7 मार्च 1966. आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमेच्या (चंद्रभागा) पात्रावरील उजनी धरण प्रकल्पाचं भूमिपूजन सुरु होतं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नाईक यांनी नारळ वाढवला आणि यशवंतराव चव्हाण कुदळ मारण्यासाठी पुढे झाले अन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. धोतराचा सोगा डाव्या हाताने उचलून धरत त्यांनी कुदळ खाली टाकली. थोडेसे पुढे सरसावले. नदीपात्राच्या दिशेने दोन्ही हात जोडून ते उभे राहिले. गदगदलेल्या आवाजात ते बोलले, "विठ्ठला मला माफ कर बाबा, मी औचित्यभंग करतोय. तुझी चंद्रभागा मी अडवलीय मला पदरात घे!".. कार्यक्रमाच्या भाषणात देखील त्यांनी हा सल बोलून दाखवला. आज या भीमेने आणि तिच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केलेय! काय झालेय नेमके?