गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

मिगेल टोर्ग - देशोदेशीचे मोर्गाडो!


मिगेल टोर्ग हे पोर्तुगाल मधले महत्वाचे आणि जागतिक ख्यातीचे लेखक. त्यांचं साहित्य जगभरात वाचलं जातं. 1940 साली प्रकाशित झालेला बिशोस (Bichos) हा त्यांचा गाजलेला लघुकथासंग्रह. यात वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या चौदा कथा आहेत.

या सर्व कथा प्राणीविश्वाशी निगडित आहेत. प्राण्यांचे सहजीवन आणि त्यांच्या वाट्याला आलेले मनुष्य अशी मांडणी काही कथांत आहे. 'मोर्गाडो' ही कथा यापैकीच एक आहे. ही एका खेचराची काहीशी करुण आणि नर्मविनोदी कथा आहे.

मोर्गाडो हा, घोडा आणि गाढव यांच्या संकरापासून तयार झालेला खेचर. पोर्तुगालच्या ट्रास-ओस-मॉंटेसमधील एका श्रीमंत शेतकऱ्याच्या घरी तो वाढलाय. त्याच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कथा समोर येते, ज्यात तो आपल्या जीवनाचा अर्थ, मालकाशी असलेले नाते आणि निष्ठुर मृत्यूची अटळ गोष्ट यांचा विचार मांडतो.

मोर्गाडो हा एक थकलेला, जाडजूड आणि आपल्या सौष्ठवाचा अभिमान असलेला खेचर. त्याचा मालक त्याला घरातील सदस्य म्हणून वागवतो. त्याला चांगलं चुंगलं खाऊ पिऊ घालतो, कोणतंही काम न लावता आराम देतो. येता जाता त्याला गोंजारत असतो. त्याला गरम पाण्याने न्हाऊ घालतो, घरात काही विशेष खायला केलेलं असलं तर त्याचा काही अंश तो लाडाने त्यालाही देतो.

आपल्या मालकाची वागणूक पाहून मोर्गाडोला असे वाटते की तो मालकाचा जिवलग आहे; त्याला कायम असं वाटत राहतं की आपला मालक आपली खूप काळजी घेतोय, कधी कधी तर त्याला असं वाटतं की केवळ आपली काळजी करण्यासाठीच मालकाने स्वतःला वाहून घेतलं आहे!

मालकावरील अंध प्रेमापोटी तो वाहवत जातो. सतत त्याच्या पायाशी बसून राहू लागतो, त्याच्या हाकेला निमिषार्धात प्रतिसाद देत राहतो, आणि नकळत स्वतःला घराचा राजा समजतो. आपणच या घराचे वारस, मालक आहोत असं त्याला मनातल्या मनात वाटत राहतं.

पण वास्तव असं नसतं. त्याचा मालक त्याला फक्त धष्टपुष्ट चवदार मांसासाठी वाढवत असतो. मोर्गाडोला हे माहीत नसतं. तो मालकाच्या प्रेमात इतका आकंठ बुडालेला असतो की त्याच्या अंतःकरणात केवळ आणि केवळ तृप्तता असते, शिवाय तो अहोरात्र आपल्या मालकाचीच चिंता करत राहतो. आपल्या मालकाला आपण मनोमन जपलं पाहिजे याला त्याचे प्रथम प्राधान्य असते.

एकदा ख्रिसमसची वेळ येते. मालक घरात उत्सवाची तयारी करतो, आणि मोर्गाडोला वधासाठी नेले जाते. खेचर आश्चर्यचकित होतो, त्याला विश्वास बसत नाही की जो माणूस त्याला रोज प्रेमाने खाऊ घालत होता, तोच आता त्याला जिवंत मारणार आहे! इतकेच नव्हे तर आपल्या अवयवांची मेजवानी पाहुण्यांना देऊन स्वतःदेखील सामील होणार आहे, याचे त्याला वैषम्य वाटते!

इतका काळ मालकाच्या प्रेमात बुडालेला मोर्गाडो शेवटच्या क्षणी जिवाच्या आकांताने आर्त ओरडतो, अतीव धडपड करतो, पण सारं व्यर्थ जातं. तो मारला जातो. आणि त्याचे मांस ख्रिसमसच्या जेवणात सर्व्ह केले जाते.

मालक धूर्त असतो. त्याला ठाऊक असते की या जिवाला देखील आत्मा असेल, त्याने वाईट वाटून घेऊ नये म्हणून तो म्हणतो की, 'मोर्गाडो मेला, पण त्याचा आत्मा कायम या घरात राहील कारण त्याचे मांस सर्वांनी खाल्लेय.'

कथेच्या शेवटी हे वाक्य येते आणि तो घरमालक, मोर्गाडो'च्या जागी दुसरे खेचर घेऊन येतो. क्लायमॅक्सद्वारे लेखक मिगेल टोर्ग सुचवतात की, बळी पडण्यासाठी आणि शोषणासाठी जीव बदलतो मात्र शोषणाची शृंखला तोडली जात नाही!

मिगेल टोर्ग यांनी ही कथा तत्कालीन पोर्तुगालमधील सालाझार सरकार आणि त्यांचे समर्थक यांना उद्देशून लिहिली होती. या कथेचे कालातीत पातळीवर लागू होणे कसे काय शक्य झाले हे जाणून घेण्यासाठी पोर्तुगालचा आधुनिक इतिहास पाहणे क्रमप्राप्त ठरते.

1910 ते 1926 या काळात पोर्तुगालमध्ये पोर्तुगालचा शेवटचा राजा मॅन्युएल दुसरा याला हद्दपार करण्यात आले. राजेशाही संपुष्टात आली आणि संसदीय लोकशाहीची स्थापना झाली. 'पोर्तुगीज फर्स्ट रिपब्लिक', या नावाने हा काळ ओळखला जातो. या सरकारने कॅथोलिक चर्चच्या प्रभावाला आळा घालण्यासाठी कठोर धर्मविरहित धोरणे राबवली.

धार्मिक संस्थांवर बंदी घालण्यात आली, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि शाळांमध्ये धार्मिक शिक्षण निषिद्ध करण्यात आले. या काळात पोर्तुगालमध्ये घटस्फोटाला कायदेशीर मान्यता मिळाली आणि पुरुष व स्त्रियांच्या विवाह हक्कात समानता आणली गेली.

1926 मध्ये या राजवटीविरोधात लष्करी बंड झाले. त्यामुळे पोर्तुगालमध्ये अस्थिरता होती. याच दरम्यान सालाझार यांना सुरुवातीला अर्थमंत्री म्हणून बोलावण्यात आले, 1932 मध्ये ते पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखालची राजवट, 'एस्टाडो नोवो' या नावाने ओळखली जाते.

हुकूमशाहीकडे झुकलेली, कॉर्पोरेटिस्ट नीतीने भारलेली ही राजवट, राष्ट्रवाद आणि परंपरावाद याकडे बेहद्द कल असणारी होती. अतिशय पुराणमतवादी, राष्ट्रवादी आणि पारंपरिक कॅथोलिक मूल्यांवर तिचा दृढ विश्वास होता. 'देव, देश आणि कुटुंब' (God, Homeland, Family) ही त्यांची प्रमुख घोषणा होती.

सुरुवातीला लोकशाहीचा मुखवटा पांघरून असणाऱ्या सालाझार यांची राजवट कडवट हुकूमशाहीसारखी होती. दडपशाही हे तिचे मुख्य अंग होते. या काळात तिथे मर्यादित राजकीय स्वातंत्र्य होते, आणि विरोधकांना दडपण्यासाठी गुप्त पोलीस (PIDE) तसेच तुरुंग शिबिरांचा (concentration camps) वापर केला गेला. या राजवटीने एक कॉर्पोरेटिस्ट प्रणाली लागू केली, ज्यामध्ये कामगार आणि व्यावसायिक संघटनांना राज्याच्या नियंत्रणाखाली आणले गेले.

या राजवटीच्या काळात, आफ्रिकेतील (अंगोला, मोझाम्बिक, इ.) वसाहतींवर नियंत्रण कायम ठेवण्यावर पोर्तुगालचा भर होता. या प्रदेशांना पोर्तुगालचे अविभाज्य भाग मानले जात असे आणि स्वातंत्र्याच्या चळवळींविरुद्ध प्रदीर्घ आणि रक्तरंजित युद्धे लढली गेली.

वसाहतवाद हा सालाझार सरकारचा वीक पॉईंट होता. वर्तमानपत्रे, पुस्तके आणि इतर माध्यमांवर कठोर पूर्व-सेन्सॉरशिप होती, ज्यामुळे माहितीवर सरकारी नियंत्रण होते. ही राजवट वर्गसमानता, समाजवाद आणि उदारमतवाद यांच्या तीव्र विरोधात होती

या राजवटीने आर्थिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित केले, सरकारी कर्ज कमी केले आणि आत्मनिर्भरतेवर भर दिला. सुरुवातीला आर्थिक सुधारणा थोड्या वेगाने झाल्या असल्या तरी, नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली. .

एस्टाडो नोवो ही एक बंदिस्त, स्युडो राष्ट्रवादी आणि दडपशाहीची राजवट होती, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल होत असतानाही जुनी मूल्ये आणि वसाहतवादी धोरणांना चिकटून राहिली. परिणामी पोर्तुगाल काही अंशी सुधारणा होऊनही मागेच राहिले!

1970 मध्ये सालाझार मरण पावला आणि 1976 पासून पोर्तुगालने सुसाट प्रगती केली. 2000 साली तर युरोपियन टॉप ट्वेल्व जीडीपी असणाऱ्या देशात पोर्तुगाल होते.

लेखक मिगेल टोर्ग यांनी व्यापक लेखन केलेय. 1940 ते 1995 पर्यंत त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालीत. विशेष बाब अशी की जसजसे देशातले राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण बदलत गेले तसतसे टोर्ग यांच्या लेखनातील आशय विषय बदलत गेले. कधी परखड शब्दांत तर कधी अतिशय चाणाक्षपणे ते सरकार आणि व्यवस्थेवर आसूड ओढत राहीले.

'बिशोस'मधल्या गोष्टी वाचल्यावर लक्षात येते की मिगेल टोर्ग यांची विचार करण्याची पद्धत वेगळीच होती आणि त्यास अनुसरून लिहिलेल्या गोष्टी मांडण्यांची शैली अनोखी होती. या चौदा कथा वाचल्यानंतर त्यांच्या प्रतिभेची चुणूक येते.

1940 साली त्यांनी शब्दबद्ध केलेले मोर्गाडो हे खेचर आजही जगभरातील बऱ्याच देशात अस्तित्वात आहे; फरक इतकाच आहे की, पूर्वी त्याला चार पाय होते, आता दोन पाय आहेत! ज्या सत्तेची भलावण करण्यात ते दंग झालेय, ती राजवट त्याला खाऊन कधी ढेकर देईल याचा नेम नाही! शिवाय त्याला खाऊन त्याच्याच मरणाचे गुण गायलाही कमी करणार नाही, लेखक मिगेल टोर्ग हेच सुचवतात!

काही लेखक विलक्षण प्रतिभाशाली असतात, त्यांचे लेखन आणि त्यांची पात्रे त्रिकालाबाधित सत्याच्या कसोटीवर खरी उतरतात, मिगेल टोर्ग आणि मोर्गाडो त्यापैकीच ठरलेत!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा