मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

झुलवा - अंधार वेगाने वाढतो आहे...



सुली, दत्त्या, राम्या आणि काशिनाथ या चौकडीचं नशीब अगदी भुस्नाळ होतं. सशानं बिळातनं बाहेर यावं नि नेमकं त्याच वक्ताला शिकारी कुत्र्यानं हगवणीसाठी पाय आखडून घ्यावं तसं त्यांचं भाग्य !
सुलीचं पूर्ण नाव मला अजूनही ठाऊक नाही. थोराड बाया तिला सुली म्हणतात तर कुणी समवयीन तिला सुलू म्हणतात. पुरुष मात्र लोचना नाहीतर सुलोचना या नावांनीच तिला पुकारतात. सुलीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख नवरात्र होय ! तिला नेहमी वाटतं की नवरात्र कधीच संपू नये. सालभर नवरात्र असावी असंच तिला वाटतं. अश्विन पौर्णिमा सरली की दमून गेलेली सुली अगदी निपचित होई. हे चौघेही दुसऱ्या दिवशी दुपारून धुम्मस मारून तानीबाईच्या खोपटात बसत. माणिकरावच्या अड्ड्यावरून दत्त्या देशी थर्रा घेऊन येई. तानी स्वतःच्या हाताने वाडगं भरून थोडं लालभडक रश्श्याचं आणि थोडं सुकं मटन करायची. राम्या खिमा उंडे नि तिखट बुंदी घेऊन यायचा. काशिनाथची बायको त्याला चपात्याची चळत देई. सुली पिताना बडबडत नाही. शून्यात नजर लावून बसते. तिचं गुमान राहणं हेच तिचं बोलणं हे बाकीच्यांना माहिती होतं. स्टीलच्या ताटांनी मटन, खिमा वाढून झाला की तानीचं काम संपे. मग ती प्यायला सुरुवात करे. जाम बरळायची ती. दत्त्या एकदम हरामी. किती जरी ढोसली तरी त्याला फरक पडत नसे.

तेलकट तोंडाच्या दत्त्याच्या डोक्यावरल्या पांढऱ्या टोपीने केसातले तेल पिलेलं असल्याने तिच्या कडांना तेलकट ओघळाचे डाग कायमच दिसत. गरुडनाकाच्या दत्त्याने तलवार कट मिशा राखलेल्या. काळयाशार कपाळावर भंडाऱ्याचा मळवट असे जो घामाने लिबलिबीत होई. त्याच्या एका कानात बाळी होती. हनुवटीवर तण उगवल्यागत पांढुरकं दाढीचं खुंट राही. काळ्या राठ ओठा आडच्या वरच्या जबड्यातला एक दात सोन्याचा होता. त्या सोनेरी दाताच्या जोरावर तो कैक गप्पा करायचा, फुशारकी मारायचा. त्याच्या हाताला कसलेसे गंडेरे दोरे असत. बोटात खोट्या नाट्या अंगठ्या असत. उजव्या पायाच्या घोट्यापाशी काळा धागा दिसे. एरंडेल पाजून लालेलाल झालेल्या कोल्हापुरी वाहणा पायात असत. दत्त्याचे पाय भले मोठे नि बेढब होते. त्याचा पाय कुणाच्या पायावर पडला तर दोनेक बोटांची नखे जागीच बळी चढत. त्याचं बोलणं एकदम निबार ! आवाज देखील खर्जातला. संबळ वाजवून त्याची मनगटे आखडून गेलेली. बोटांना घट्टे पडलेले. देवीच्या नावाचा गजर होताना तो मध्येच आवाज बदलून जीभ दाबून धरत उदो उदो म्हणायचा तेंव्हा लोकांना भारी वाटायचं. त्याचं हडकुळं अंग घामेजून जाई, तरीही तो अथक वाजवत राही. खरं तर दत्त्याच्या हातातल्या कामट्या त्याच्याच चामड्यावर वळ उठवित ! लोक त्याला मुद्दाम माल पाजत, दत्त्याला एकदा का करंट बसला की तो थकत नसे. लोक म्हणत दत्त्याला देवी प्रसन्न आहे ! मग दत्त्या कसनुसं हसून मुकाट होकार देई. लोकांच्या डिमांडनुसार दत्त्या बऱ्याचदा हलगी वाजवायचा. 'डंगनाड हुकनाड' आवाज घुमवत तो हलगीचं चामडं ताणायचा तेंव्हा त्याला भयानक जोश यायचा. चित्कारत उड्या मारायचा. तेंव्हा लोक त्याच्यावरून नाणी नोटा ओवाळत !

त्यानं जास्तीची ढोसलेली असली की सुलीची पंचाईत होई. त्याला थांबवणं तिला जमत नसे. मग ती राम्याला इशारा करे. जाडजुड देहयष्टीचा राम्या शेरभर वजनाचं तुणतुणं विलक्षण लयीत वाजवी. त्याच्या तारेचा आवाज लक्ष वेधे. त्याच्या उजव्या हाताच्या सर्वच बोटांना चिरा पडलेल्या. दत्त्याला ढूसण्या देताना तो बिनदिक्कतपणे काशिनाथच्या हातातली डूमडी वापरायचा. मग कुठे दत्त्याचं इमान ढगातून खाली उतरे. राम्या कधीकाळी अगदी सफरचंदी रंगाचा असावा मात्र बारमाही बोंबलत फिरल्याने त्याचा रंग तपकिरी करडा झालेला. चेहऱ्यावर वांग आलेलं. त्याची अंगकाठी अगदी टणक. हाडंपेरं मजबूत. रेड्यागत मानगुट अन तांब्याच्या आकाराची मूठ ! सशापासून ते रानडुकरापर्यंत सगळे जीव पचवलेले. काहीही चाले त्याला. असा हा अवाढव्य देहाचा राम्या तुणतुणं वाजवायचा. राम्याची बायको त्याच्या सवयींना कंटाळून पोरंबाळं घेऊन माहेरी निघून गेलेली. काडीमोड वगैरे काही नाही. आताशा त्याचं पोर मोठं झालेलं अन ते त्याच्याकडे अधून मधून यायचं. राम्या त्याला पैसेअडके द्यायचा. देवीच्या मंडपात येऊनही हात न जोडणारा राम्या एका वेगळ्याच दुनियेत जगायचा. गल्लीतल्या कोपऱ्यावर शांताबाईकडून खिमा आणायचा. त्यासाठी तिला पाणी लावायचा. तिच्यावर देवी प्रसन्न आहे म्हणून सांगायचा. मात्र कधी लुबाडायचा नाही. मांजरपाटी कापडातला नेहरूशर्ट पायजामा नेसत असल्याने तो सहजी ओळखू यायचा. सुलीवर त्याचा खूप जीव होता पण कधी बोलून दाखवलं नव्हतं !

सुलीने लग्न केलं नव्हतं. मात्र खैरमोडयांच्या थेरड्याबरोबर तिचा म्होतूर लावलेला. त्याला देखील दोन दशकं उलटून गेली. थेरडा गचकला आणि सुली सुटली. मग बापाने तिला नरहरी रावतासंगं तिला झुलवा ठेवलेलं. कपाळी पुन्हा कुंकू आलं. तिच्यातला रस सरल्यावर तिने त्याला सोडून दिलेलं. तिला वाटलं आता तरी मोकळं ढाकळं जगता येईल. पण तसं झालं नाही. घरादाराच्या गरजांत पुरती अडकली. घरातल्या गरजांची अगरबत्ती तिच्या मस्तकी कायमची खोवलेली. लोकांना त्याचा दरवळ जाणवे मात्र तिच्या मस्तकी पडलेले छिद्र कुणालाच दिसत नसे. आता चाळीशी पार करून पाचेक वर्षे लोटलेली. विटाळ निघून गेलेला. डोईचे केस विरळ होऊ लागलेले. परडी कोटंबा आणि तेलात लडबडलेला गोलाकार पोत हाती घेऊन हळदी कुंकू भाळी माखलेल्या सुलीची एक ठाशीव प्रतिमा झाली होती. राम्याचा आपल्यावर जीव आहे हे ती जाणून होती म्हणूनच हस्ते परहस्ते त्याची काळजी ती घेई पण कधी त्याची वाच्यता केली नव्हती तिने.

काशिनाथ तिशीतला होता. एमआयडीसीत दिवसपाळी करायचा. देवीची सेवा आणि पोटाची पूजा दोन्ही घडतात खेरीज चार भलेबुरे लोक नव्याने भेटतात म्हणून तो यांच्यात सामील झालेला. लहानपणी कधी कसली देवदेवरस्की न केलेला. कधी कुठलं वाद्य न वाजवलेला बेताची देहयष्टी असणारा काशिनाथ साधासुधा होता. त्याचे जगण्याचे आडाखेही सरळ होते. राम्या सुलीवर मरतो हे त्याला उमगलेलं. सुली राम्यावर जीव टाकते हे ही त्याने ताडलेलं. निर्गुण निराकार दत्त्यापेक्षा सुली आणि राम्या त्याला जास्त आवडायचे ते त्यांच्यातल्या मुक्या प्रेमाने ! काशिनाथने मामाची पोरगी सुभद्रा हिच्यासोबतच लग्न केलेलं. त्याचं दोन खोलीचं पोपडे उडालेलं घर आज्ज्या पंज्यापासूनचं. यानं त्यात एक खिळा देखील वाढवला नव्हता. मात्र कधी विळ्याचा खिळा देखील केला नव्हता. आपल्या नवऱ्याला देवीचा नाद आहे असं सुभद्रेला वाटे आणि त्यात गैर काही नव्हते. आपला सरळमार्गी नवरा कधी आपल्याला फसवणार नाही याची तिला बिचारीला खात्री होती. ही पंचकडी जेवायला एकत्र असली की ती काशिनाथला भली मोठी चपात्यांची चळत देई. तो देखील आडवा तिडवा हात मारे. बाकीचे आपआपल्या दुःख वेदनांत बुडून गेलेले असत आणि हा खाण्यात व्यग्र असे. तरीदेखील सर्वांच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष असे. देवीची आराधना करताना हे चौघेही तिच्याशी एकरूप होत असत, त्यात कसलीही कसर सोडत नसत. जणू तिचा संचार यांच्या गात्रात झालाय असे वाटे !

तानीबाईचा यांच्या देवदेवरस्कीशी थेट संबंध नसला तरी सुलीशी तिचा आगळा वेगळा संबंध होता. नरहरी रावताची ती पहिली रांड होती. ती बदचलन असल्याची कुणी तरी कंडी केली आणि त्यानं तिला वाऱ्यावर सोडून दिलेलं. दीड वर्षाची पोर मात्र त्याने स्वतःजवळ कायमची ठेवून घेतली. कधीच त्या मायलेकीची भेट होऊ दिली नव्हती. त्यामुळे तानी एकदम खचून गेली होती. सुलीने तिला जीव लावला हे विशेष ! खोपटाबाहेर चहाची टपरी खोलून दिली, त्यावर तिचं पोट चाले. लोक मात्र तिच्या अर्धवट उघड्या छातीकडे आणि ठिगळ लावलेल्या लुगडयाकडे अगदी आशाळभूत नजरेने पाहत. तिला त्याची इतकी सवय होती की ती पुरती बधीर झालेली. तानीच्या घरी ही चौकडी खायला प्यायला यायची. सुली तिथेच झोपायची. दत्त्या, राम्या यांना काशिनाथ त्यांच्या घरी सोडायचा. फुल्ल दारू पिऊन देखील तानीचे नटबोल्ट जागी असत, कधीच तिचं पिस्टन तापलेलं नसे. मात्र तोंडाचा पट्टा अखंड असे. तिखटजाळ रस्सा तिच्या रक्तात भिनत नव्हता. हे चौघे आपल्याकडेच का येतात असला कोलदंडा ती कधी घालून घेत नसे. मात्र जगाला कोलायचे कसे हे तिला पक्के ठाऊक होते आणि त्यात तिला या चौघांची मदत होई. त्यामुळे तिचे त्यांचे सुत पक्के जुळलेले. त्यांची घनिष्ठता एकमेकाच्या घुगऱ्या जेवल्यागत होती.

कालच्या पाडव्याला नरहरी राऊत मेला. त्याच दिवशी त्याचं क्रियाकर्म झालं आणि हे सगळे काल भाऊबीजेला एकत्र बसले. सुलीला उगाच उदास वाटत होते. राम्याला तिच्या उदासीनतेची मूक चिंता लागून होती. तानी मात्र खुश झाली होती. आपल्या आयुष्याची माती केलेला माणूस मेला याचा तिला आनंद झालेला. तानीच्या चेहऱ्यावरील आनंद सुलीने अचूक टिपला तेंव्हा त्यांच्यात आडाआडी लागण्याआधीच दत्त्याने मध्यस्थी केली. नरहरी कधीच मेला होता काल त्याचं शरीर मेलं अशी तत्वज्ञानी मल्लीनाथी त्यानं केली. काशिनाथ मात्र अस्वस्थ होता. त्याची तगमग सगळ्यांनी ओळखली. खूप खोदून विचारल्यावर त्यानं सांगितलं की तानीच्या ज्या पोरीला नरहरीने ठेवून घेतलं होतं तिच्याशीच नरहरीच्या पोराने पाट लावला, तिला शहरात नेऊन ठेवलं, तिच्याशी नवऱ्यासारखा वागू लागला याचा रावताला शॉक बसला. एका अनमिक भीतीने त्याने घाईघाईत पोराचे लग्न लावलं आणि त्या दगदगीतच तो मेला ! हे ऐकताच तानीने आपल्या ताटात माती कालवली आणि मोठ्याने ऊर बडवत ती रडू ओरडू लागली. रात्री बऱ्याच उशीरपर्यंत ते चौघे तिला शांत करत होते. रात्र मात्र लवकर सरलीच नाही, घनगर्द काळोख दाटून राहिला. त्या काळोखाचे काही निखारे वाऱ्याने माझ्यापर्यंत पोहोच केले आणि गलबलून आलं !

जीव लावून देवीची आराधना करतानाचे त्यांचे चेहरे राहून राहून माझ्या डोळ्यापुढे तरळत राहिले. ते आता पुन्हा भेटतील तेंव्हा त्यांच्या मनात काय असेल या प्रश्नाने डोक्यात काहूर माजवलेय. आपल्याच दुनियेच्या परिघात असूनही वेगळ्या विश्वाच्या वर्तुळात जगणाऱ्या जीवांशी खेळणाऱ्या लवलवत्या त्रिज्या छाटण्यासाठीचं धारदार अस्त्र शोधतोय मी. तुम्हाला गवसलं तर कळवा. तोवर थांबतो, शिवाय आता अंधारही वेगाने वाढतो आहे.

- समीर गायकवाड

२ टिप्पण्या: