस्ताव्यस्त लावलेली वाहने अन माणसांचे घोळके नजरेस येत होते. अगदी शेतातल्या मोकळ्या वावरापासून, ते बांधावरल्या झाडाखाली, मंदिरानजीकच्या पटांगणात अन एका बांधीव ओसरीवजा शेड मध्ये तमाम भाविक 'लोकं' जेवायला बसण्याची सोय होती. आम्ही त्या शेडमध्येच आमचे भोजन कसेबसे उरकले. जेवणानंतर अर्थातच मुखशुद्धी आलीच, त्यायोगे एक फेरफटका मारून झाला. चिलारीच्या झाडाखाली, चिखलात, गटारांच्या लहान सहान उघडया 'नदया'नजीकसुद्धा पोटोबाभक्त बसकण मारून बसलेले होते त्यांच्यावर एक कटाक्ष टाकत आम्ही ज्या पानाच्या ठेल्यापाशी येऊन पोहोचलो, तिथं पानशौकीनांनी विविध आक्ड्यांनी युक्त पानाच्या फर्माइशी केल्या तेंव्हा माझा आपला लोकांना न्याहाळायचा उद्योग अविरतपणे चालूच होता. पानं तयार होईपर्यंत तिथे एक सत्तरी पार केलेल्या आजीबाई आल्या. त्यांना पाहून माझा कालचा दिवस कारणी लागला.....
विटून गेलेल्या हिरव्या रंगाचं काठापदराचं नऊ वारी लुगडं अन रुपेरी बुट्टीची इरकली खणाची चोळी अशा टिपिकल गावाकडच्या वेशातल्या आजींना पाहून मी एका झटक्यात अनेक वर्षे मागे गेलो. खिळे ठोकलेल्या ढवळपुरी जाड चपला त्यांच्या पायात होत्या. नक्षीचे छर्रे उडालेल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या दुई हातात भरलेल्या होत्या, माळकरयांचे भूषण असणारी तुळशीची माळ अन एक काळ्या मण्यांची सर गळ्यात होती. कपाळावर बारीक तुळशीचे पान गोंदवलेलं अन जोडीला शामसावळा वर्ण ! कपाळावर कुंकू नव्हतं म्हणजे त्यांचा घरधनी हयात नसणार. सोबतीला मळकटलेल्या चुरगळलेल्या पायजमा नेहरूशर्टच्या वेशातला एक मध्यमवयीन पुरुष होता. तो त्यांचा मुलगा होता. बाईने खूप कष्ट केलेले असणार हे त्यांच्या दोन्ही हाताच्या तळहातावर पडलेल्या घट्टयांवरून जाणवत होते. भेगा पडलेली हाताची लांबसडक बोटं अन चपटी झालेली पिवळीपांढरी नखं खूप काही सांगून जात होती. डोईवरच्या केसांची अजून तरी चांदी झाली नव्हती, मात्र केस विरळ झाले होते. डोक्यावर पदर घेऊन डाव्या हाताने त्या पदराचं एक टोक त्यांनी घट्ट धरून ठेवले होते. देहयष्टी काटकुळी होती, खांदे वर आले होते. हाताची कातडी वाढत्या वयोमानानुसार लोंबत होती, पोट पार खपाटीला गेलेलं होतं. अगदी पाठपोट एक झाल्यानं त्या कंबरेत थोड्या वाकलेल्या होत्या. आवाज मात्र खणखणीत होता अन अर्थातच नजरही शाबूत होती. आजीबाईंना पाहून मी भूतकाळात जाण्याचे कारण म्हणजे त्यांचे काळेकुट्ट दात ! त्यांचे सर्व दात जागेवर होते मात्र सर्वच दात कानशीने कोरावे तसे वेडेवाकडे झाले होते अन त्यावर नाशीयुक्त मशेरीचे किटन चढून काळेकुट्ट झाले होते. या आजीबाईना पाहून मला माझ्या बालपणी आता जशा 'केअरटेकर' असतात तशा आम्हा ३० - ३२ भावंडांवर नजर ठेवायला असणारया अनुसया मावशी नामक आजींची आठवण झाली ....
अनुसया मावशी म्हंजे एकदम खाष्ट, जहांबाज ! आम्हा सर्व भावंडाना त्यांची खाशी दहशत होती, एखादे लेकरू जरी चुकलेले वा खोडया करताना सापडले की, 'तुला दडपिलं न्हेऊनशानी!" असं म्हणून उंदीर पकडून आणावा तसं त्या पोराबाळाच्या बखोटाला धरून ती बाहेर आणत असे. पण त्या आधी तिच्या काटकुळ्या हाताचा रट्टा पाठीत पडलेला असे. गावातल्या चौसोपी वाडयाची ती एकांडी शिलेदार होती, एकमेव पण सर्व 'गाबडयांना' (आमच्यासाठीचा तिचा हा परवलीचा शब्द होता) पुरून उरणारी (इथे शब्दशः अर्थ घेतला तरी चालेल !) ती समर्थ पहारेकरी होती. माझे सर्व चुलते, काक्या यांना देखील तिच्या कडक शिस्तीची भीती असावी कारण ती ज्या खोलीत असे तिथे माशी सुद्धा घोंघावत नसे ! ढेलजेपासून ते मोरीपर्यंत तिचा मुक्त वावर असे. माझ्या चंद्रभागा आजीची ती लाडकी अन विश्वासू सखी होती. आजीच्या बाळंतपणापासून ते नातवंडं घंगाळात बुचकाळून काढण्यापर्यंत अनेक कामे तिने लीलया पार पाडली होती. गावाकडील वाड्याच्या एका खणात आजोबांचे छोटेखानी दुकान होते, त्यांनी हाक मारायचा अवकाश की ही महाराणी समोर जो कुणी सापडेल त्याला दुकानातील कामास जुंपून मोकळी होई. तिच्या खडबडीत हातांना सदोदित तपकिरीचा वास असे अन तिच्या कपड्यांना मशेरीच्या दातवणाचा वास असे. दंड घातलेलं नऊ वारी लुगडं, चोळी अन मशेरी माळून काळी झालेली उजव्या हाताची तर्जनी, हस्तरेखाकारांच्या डोळ्यात धूळफेक करेल असा डावा काळा तळहात अन डाव्या गालावर डोळ्याच्या खाली मोठी काळी म्हैस अन त्यातून डोकावणारा राठ केस ! या तिच्या काही ठळक खुणा होत्या. कुणी पोर आजारी असले की मग मात्र हिचे दुसरे रूप नजरेस पडे मात्र ते तेव्हढ्याच दिवसाकरता सीमित असे. फणसाच्या गरयासारखं तिचं मन होतं.
'दाताचं दातवण घ्या कुणी' हे गाणं शाळेतल्या कार्यक्रमात गाताना अनुसया डोळ्यापुढे यायची कारण तिचे सातत्याने मशेरी लावून बसणं अन अधून मधून तपकीर ओढणं ! तिच्या कंबरेला एक चंची असे, त्या चंचीत एक चपटी मोठी डबी मशेरीची अन एक उभट स्टीलची डबी तपकीरीची असे. तिला ज्याची हुक्की येई ते काम ती करत असे. तपकीर भरताना ती एक नाकपुडी दाबून ठेवी अन दुसऱ्या नाकपुडीत तर्जनी अन अंगठ्याच्या चिमुटीत पकडलेली तपकीर अलगद हुंगून घेई. एकदा तिची चंची हाताला लागल्यावर आम्ही तपकीर ओढायचा प्रयोग करून बघितला होता आणि श्वास कंठाशी येतात म्हणजे काय होते याचा प्रत्यय घेतला होता. आजकाल आपण दात साफ करण्यासाठी टूथपेस्ट आणि टूथब्रशचा वापर करतो परंतु प्राचीन काळी आपले पूर्वज विविध झाडांच्या कोवळया फांद्या दात साफ करण्यासाठी (दातवण) म्हणूनही वापरत होते. दात स्वच्छ करण्याची ही पद्धत थोडीशी कठीण आणि असहज असल्यामुळे मागे पडली. याला देखील अनेक आशय विषय जोडले गेले आहेत. आचार्य वराह मिहिर यांच्या वृहत्सहिंतानुसार दातवणामध्ये निरोगी काया देण्यासोबतच लक्ष्मी वृद्धी, सुंदरता, आपत्य प्राप्ती, समाजात महत्त्वाचे स्थान आणि शत्रूंचा नाश करण्याची शक्ती आहे. कोणत्या राशीच्या माणसाने कोणतं दात्वन लावलं की काय प्राप्त होतं याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. आमच्या अनुसया मावशीला मात्र तिच्या सवयीपायी, तलफेपायी अन गरिबीमुळे हा मशेरीच्या दातवणाचा - तपकिरीचा नाद जडला होता. या दातवणात वनस्पतींशिवाय कोळसा आणि समुद्रफेस (एक प्राणिज औषधीद्रव्य) यांच्या चूर्णाचाही वापर दंतमंजन म्हणून पूर्वी केला जात असे. कोळसा, भाताचे तूस किंवा गोवऱ्या जाळून मिळणारी राख याचाही वापर केला जात असे. तंबाखू जाळून केलेली पूड म्हणजेच मशेरी जी आजही काही ठिकाणी वापरली जाते. तर तपकीर ओढणें हें एक प्रकारचें व्यसन आहे. यापासून दृष्टीस मांद्य येऊ शकते शिवाय कपडे खराब होत राहतात ते वेगळं प्रकरण. तरीही आजदेखील काही ठिकाणी तपकीर ओढली जाते. तपकीर / नास ही तंबाखूपासून तयार करतात, तंबाखू कुटून तिचें चूर्ण केले जातं. त्याला बारीक कपड्यांतून गाळल्यानंतर खालीं जी बारीक भुकटी राहते तीच तपकीर होय. ही झाली साधी तपकीर. दुसऱ्या प्रकारात थोडी उच्च प्रतीची तंबाखू उन्हांत वाळवून तिचा हातानें चुरा करून तो चुरा एका लोखंडी पात्रांत घालून भिजवतात. तो ३-४ दिवस राहूं देतात ज्या योगे त्याचा आंबवा तयार होतो. हा आंबवा उन्हांत सुकवून त्यांतील सर्व पाणी आटलें म्हणजे त्याचें जात्यांतून दळून पीठ करतात. पुढे तें बारीक वस्त्रांतून गाळतात ही झाली उंची तपकीर. पुण्यातली वर्तकी तपकीर आजही प्रसिद्ध आहे. आणखी काही प्रकारात तंबाखूची पाने बाजूला काढून फक्त काड्या वापरात आणतात. त्याचा काढा अन मग चूर्ण बनवून त्यापासून तपकीर मिळवतात. अत्युच्च तपकीर सुगंधी असते, तिला विविध प्रकारचे वास असतात....असो ...
काल भेटलेल्या या आजींना पाहून माझ्या त्या जुन्या आठवणी झर्रकन डोळ्यापुढून सरकत गेल्या..
माझ्या त्या अनुसया मावशीची आठवण करून देणाऱ्या या आजींना मी जेंव्हा त्यांच्या काळ्या दातांबद्द्ल विचारले तेंव्हा त्या आधी लाजल्या आणि मग त्यांनी हळूच चंची दाखवली. त्यांच्याकडेही मशेरी अन तपकीर या दोन सामग्री होत्या. ज्या योगे त्या त्यांच्या जीवनातील सुखदुःखाच्या क्षणांना आपेलेसे करत होत्या. मी त्यांना विचारले की, "मला तुमच्याबरोबर फोटो काढू दयाल का ?" यावर त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने मुलाकडे पहिलं मग मी त्यांच्या मुलास सांगितलं की, 'माझ्या बालपणी मी देखील अशाच एका मावशीच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे. त्यांचा माझ्याकडे कोणताही फोटो नाही. आज यांना पाहून तिची खूप आठवण झाली. ती आठवण जपून ठेवण्यासाठी हा फोटो हवाय." तेंव्हा त्याने कुठलेही आढेवेढे न घेता फोटो काढण्यास संमती दर्शवली. मग काय मी त्यांच्याशेजारी उभा राहिलो अन त्यांनी डोईवरचा पदर आणखी घट्ट पकडला. त्या अगदी टिपिकल 'फोटोस्टाईल' मुद्रेत होत्या मीही तसाच अवघडून उभा राहिलो. एक फोटो काढून झाला पण फोटोत त्यांचे दात दिसले नाहीत, मग मी त्यांना दात दाखवत फोटो काढायचा आहे असं म्हटल्यावर त्यांनी मला प्रतिप्रश्न केला, "तू तरी कुठं हसलास बाबा ?"
मग काय ! मी देखील माझी बत्तीशी दाखवली अन आजीबाईनी एक मधुर हास्य केलं, ज्यात गावाकडच्या साध्याभोळ्या माणसाच्या अंतरंगात असणारा एक तरल विश्वास होता, मायेची आपुलकी होती, ऋणानुबंधाचा स्नेह होता, काळजापासूनचा आशिर्वाद होता आणि आपलेपणाची शुध्द नैसर्गिक भावना होती !
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा