एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात.