'सेंट ऑफ सॅफ्रॉन - थ्री जनरेशन्स ऑफ ऍन इराणियन फॅमिली' हे विख्यात लेखिका रूही शफी यांचे आत्मचरित्र आहे, जे ईराणी महिलांच्या तीन पिढ्यातील जीवनसंघर्षावर आणि परिवर्तनावर केंद्रित आहे.
रुहींची आजी, आई आणि त्या स्वतः असा कालपट आहे. यात पाहिली पिढी ग्रामीण जीवनात राहणारी, दुसरी शहरीकरणाच्या प्रभावाखाली, आणि तिसरी राजकीय अस्थिरतेमुळे निर्वासित होणारी अशी वाटचाल दाखवलीय.
इराणचा समाजिक इतिहास कसा मध्ययुगीन काळाकडे वाटचाल करत गेलाय याचे उल्लेख उदाहरणासह येतात. 1920 ते 1980 या काळातील इराणच्या राजकीय आणि धार्मिक बदलांचा इराणी महिलांच्या जीवनावरील परिणाम आणि प्रभाव यांचे वेधक चित्रण यात आहे. लेखिकेने तिच्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक इतिहासाशी जोडून धार्मिक विचारधारेचा पगडा आणि सामाजिक नियंत्रणाची ताकद दाखवलीय.
काहींच्या आयुष्यात एक विलक्षण साम्य असणाऱ्या घटना घडतात. गोष्ट आहे जागतिक कीर्तीचे अमेरिकन संशोधक बेंजामिन फ्रँकलिन आणि मराठी लेखिका मालती बेडेकर तथा विभावरी शिरूरकर यांची. मालती बेडेकर यांचं लग्नाआधीचं नाव बाळूताई खरे. मराठीमधलं काही विलक्षण दिशादर्शक लेखन त्यांनी केलंय. त्या आद्य स्त्रीवादी लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या लेखनाची एक कथा आहे! विभावरी शिरुरकर या नावाने त्यांनी त्या काळातलं अत्यंत जहाल असं लेखन केलं. त्यांनी लिहिलं खरं मात्र ते प्रकाशित कोण करणार? तर त्यांच्या मोठ्या भगिनी कृष्णा मोटे या यादेखील लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे पती ह. वि. मोटे यांनी हे लेखन प्रसिद्ध केलं. 'कळ्यांचे निश्वास' हे त्या कथासंग्रहाचे नाव. जरठ विवाह, बालविधवा,स्त्रीच्या कामवासना, प्रणयभावना, लग्नाचा बाजार, स्त्रीमनाची कोंडी, परित्यक्ता आणि विधवा विवाह यावर त्यांनी अत्यंत टोकदार कटाक्ष टाकले होते. या लेखनाची इतकी चर्चा झाली की ही विभावरी शिरूरकर कोण आहे याचा छडा लावला पाहिजे अशा चर्चा वर्तमानपत्रात झडू लागल्या.
मणिपूरमधील एका मैती तरुणीचा एक व्हिडीओ अलिकडेच खूप व्हायरल झालाय ज्यामध्ये ती स्वतःच्या राहत्या घरी परतल्यानंतर सारं काही राख झाल्याचं पाहून रडते आणि कायमचं विस्थापित होणार असल्याचं सांगत घराच्या अवशेषांतून बाहेर पडते. हा व्हिडीओ पाहून जागतिक किर्तीचे आफ्रिकन लेखक चिनुआ अचेबे यांच्या ‘सिव्हिल पीस‘ या कथेची आठवण झाली.
सिव्हिल पीस Civil Peace ही कथा जोनाथन इव्हेग्बू नावाच्या नायजेरियन माणसाच्या जीवनावर केंद्रित आहे. जो नायजेरियन गृहयुद्धातून (1967-1970) आपल्या कुटुंबासह सुखरूप बाहेर पडतो. युद्धात त्याच्या हाती पाच अमूल्य गोष्टी गवसल्या असं तो मानतो — त्याचं स्वतःचं जीवन, पत्नी मारियाचं जिवंत असणं आणि त्याच्या चारपैकी तिघा मुलांचं उर्वरित आयुष्य. युद्ध संपल्यानंतर जोनाथन आपले घर शोधण्यासाठी एनुगू या त्याच्या मूळ गावी परततो, जिथे त्याला त्याचं घर सापडतं. काहीशा पडझड झालेल्या अवस्थेतलं आणि काही अंशी जाळपोळ झालेलं घर पाहून त्याला आनंदही होतो आणि दुःखही होतं. तो आनंदाने म्हणतो, “ईश्वर कधीच अडचणी निर्माण करत नाही, त्याने मला धीर दिला!"
जवळपास प्रत्येक भारतीयास क्रिकेट आणि वेस्टइंडिज ठाऊक असते. वेस्टइंडिज हा एकल अस्तित्व असणारा देश नसून स्वायत्त बेटांचा समूह आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण पूर्वेस अगदी वरच्या बाजूने त्रिनिदाद अँड टोबॅगो पासून सुरुवात केली तर ग्रेनाडा, बार्बाडोस, डॉमिनिका, प्युर्टोरिको, हैती आणि अखेरीस जमैका यांची रचना इंग्रजीमधील डी या वर्णक्षरासारखी दिसते, यातलेच एक बेट आहे डॉमिनिकन रिपब्लिक, याची सीमा हैतीला लागून आहे. या डॉमिनिकन रिपब्लिक या छोट्याशा देशात राफाएल ट्रूहियो हा अत्यंत क्रूर हुकूमशहा होऊन गेला. १९३४ ते १९६१ या सत्तावीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने क्रूरतेचे कळस गाठले, अनन्वित अत्याचार केले. त्याच्याशी या पोस्टचा जवळचा संदर्भ आहे.