मंगळवार, ४ मे, २०२१

मासूम - दो नैना एक कहानी...


आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.