शनिवार, २५ मे, २०२४

पँडेमोनियम, जॉली एलएलबी आणि पुणे अपघात!


विख्यात दिग्दर्शक क्वॅर्क्स यांचे दिग्दर्शन असलेला 'पँडेमोनियम' हा चित्रपट दर्शकांना विचार करण्यास भाग पाडतो. अतिवास्तवाच्या प्रवासात घेऊन जाताना प्रेक्षकांना तो विचलित करतो. मानवी जीवन अस्तित्त्वाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर नैतिकता आणि मेटाफिजिक्सच्या गहनतेचा शोध घेतो. पँडेमोनियम या चित्रपटात एका ट्रक ड्रायव्हरची कहाणी आहे. नॅथन हा एक मुरलेला हायवे ट्रक ड्रायव्हर असतो. एके दिवशी त्याच्याकडून एक मोटरसायकलस्वार ट्रकखाली चिरडला जातो मात्र त्याच वेळी त्याचे ट्र्कवरचे नियंत्रण सुटते. तो भलामोठा ट्रक दगडी टर्नवर जाऊन आदळतो. त्यात तो मृत्यूमुखी पडतो. इकडे त्याच्या गाडीखाली चिरडला गेलेला डॅनियल देखील जागीच मरण पावलेला असतो. अपघातातील टक्करीचा नॅथनला धक्का बसतो. तो भानावर येतो तेव्हा स्वतःचे छिन्नविच्छिन्न प्रेत पाहतो. आधी त्याचा विश्वासच बसत नाही की आपण मरण पावलो आहोत. तो प्रेताशीच संवाद करू लागतो मग कुठे त्याची खात्री होते की अपघातात आपलाही मृत्यू झाला आहे. दरम्यान तो ट्रकच्या केबिनबाहेर येतो आणि त्याची भेट डॅनियलशी होते. डॅनियलदेखील त्याच्यासारखाच चक्रावून गेलेला असतो. ट्रकने आपल्याला चिरडले, त्यात आपला प्राण गमावून बसलो आहोत हे त्याच्या लक्षात येते. इथे काहीशी नर्मविनोदी संवाद छटा असली तरी त्या हसण्याचे नंतर आपल्याला दुःख होते हे महत्वाचे! नॅथनच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळेच आपण मेलो आहोत हे उमगताच त्याचे नि नॅथनचे भांडण सुरु होते. एका निर्मनुष्य डोंगराळ रस्त्यावर दोन प्रेते पडलेली असतात आणि त्यांच्या आत्म्यांची भांडणे जारी असतात हे दृश्य विचलित करते. प्रेक्षक अस्वस्थ होत जातो. राग, संभ्रम आणि डार्क ह्युमरचे बेमालूम मिश्रण आपली तगमग वाढवते. मात्र त्यातूनच कथेचा पुढचा प्लॉट डेव्हलप होतो.